‘आकडेवारी फसवी असते, ती काहीही चित्र निर्माण करते,’ असं म्हणत सुनील छेत्रीनं सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोलच्या क्रमवारीत लिओनेल मेस्सीपेक्षा मिळवलेलं सरस स्थान दुर्लक्षित करणं अयोग्य होईल. मेस्सी आणि छेत्रीची आंतरराष्ट्रीय फुटबॉल कौशल्यात, तसंच सामन्यात वर्चस्व राखण्यात तुलनाच होऊ शकत नाही हे कुणीही मान्य करेल. मात्र, त्याच वेळी छेत्री सार्वकालिक सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोलच्या क्रमवारीत अव्वल दहामध्ये येतो हे नक्कीच महत्त्वाचं आहे.
जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ असलेला फुटबॉल क्रिकेटवेड्या भारतात दुर्लक्षित आहे. अशा स्थितीतही त्यात छेत्रीनं स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. मेस्सी घडला तो बार्सिलोनासारख्या व्यावसायिक क्लबच्या फुटब़ॉलपटू घडवणाऱ्या यंत्रणेतून.
हा खेळाडू अर्जेंटिनाचा असल्याची जाणीव अनेक क्रीडारसिकांना, त्यानं विश्वकरंडक अथवा कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिनाकडून खेळण्यास सुरुवात केल्यावर होते. अगदी रॉबर्टो लेवांडोवस्की हा जर्मनीचा नव्हे तर पोलंडचा फुटबॉलपटू असल्याची जाणीव करून द्यावी लागते. त्याचप्रमाणे. केवळ खेळाडूचं कौशल्यच त्याची प्रगती घडवत नसतं, तर वातावरण, त्याला लाभणारं प्रोत्साहन, खेळाला असलेली मान्यता या गोष्टीही त्याला कारणीभूत असतात. मेस्सीच्या तुलनेत छेत्रीला कमी लेखताना हेही लक्षात घ्यायला हवं.
सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत छेत्रीनं मेस्सीला माग टाकलं आहे; पण तो कधीही ‘मेस्सीपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत,’ असा दावा करत नाही. त्याचा तो स्वभाव नाही.

‘मेस्सी हा फुटबॉलमधील देव आहे. त्याच्याशी माझी तुलनाच होऊ शकत नाही,’ असं छेत्रीनं अनेकदा सांगितलं आहे. आताही भारतानं बांगलादेशला पराजित केलं, त्यानंतर याबाबत त्याला चर्चा करता आली असती; पण त्यानं ‘माझे एकूण किती गोल झाले, याची चर्चा आपण मी निवृत्त झाल्यावर करू’ असं म्हटलं आहे. त्याच्या वाढत्या वयामुळे अनेक परदेशी मार्गदर्शकांना तो सुरुवातीला ओझं वाटतो; पण एकदा का संघाची सूत्रं पूर्ण स्वीकारल्यावर, खेळाडूंसह सराव सुरू केल्यावर, खरा तरुण कोण आहे, खरा जोश कुणात आहे, याची त्यांना कल्पना येते.
‘मी किती वर्षं खेळत आहे, याची चर्चाच मला करायची नाही. मी संघातून लवकर दूर जाणार नाही. मी अजूनही पू्र्णतः तंदुरुस्त आहे. माझ्या संघातील खेळाडूंना मी याबाबत आव्हान देऊ शकतो. जोपर्यंत कुणी माझ्यापेक्षा सरस खेळ करून गोल करत नाही, तोपर्यंत मी संघातच असणार आहे…’ सतरा वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द असलेला छेत्री सांगतो.
छेत्री भारतीय फुटबॉलचा निरोप घेईल त्या वेळी, जगातील सार्वकालिक सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल केलेल्या खेळाडूंमध्ये आपण असावं, हेच त्याचं लक्ष्य असणार. जागतिक फुटबॉलमध्ये त्यामुळे भारताला ओळख नक्कीच मिळणार आहे. आज कतारविरुद्धच्या लढतीत भारताचा गोलरक्षक गुरप्रीत युरोपीय लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना गोलपासून रोखतो, त्या वेळी ते विचारतात, ‘तू युरोपीय लीगमध्ये का खेळत नाहीस?’
भारतीय खेळाडू लक्षवेधक कामगिरी करत असल्याची खात्री अशा वेळी पटते. छेत्री वयाची पस्तिशी पार केल्यावरही सर्वोत्तम खेळासाठी या सर्वांना प्रेरणा देत आहे…ते त्याचं मोठेपण आहे. भविष्यात येणाऱ्या फुटबॉलपटूंना छेत्रीचं हे ‘टॉप टेन’मधील स्थान नक्कीच प्रेरणा देईल. त्यादृष्टीनं छेत्रीनं गोलच्या क्रमवारीत मेस्सी, लेवांडोवस्की यांसारख्या स्टारना मागं टाकणं आवश्यक आहे. या क्रमवारीत ख्रिस्तियानो रोनाल्डो, पेले, मेस्सी यांच्यासारख्या खेळाडूंबरोबरच छेत्रीसुद्धा आहे ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.
विश्वकरंडक पात्रतेत भारताचं गोल-अर्धशतक
छेत्रीनं बांगलादेशविरुद्ध दोन गोल करत सध्या खेळत असलेल्या खेळाडूंतील सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत दुसरं स्थान मिळवलं, तसंच विश्वकरंडक पात्रता स्पर्धेतील भारताचं गोलांचं अर्धशतकही पूर्ण केलं. या स्पर्धेत छेत्रीनं ९ गोल केले आहेत, त्यापाठोपाठ आय. एम. विजयन (५), जो पॉल आंचेरी (४), व्ही. पी. साथ्यन (३) आहेत.
Esakal