जुनी सांगवी : जुनी सांगवी मधुबन येथे राहणाऱ्या ऋतुराज गायकवाडची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. आपल्या नैसर्गिक, रेखीव खेळीने क्रिकेट विश्वात ठसा उमटवत येत्या १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या वनडे व टी २० श्रीलंका दौऱ्यासाठी त्याची निवड केली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडमधून भारतीय संघात देशाचे प्रतिनिधित्व करणारा ऋतुराज पिंपरी-चिंचवडचा पहिला खेळाडू आहे. (Pimpri Chinchwad Ruturaj Gaikwad selected for the Indian Cricket team)

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पारगाव नेमाने हे ऋतुराजाचे मुळगाव. वडील नुकतेच लष्कर सेवेतून वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेले तर आई शिक्षिका व ग्रहिणी आहे. २३ वर्षीय ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली. मधुबन जुनी सांगवीच्या मातीत वाढलेल्या या मराठमोळ्या खेळाडूवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Also Read: बाप रे! माळशेज घाटात चहा प्यायला उतरले अन् कारवर कोसळली दरड

आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून आपल्या भारदस्त रेखीव खेळाने क्रिकेट जगतातील तमाम क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधणाऱ्या जुनी सांगवीच्या या सुपुत्राने भारतीय संघात स्थान मिळवले आहे. त्याने पिंपरी चिंचवडच्या दिलीप वेंगसरकर अकादमीतून क्रिकेटचे धडे घेतले. त्याचे प्राथमिक शिक्षण सेंट जोसेफ शाळेत झाले. पुढे माध्यमिक शिक्षण पिंपळे निलख येथील लक्ष्मीबाई नांदगुडे शाळेत झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्रमंडळाच्या शिक्षण संस्थेत झाले. प्रशिक्षक कोच मोहन जाधव, फिटनेस कोच डॉ. विजय पाटील, संदीप चव्हाण, शादाब शेख यांच्या तालमीत ऋतुराजने क्रिकेटचे धडे घेतले.

गतवर्षी त्याला कोरोनाची लागण झाली होती. यातून बाहेर पडत त्याने संधीचे सोने केले. भारतीय संघात स्थान मिळविल्याने चाहत्यांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ऋतुराज सर्वात प्रतिभावान खेळाडू पैकी एक असल्याचं क्रिकेट जगतातून बोलले जाते. वीरेंद्र सेहवाग, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी यांनी त्याच्या खेळाचे कौतुक केले आहे.

Also Read: लोणावळ्यात पर्यटकांची तुडुंब गर्दी; कोरोनाचा पडला विसर

स्थानिक क्रिकेटमध्ये ऋतुराज महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहे. २०१६ साली वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ऋतुराजने रणजी क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केले. स्थानिक क्रिकेट स्पर्धेत चांगल्या कामगिरीच्या जोरावर ऋतुराजला देवधर करंडक भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. तर २०२० सालात ऋतुराजने धडाकेबाज फलंदाजी करून सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडले. भारतीय ‘अ’ संघाकडून खेळताना ऋतुराजने श्रीलंका आणि वेस्ट इंडिज संघाविरुद्ध खेळताना चमकदार कामगिरी केली. याच कामगिरीच्या जोरावर त्याला चेन्नई संघाकडून आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. या हंगामात त्याच्या नैसर्गिक शैलीवर क्रिकेट जगतातून लक्ष वेधले.

”ऋतुराजला त्याच्या तिसऱ्या वाढदिवसाला प्लॅस्टिकची बॅट आणली होती. आज तो देशासाठी खेळताना त्याच्या मेहनतीचे कष्टाचे फळ मिळाल्याचा आनंद होत आहे. ऋतुराजने त्याच्या नैसर्गिक खेळाने देशाचे नाव लौकिक करावे.”

– दशरथ गायकवाड, वडील.

”ऋतुराजने लहानपणापासूनच क्रिकेट खेळाला आपलंसं केले. त्याचे कष्ट, क्रिकेटवरचे प्रेम याचे चीज होताना पाहताना आनंद होत आहे. त्याने देशासाठी खेळत राहावे.”

– सविता गायकवाड, आई

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here