लोणावळा : वीकेंडला पर्यटकांनी गर्दी केल्याने लोणावळा, खंडाळा फुल्ल झाला आहे. कोरोना संसर्गाचा धोका कायम असताना मौजमजा करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने लोणावळा, खंडाळ्यासह लायन्स पॉईंट येथे पर्यटकांची तुडुंब गर्दी पहावयास मिळत आहे.

लोणावळ्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने व्यवसायावर अवलंबून आहे. कोविड-१९ पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळे, हॉटेल्स, रिसाॅर्टंस काही अंशी बंद होती. चिक्की उत्पादक, लहान-मोठे विक्रेते, टुरिस्ट व्यवसायिकांवर सक्रांत आली. मंदीचे सावट असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले होते. त्यात पर्यटकांची वर्दळ वाढल्याने येथील व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Also Read: बाप रे! माळशेज घाटात चहा प्यायला उतरले अन् कारवर कोसळली दरड

सध्या लोणावळा, खंडाळ्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पावसाळी हंगामात वर्षा विहारासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. शनिवारी बोरघाटात, राजमाची पॉईंट, भुशी धरण, तुंगार्ली धरण, नारायणी धाम, एकवीरा, कार्ला, भाजे लेणी, लोहगड, पवना व विशेषतः लायन्स पॉईंट येथे पर्यटकांनी गर्दी केली होती.

”गेले काही विकेंड पर्यटकांची लोणावळा, खंडाळ्यास पसंती मिळत असल्याने गर्दी झाली. सध्या हॉटेल्सपेक्षा खासगी बंगल्याना पसंती मिळत असून मोठी हॉटेल्स, रिसॉर्ट्स वगळता इतर हॉटेलांना सरासरीच प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात पर्यटकांची संख्या नक्की वाढेल” अशी आशा हॉटेल व्यावसायिक आशिष खंडेलवाल यांनी व्यक्त केली.

”कोरोनाचा संसर्ग टाळत सुरक्षित पर्यटनासाठी पर्यटकांनी मास्कचा वापर करावा” असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले.

Also Read: BSF भरती 2021: मुलाखतीद्वारे होणार निवड

कोरोनाची भीती नाहीशी

कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. राज्य सरकारने निर्बंध हळूहळू शिथिल केल्याने लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहे. नगरपरिषदेच्या वतीने खंडाळा एक्झिट येथे चेकपोस्ट लावण्यात आला आहे, मात्र नागरिक फारसे मनावर घेत नसल्याचेच चित्र आहे.

सार्वजनिक ठिकाणी अनेक पर्यटकांना मास्कचा आणि सोशल डिस्टंसिंगचा विसर पडल्याने पुन्हा एकदा कोरोनाची भीती नाहीशी झाल्याचे चित्र असून कोरोनाला निमंत्रण मिळत आहे.

महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा

पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेवर चांगलाच ताण आला होता. लायन्स पॉईंट, पुणे-मुंबई महामार्गावर अपोलो गॅरेज, महावीर चौक, पेट्रोल पंपादरम्यान वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. द्रुतगती मार्गावर बोरघाटात पुण्याकडे येणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here