कोरोनाविषयीच्या गैरसमजांपोटी अन् भीतीपोटी सरकारी दवाखान्यात उपचारांसाठी यायला आदिवासी बांधव धजावत नव्हते. एवढंच नव्हे तर, उपचारासाठी दूरवरच्या दवाखान्यात जाण्यापेक्षा घरीच राहिलेलं बरं, अशी त्यांची पक्की धारणा झालेली होती. नेमक्या अशा परिस्थितीत नाशिकचे वैद्य विक्रांत जाधव यांनी, ज्या उपचारांवर आदिवासींचा विश्वास आहे आणि जे उपचार घेण्याची त्यांची तयारी आहे, असे आयुर्वेदिक उपचार आदिवासी भागात पोहोचवले. त्यातून पुढं आलेला कोरोनामुक्तीचा ‘सुरगाणा पॅटर्न’ राज्यात चर्चेत आला, त्याविषयी…
आदिवासी बांधवांमध्ये आर्थिक अडचणी भल्या मोठ्या. त्यातच भाबडेपणा अधिक. नेमकं हेच हेरून भगतबाबांनी आणि बोगस डॉक्टरांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हात धुऊन घ्यायला सुरुवात केली. अनेक भागांत काविळीचे गावठी इलाज सुरू झाले. त्याचा परिणाम असा झाला, की घरी राहून अंथरुणाला खिळून राहणाऱ्या रुग्णांची संख्या गुजरात सीमेलगतच्या निसर्गरम्य सुरगाणा (जि. नाशिक) तालुक्यात वाढत गेली. घरी राहून तब्येत अधिक बिघडत गेली आणि मृत्यूंची संख्या वाढली. आदिवासी बांधवांच्या लोकप्रतिनिधींनी बोगस डॉक्टरांविरुद्ध आवाज उठवल्यानं आरोग्य विभागानं गुन्हे दाखल केले. एका भगताला कोरोनाची लागण झाल्यानं इतरांनी धूम ठोकली. दुसरीकडे ‘दवाखान्यात माणसं मरतात’ ही गुजरातमधून उठलेली हाकाटी इथल्या आदिवासींपर्यंत पोहोचल्यानं आदिवासी बांधव ‘दवाखान्यात जाऊन काय उपयोग, घरी राहिलेलं बरं’ असं म्हणत राहिले. त्यात भर आणखी एक पडली व ती म्हणजे ‘डॉक्टर पॉझिटिव्ह काढतात’, असा गैरसमज पसरला आणि दवाखान्यात कोरोनाच्या चाचणीप्रमाणे उपचारांसाठी जाणं अनेकांनी बंद केलं. परिणामी, सुरगाणा तालुक्यातील बोरगाव, बुबळी, आंबुपाडा-बाऱ्हे, माणी, मनखेड, पांगारणे, पळसन, उंबरठाण या प्राथमिक आरोग्यकेंद्रांच्या जोडीला उपकेंद्र, फिरती पथकं, बैठी पथकं यांच्यामधील ‘ओपीडी’ची संख्या कमी होत गेली. पाड्यावर कोरोनाची चाचणीसाठी येणाऱ्या आरोग्यकर्मचाऱ्यांच्या-डॉक्टरांच्या पथकाला आदिवासी बांधव हाकलून देऊ लागले.

१) सुरगाणा : शिंदे गावात आदिवासी बांधवांशी संवाद साधताना वैद्य विक्रांत जाधव, नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड. समवेत आमदार नितीन पवार, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपील आहेर.
२) काठीपाडा : महिलेची तपासणी करताना उंबरठाण प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश चौधरी.
३) नाशिक : सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या आरोग्याची तपासणी केल्यानंतर रुग्णांशी आणि सरकारी डॉक्टरांशी ऑनलाइन संवाद साधताना वैद्य विक्रांत जाधव.
४) पांगारणे : रुग्ण महिलेची आरोग्यकेंद्रात तपासणी करताना वैद्यकीय अधिकारी डॉ. चैतन्य बैरागी.
अशा आरोग्याच्या दृष्टीनं बिकट होत असलेल्या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी सुरगाणा-कळवणचे आमदार नितीन पवार यांनी धावाधाव सुरू केली. गृहविलगीकरणात आपल्या बांधवांना कसा दिलासा देता येईल यादृष्टीनं त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी विचारविनिमय सुरू केला. आदिवासींचा ज्या उपचारांवर विश्वास आहे आणि जे उपचार घेण्याची त्यांची तयारी आहे, अशा आयुर्वेदिक उपचारांचा चांगला फायदा होईल हे त्या विचारविनिमयातून समजलं आणि मग त्यानंतर पवार यांनी वैद्य विक्रांत जाधव यांची भेट घेतली.
तालुक्यातील विविध भागांतील प्रश्नांची त्यांना माहिती दिली; पण सगळ्यात मोठी अडचण होती व ती म्हणजे, आदिवासी बांधवांच्या उपचारपद्धतीवरील खर्चाचं काय करायचं? वैद्य जाधव यांनी आयुर्वेदिक उपचार मोफत देण्याची तयारी दर्शवली; पण व्यवस्थेचं काय? यावर उपाय शोधण्यासाठी दोघांनी नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपील आहेर यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी जिल्हा परिषदेच्या आरोग्ययंत्रणेचं सहकार्य मिळवून देण्यावर एकमत झालं. मग आयुर्वेदीय पद्धतीचा स्वीकार होईल काय हे जाणून घेण्यासाठी थेट आदिवासी बांधवांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला गेला आणि पवार, वैद्य जाधव, क्षीरसागर, बनसोड, डॉ. आहेर यांनी सुरगाणा तालुका गाठला. माजी आमदार जे. पी. गावीत आणि भारतीय जनता पक्षाचे एन. डी. गावीत, सुरगाणा पंचायत समितीचे उपसभापती इंद्रजित गावीत या तिघांनीही ‘आयुर्वेदीय उपचारपद्धतीचा आपल्या बांधवांना फायदा होईल,’ असा विश्वास वैद्य जाधव यांना सुरगाणा तालुक्यातील प्रवासातील भेटीच्या वेळी दिला होता.
आरोग्य सेवेतील लोकसहभाग
सुरगाणा तालुक्यातील शिंदे गावातील आदिवासी बांधवांच्या थेट संवादातून गैरसमजांचा आणि भीतीचा उलगडा झाला. कोरोना झाल्यावर गावातील लोक काय म्हणतील या भीतीनं आदिवासी बांधवांना ग्रासल्यानं ते उपचारांसाठी सरकारी दवाखान्यात जात नाहीत, ही बाब संवादातून प्रकर्षानं पुढं आली. मोहपाडा, काठीपाडा इथल्या आदिवासी बांधवांशीसुद्धा संवाद साधला गेला. तिन्ही गावांतून आदिवासी बांधवांमध्ये आयुर्वेदाबद्दलची आपुलकी, आस्था, विश्वास, स्वीकारार्हता असल्याचं अधोरेखित झाल्यानं हा उपक्रम राबवण्याचं निश्चित झालं. डॉ. आहेर यांनी सुरगाणा तालुक्यातील सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांशी वैद्य जाधव यांचा ऑनलाइन संवाद घडवून आणला. त्यात सरकारी डॉक्टरांनी, आयुर्वेदातून आदिवासी बांधवांना कोरोनाच्या महामारीत दिलासा मिळू शकतो, असा विश्वास देत असतानाच उपक्रमात सक्रिय सहभागाचीही तयारी दर्शवली. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आणि ‘मानसेवी’सोबतच समुदाय आरोग्याधिकारी यांतील बहुतांश डॉक्टर हे आयुर्वेदाचे स्नातक आहेत.
मुळातच, कुठलाही उपक्रम राबवायचं म्हटल्यावर ४८ तासांत कसल्याही प्रकारचा व्यत्यय न येता, तेही सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून, तितकंसं शक्य नसतं; पण हे आरोग्यसेवेतील लोकसहभागामुळे सहज शक्य झालं. सरकारी डॉक्टरांनी दवाखान्यात येणाऱ्या आणि दवाखान्यात न येणाऱ्या रुग्णांची घरी तपासणी करायची…तपासणीत आढळणाऱ्या आरोग्यविषयक लक्षणांची नोंद करायची…त्यानंतर त्याच डॉक्टरांनी ‘टेलीमेडिसिन’ पद्धतीमध्ये ऑनलाइन रुग्णांचा वैद्य जाधव यांच्याशी संवाद घडवायचा…वैद्य जाधव यांनी ऑनलाइनमध्ये रुग्णांकडून, त्यांना होणारा त्रास जाणून घ्यायचा आणि आरोग्याच्या लक्षणांच्या आधारे सुरगाण्यात मोफत आयुर्वेदिक औषधं उपलब्ध करून द्यायची…अशी प्रक्रिया डॉक्टरांशी संवादाच्या वेळी निश्चित झाली. ता. १७ मे २०२१ रोजी उपक्रमाला सुरुवात झाली.
आदिवासी बांधवांशी त्यांच्या गावात जाऊन संवाद साधत असताना शिंदेमध्ये ‘कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण उपचारासाठी दवाखान्यात जात नाहीत, घरीच राहिले आहेत,’ अशी माहिती सरकारी डॉक्टरांनी दिल्यावर वैद्य जाधव यांनी त्यांच्याकडून रुग्णांची आरोग्यविषयक लक्षणं आणि सद्यस्थिती जाणून घेतली. त्यानंतर स्वतःबरोबर आणलेली आयुर्वेदिक औषधं त्या डॉक्टरांकडे सोपवली. त्यानंतर काठीपाडामध्ये गुजरातमधील रुग्णालयातून सुरगाण्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल व्हायला निघालेल्या ज्येष्ठांची तपासणी सरकारी डॉक्टरांसोबत वैद्य जाधव यांनी केली. सुरगाण्याकडे जाण्यापूर्वी वैद्य जाधव यांनी त्यांना स्वतःकडील औषधं दिली.
या दोघांच्या ऑक्सिजनपातळीत सुधारणा होत असल्याची माहिती नातेवाइकांनी आपल्या भागात सांगायला सुरुवात केली. ही ‘माऊथ पब्लिसिटी’ सोशल मीडियातून आदिवासींपर्यंत पोहोचली. तोपर्यंत सरकारी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीतून कोरोनाग्रस्त कुटुंबातील एका सदस्यानं घेतलेल्या आयुर्वेदिक औषधांचा चांगला फरक जाणवू लागल्यानं त्या कुटुंबातील इतर सदस्यांनी आयुर्वेदिक औषधांना पसंती द्यायला सुरुवात केली. त्यातून सरकारी दवाखान्यातील उपचारांकडे आदिवासी बांधवांचा ओढा वाढीस लागला.
आयुर्वेदिक औषधांचं ‘कॉम्बिनेशन’
विशेष म्हणजे, आदिवासी बांधवांची दवाखान्यात अथवा घरी जाऊन तपासणी केल्याच्या दिवशी सुरगाण्यातून वैद्य जाधव यांनी उपलब्ध करून दिलेली मोफत आयुर्वेदिक औषधं त्याच दिवशी रुग्णांपर्यंत सरकारी डॉक्टरांनी, आरोग्यकर्मचाऱ्यांनी पोहोचवली. सायंकाळपासून उपचारांना सुरुवात झाली. सरकारी डॉक्टरांनी, आरोग्यकर्मचाऱ्यांनी, रुग्णांची तब्येत सुधारते की काही अडचणी येताहेत, याची दिवसाआड रुग्णापर्यंत जाऊन माहिती घ्यायला सुरुवात केली. आरोग्याचा हा उपक्रम जसजसा पुढं जात राहिला तसतसं मृतांची संख्या रोखण्याच्या जोडीलाच कोरोनामुक्तीचंही प्रमाण वाढत चाललं. मॉन्सून धडकत असताना सुरगाणा तालुका कोरोनामुक्तीच्या उंबरठ्याशी ठेपला. त्याच वेळी आदिवासी आणि सरकारी डॉक्टर यांच्यामधील दुरावा संपुष्टात येत ऋणानुबंध बळकट होऊ लागले आहेत. आयुर्वेदिक चिकित्सेविषयीचं व उपचारपद्धतीविषयीचं सरकारी डॉक्टरांना प्रशिक्षण मिळत आहे. ‘आयुर्वेदीय उपचार फार काळ चालतात, गुण यायला वेळ लागतो,’ हा समज दूर व्हायला मदत झाली. ‘आजारावरील उपचारांत आयुर्वेदिक औषधांच्या ‘कॉम्बिनेशन’चा चांगला परिणाम झाला,’ असं वैद्य जाधव यांनी म्हटलं आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही कोरोनाविषयक उपाययोजनांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत या उपक्रमाची माहिती देत ‘जिल्ह्यातील इतर आदिवासी भागांत अशा पद्धतीच्या उपचारांचा उपयोग करावा,’ अशा सूचना यंत्रणांना दिल्या आहेत.
Esakal