पुलंचं नुसतं नाव जरी उच्चारलं, तरी मराठी माणसांच्या मनात आनंदाचं कारंजं सुरू होतं. वक्तृत्व, साहित्य, नाट्य, संगीत, विनोद अशा सर्व कलांमध्ये रममाण होणार्या पुलंनी स्वत: आनंद घेतला आणि रसिकांनाही तो दिला; म्हणून तर आपण पुलंना आनंदयात्री म्हणतो. श्री. म. माटेमास्तर म्हणत, ‘माणूस गेल्यानंतर जितका काळ त्याची आठवण काढली जाते, तितका काळ तो माणूस जिवंत असतो. ’महाराष्ट्रात असा एकही दिवस जात नाही, की ज्या दिवशी पुलंची आठवण निघत नाही. इतकं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं गारूड आजही कायम आहे.
नांदेडच्या नाट्यसंमेलनाचे पुलं अध्यक्ष होते. या संमेलनात आचार्य अत्रे आणि पुलं देशपांडे एका व्यासपीठावर आले होते. त्या वेळेस मराठवाड्यातल्या रस्त्यांची अवस्था फारच बिकट होती. रस्त्यावर असणारे खड्डे, प्रचंड धूळ यांमुळे अत्रे त्रासलेले होते. आपल्या भाषणात त्यांनी राजकर्त्यांवर तोंडसुख घेतले. अत्रे म्हणाले, ‘‘काय हे मराठवाड्यातले रस्ते आणि काय ही धूळ! या धुळीनेच मी हैराण झालो आहे!’’ पुलं भाषणासाठी उभे राहिले. अत्र्यांच्या या भाषणाचा संदर्भ घेत म्हणाले, ‘‘ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली, त्यांना या धुळीची इतकी भीती का वाटावी? ही मराठी भाषेच्या आजोळची धूळ आहे. या धुळीतून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास, जिजाऊ, छत्रपती शिवाजीमहाराज अशी मोठी माणसं गेली आहेत. ही धूळ अंगावर घेत असताना त्या माणसांचे दर्शन आम्हाला घडते आहे, असे वाटते. ज्याला पैठण आवडत नाही असा पुरुष शोधून सापडणार नाही आणि जिला पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही, अशा मराठवाड्यात अत्रेसाहेब आपण आहात.’’ लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सभाशास्त्राचा नियम मोडून अत्रे उभे राहिले. त्यांनी पुलंच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ‘‘मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. महाराष्ट्राला हसवण्याचे काम आता यापुढे पुलंनी करावे. मी मरायला मोकळा झालो आहे.’’ आचार्य अत्र्यांचा शब्द खरा ठरला. अत्र्यांच्यानंतर महाराष्ट्राला हसवण्याचे काम पुलंनी केले.

जीवनातील विसंगती आणि विकृतींकडे दयाबुद्धीने पाहणार्या पुलंच्या विनोदाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या विनोदाने कोणालाही जखमा केल्या नाहीत, बोचकारले नाही आणि रक्तही काढले नाही. पुलंच्या विनोदाने मराठी माणसाला खळखळून हसवताना रसरशीत जीवनदृष्टी दिली. एखाद्या घरंदाज सुनेनं चार-चौघांसमोरून जाताना स्वत:चा पदर सावरत ज्या अदबीनं जावं, तितक्या सभ्यपणे पुलंचा विनोद मराठी समाजात वावरला. शाब्दिक, प्रसंगनिष्ठ, कोटीबाज अशा सर्व प्रकारच्या विनोदाची उधळण पुलंनी केली. उत्तम लेखक उत्तम वक्ते असू शकत नाहीत याची अनेक उत्तम उदाहरणं आपल्याकडं आहेत. लेखणी आणि वाणी ही शब्दशक्तीची दोन्ही रूपं पुलंवर प्रसन्न होती.

बोलताना पुलंचा विनोद एखाद्या कारंजातल्या पाण्याच्या धारेप्रमाणे सहज उसळून येत असे. याचा प्रत्यय त्यांच्या लहानपणापासूनच येत होता. पुलं दहा-अकरा वर्षाचे होते, तेव्हाची गोष्ट. पार्ल्याला टिळकमंदिरात साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांचे ‘गर्व्हमेंट ऑफ इंडिया अॅेक्ट’ या विषयावर व्याख्यान होते व्याख्यानानंतर शंकानिरसनासाठी प्रश्न-उत्तरं सुरू झाली. पुलं म्हणाले, ‘‘फेडरेशन राबविण्याचा मुद्दा पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगाल का?’’ पुलंकडे पाहात केळकर म्हणाले, ‘‘बाळ, तुझ्या वयाला साजेसा प्रश्न विचार.’’ त्यावर पुलं म्हणाले, ‘‘सध्या पुण्यात अंजिरांचा भाव काय आहे?’’ त्यावर न. चिं. केळकर यांनाही हसू आवरले नाही. पुलंनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केलेले होते. एका मुलाखतीत त्याचा संदर्भ देत संवादक म्हणाला, ‘‘यांचे मन वकिलीत रमले नाही.’’ त्यावर पुलं म्हणाले, ‘‘माझे मन वकिलीत रमले नाही असे म्हणण्यापेक्षा आशिलाचे मन माझ्यात रमले नाही’’ असे म्हटले, तर जास्त योग्य ठरेल. ज्याप्रमाणे निष्पक्षपाती न्यायाधीश असतात, त्याप्रमाणे मी निष्पक्षकार झालो असतो, मी वकिली केली असती तर…’’
पुलं आणि सुनीताबाईंनी बा. भ. बोरकर, आरती प्रभू यांच्याप्रमाणेच बा. सी. मर्ढेकर या कवींच्या काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम केले. मुंबईला मर्ढेकरांच्या कवितांचे वाचन पुलं आणि सुनीताबाई करणार होते. मध्यंतरात पुलंना थोडंसं काहीतरी खायला लागायचं. तशा सूचना त्यांनी संयोजकांना दिल्या होत्या. संयोजकांनी ढोकळे, सामोसे, बर्फी असे इतके पदार्थ आणले होते, की ते पाहून पुलं म्हणाले, ‘‘लोक ‘मर्ढेकर’ ऐकायला आले आहेत; ‘ढेकर’ नाही.’’
विजापूरला शाळेत पुलंचे भाषण होते. टेबलावर पाणी नव्हतं. पुलंना ते हवं होतं. संयोजक कळशी व तांब्या घेऊन आले. पुलं. म्हणाले, ‘‘पाणी प्यायला हवंय, आंघोळीला नकोय.’’ जालन्याला पुलंच्या सभेत शेळी शिरली. पुलं म्हणाले, ‘‘येऊ द्या तिला. महात्माजींच्या नंतर प्रथमच तिला सत्य ऐकायला मिळणार आहे.’’
साहित्य आणि समाज यांचा संबंध केवळ लेखक आणि वाचक इतकाच मर्यादित नसतो. त्याच्या पलीकडे जाऊन साहित्यिकांनी समाजासाठी विधायक असे काही केले पाहिजे, हे पुलंनी कृतीतून दाखवून दिले. १९६६ साली पुलं देशपांडे प्रतिष्ठानची स्थापना त्याच उद्देशातून झाली. जिथे उत्तम काम सुरू आहे पण पैशाची अडचण आहे, अशा ठिकाणी पुलं आणि सुनीताबार्इंनी कसलाही गाजावाजा न करता आर्थिक मदत पोचवली. बाबा आमटेंचे ‘आनंदवन’, अनिल अवचटांचे ‘मुक्तांगण’ या संस्थांशी पुलं आणि सुनीताबार्इंचा असणारा स्नेह सर्वश्रुत आहे. ज्या संस्थांची फारशी नावंही कुणाला माहीत नाहीत, अशा अनेक चांगलं काम करणार्याह संस्थांना पुलंनी अर्थसाहाय्य केले. पु. ल. देशपांडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध शेक्षणिक, सांस्कृतिक संस्थांना थोडीथोडकी नव्हे, तर एक कोटी रुपयांची मदत पुलंनी त्यांच्या हयातीत केली. ही सामाजिक जाणीव साहित्यक्षेत्रात अपवादानेच प्रत्ययाला येते. पुलंना समाजाने भरभरून दिले, ते त्यांनी तितक्याच कृतज्ञतेने समाजाला परत केले.
पुलंनी महाराष्ट्राला खळखळून हसवले आणि भरभरून आनंद दिला. त्याचबरोबर निखळ जीवनदृष्टी दिली. विनोदकाराबरोबरच विचारवंत आणि कलावंत म्हणूनही पुलंचे स्थान महत्त्वाचे आहे. ‘विनोदबुद्धीची ढाल हातात असली आणि अंगात रसिकतेचे चिलखत घातले, की जीवनातल्या सगळ्या संकटांना नामोहरम करता येते’, हे जीवनतत्त्व त्यांनी मराठी जनांना हसतखेळत सांगितले.
भाई, पुलं, पीएल, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व अशा विविध रूपांत वावरणारे पु. ल. देशपांडे ही केवळ एक व्यक्ती नाही; ती वृत्ती आहे. या जगातलं दु:ख नाहीसं करता येत नाही; पण ते हलकं करण्याची आस या वृत्तीत होती. या वृत्तीला रसिकतेची आणि शुभंकराची ओढ होती. ‘जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते’ अशा सगळ्या गोष्टींचा ध्यास होता. स्वत: आनंद घेताना तो इतरांनाही मिळावा यासाठी प्रयत्न करायचा, हेच त्यांच्या जीवनाचं सूत्र होतं. त्यांनी स्वत:साठी काहीच साठवलं नाही. उलट, समाजाकडून घेतलेलं समाजालाच वाटून टाकलं. पुलंचे स्मरण करत असताना ही ‘पुलकितवृत्ती’ अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला, तर ते पुलंचं कृतज्ञ भावनेनं केलेलं खरं स्मरण ठरेल.
– प्रा. मिलिंद जोशी (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे)
Esakal