निलंगा (लातूर): सवलतीच्या दरामध्ये मिळणाऱ्या महाबीज कंपनीचे बियाणे मिळविण्यासाठी येथील मारूती कृषी सेवा केंद्रासमोर शेतकऱ्यांनी चक्क रात्र जागून काढली अखेर दुकानदारांनी गुरूवारी (ता. दहा) रोजी पोलिस बंदोबस्तात बियाणे वाटप केले. सध्या मृग नक्षत्राला प्रारंभ झाला असून यंदा वेळेवर पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. शिवाय आता लॉकडाऊन पूर्णतः खुले केल्यामुळे बाजारात सध्या खत, बियाणासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे.

तालुक्यात एकुण खरीपातील ९० हजार हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास ६५ ते ७० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा केला जातो. यंदा सोयाबीनला सात ते साडेसात हजार रुपयांचा दर मिळाला असल्याने यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांचा ओढा सोयाबीनचे उत्पादन घेण्याकडे अधिक दिसत आहे. सध्या शेतकरी बाजारात सोयाबीन बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. बाजारात यंदा खासगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाणांच्या दारात मोठी वाढ झाली असून ३० किलो सोयाबीन बियाणाची बॅग तीन हजार ३०० ते तीन हजार ५०० रुपयेला मिळत आहे. तर त्या तुलनेत महाबीजच्या बियाणांचे दर दोन २५० इतके कमी आहेत. त्यामुळे शेतकरी महाबीजची बियाणे खरेदीस प्राधान्य देत आहेत. मात्र बाजारात महाबीज बियाणाचा मुबलक पुरवठा नाही.
Also Read: Covid 19: मराठवाड्यातील प्रसार होतोय कमी; नवीन रुग्ण सातशेच्या आत
शेतकऱ्यांनी महाबीज बियाणे मागितले की शिल्लक नाही असे दुकानदार सांगून हात झटकत आहेत. याकडे निलंगा कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे. महाबीजचे बियाणे उपलब्ध होत नसल्याने नाईलाजाने शेतकरी इतर खाजगी कंपनीचे बियाणे विकत घेत आहेत. सध्या अधूनमधून पाऊस पडत असून शेतकऱ्यांनी मशागत करून जमिनी पेरणीयोग्य करून ठेवली आहे. बियाणे खताची जुळवाजूळव शेतकरी करीत असून नामवंत कंपनीच्या बियाणासाठी भटकंती होताना दिसत आहे.
दरवर्षी कृषी विभागाच्या वतीने कांही शेतकऱ्यांना परमिटवर बियाणे दिले जात होते यंदा बियाणासाठी महाडिबीटी पोर्टलवर आॕनलाईन करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले. त्यात हजारो शेतकऱ्यांनी आॕनलाईनसाठी १०० रुपये खर्च करून अर्ज केला मात्र त्यामध्ये तालुक्यातील फक्त सातशे शेतकऱ्यांची निवड झाली. येथील मारूती कृषी केंद्रात महाबिज कंपनीचे चारशे बॕग बियाणे आले असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी रात्रभर रांगा लावल्या होत्या अखेर पोलिस बंदोबस्तात याबियाणाचे वाटप करण्यात आले.
Esakal