जळगाव : दोन वर्षांपासून रखडलेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या (Shivajinagar flyover) कामाचा जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) गुरुवारी आढावा घेतला. तीन महिन्यांत हे काम काहीही करून पूर्ण करावे, तसेच कामासाठी बंद केलेला सेवारस्ता मोकळा करून द्यावा, अशा सूचना त्यांनी मक्तेदारास दिल्या. (shivajinagar flyover three month working complete order district collector)

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम दोन वर्षांपासून प्रगतिपथावर आहे. कामातील अडथळ्यांमुळे ते रखडले असून, शिवाजीनगरातील रहिवाशांना मोठा वळसा घेऊन फेऱ्याने शहरात यावे लागते. दोन वर्षांपासून ही स्थिती असल्याने रहिवाशांना मोठा त्रास होत असल्याने याबाबत नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार (Citizens complain) केली होती.

अडचणींचा पाढा
त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गुरुवारी या कामाची पाहणी केली. या वेळी मक्तेदाराच्या प्रतिनिधींकडून कामातील अडथळ्यांबाबत सांगण्यात आले. विजेचे खांब, जलवाहिन्या शिफ्टिंगच्या कामाला उशीर लागत आहे. लॉकडाउनमुळे कामगारही गावी निघून गेले, अशा अडचणी मांडण्यात आल्या.

तीन महिन्यांत काम पूर्ण करा
जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी मक्तेदारास पुलाचे काम किती दिवसांत पूर्ण करणार, अशी विचारणा केली. त्यावर मक्तेदाराने पाच-सहा महिने तरी लागतील, असे सांगितल्यानंतर राऊत यांनी कामाचा वेग वाढवून तीन महिन्यांत काम पूर्ण करावे, अशा सूचना केल्या. तसेच या कामासाठी जो रस्ता बंद करण्यात आला आहे, तो तातडीने सुरू करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
या वेळी माजी महापौर नितीन लढ्ढा, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजेंद्रसिंह राजपूत, महावितरणचे अभियंता, मक्तेदार श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक आदित्य खटोड, दीपककुमार गुप्ता आदी उपस्थित होते.
Esakal