रत्नागिरी : जिल्ह्यात शनिवारी (ता. 13) दिवसभर मुसळधार पाऊस झाला. रत्नागिरीला(ratnagiri)तर पावसाने झोडपून काढले. अन्य तालुक्यात संततधार सुरु होती. पावसामुळे रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचून राहीले होते. तालुक्यातील पावस (pavas)परिसरातील सातपर्या भरुन वाहत होत. पुराचे पाणी आल्यामुळे कमी उंचीच्या कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतुक ठप्प झाली होती.(ratnagiri-heavy-rain-orange-alert-update-marathi-news)
जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 50.42 मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड 64.80 मिमी, दापोली 26.50 मिमी, खेड 45.10, गुहागर 47.30 मिमी, चिपळूण 59.20 मिमी, संगमेश्वर 42.00 मिमी, , रत्नागिरी 55.20 मिमी, राजापूर 58.40 मिमी,लांजा 55.30 मिमी पाऊस झाला. रत्नागिरी तालुक्यातील पानवल येथे स्वप्निल अनंत कांबळे त्यांच्या घराचे वादळी वार्यामुळे पत्रे उडून अंशतः नुकसान झाले आहे.
हवामान विभागाकडून 15 जुनपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज दुपारपर्यंत पावसाचा लवलेशही नव्हती. त्यानंतर वेगवान वार्यासह मुसळधार पाऊस सुरु झाला. राजापूर, सगंमेश्वर, खेड तालुक्यासह दापोलीत सरी कोसळत होत्या. दिवसभरात काही वेळ ढगाळ वातावरण तर काही वेळ स्वच्छ सूर्यप्रकाश पडलेला होता. मंडणगडात पडलेल्या पावसामुळे भारजा व निवळी नद्या प्रवाहित झाल्या; परंतू पाणी पातळी वाढलेली नव्हती.
हेही वाचा- ‘मराठा आरक्षणाबाबत केंद्राकडे बोट, हे सरकार राज्याचं वाटोळ करणार’
चिपळूण शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सकाळपासून दमदार पाऊस झाला; मात्र दुपारनंतर जोर ओसरला. त्यामुळे शिवनदी आणि वाशिष्ठी नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली. रत्नागिरी तालुक्यात सकाळच्या सत्रात कडकडीत उन होते. दुपारनंतर वातावरण बदलले आणि मुसळधार सरींना सुरवात झाली. वेगवान वार्यासह धुवाधार पाऊस पडला. अतिवृष्टी पडणार अशीच स्थिती निर्माण झाली होती. दोन तासानंतर जोर ओसरला. काजळी नदीची पाणी पातळी सायंकाळी 12.06 मीटर इतकी होती. ती धोक्याच्या पातळीपेक्षा चार मिटरने कमी होती. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.


(छाया : राजवैभव, राऊत, संगमेश्वर)



(छाया : सर्व मकरंद पटवर्धन, सकाळ छायाचित्रसेवा)


(छाया : संदेश पटवर्धन)
Esakal