पुणे – तांत्रिक प्रवेश योजने अंतर्गत लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (Military Engineering College) (सीएमई) ३७ व्या तुकडीतील कॅडेट्सचा दीक्षान्तसंचलन सोहळा (Convocation Ceremony) शनिवारी पार पडला. यामध्ये भारतासह भूतानचे तीन आणि श्रीलंकेच्या दोन कॅडेट्सचा समावेश होता. यावेळी सीएमईचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी. पी मल्होत्रा यांनी दीक्षान्त सोहळ्याची पाहणी करत कॅडेट्सची मानवंदना स्वीकारली. (Convocation Ceremony of 37th Battalion of Military Engineering College Concluded)
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर हा सोहळा मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. तर ऑनलाइन माध्यमातून सर्व पालकांना या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या दीक्षान्त संचलन सोहळ्याचे नेतृत्व कॅडेट कॅप्टन अभिषेक चौहान यांनी केले होते. तर प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कॅडेट्सना यावेळी लेफ्टनंट जनरल मल्होत्रा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी साहिल कुमारला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आला. तसेच भूतानच्या सोनम शेरिंग आणि प्रिंस कुमार सिंह यांना रौप्य आणि कांस्य पदक मिळाले. तर इको प्लाटून हे ‘जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ बॅनर’चे मानकरी ठरले.

भारतीय लष्करामधील उत्कृष्ट तांत्रिक संस्था म्हणून सीएमई पुढे येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि अभियांत्रिकी शाखेतील नवनवीन प्रयोगांच्या दिशेने महाविद्यालयाची वाटचाल होत आहे. अभियांत्रिकीमधील सर्वोत्तम पद्धती आत्मसात करण्यासाठी आणि भारतीय लष्करामध्ये नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवण्यासाठी महाविद्यालयाने शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांशी सामंजस्य करार केला आहे. याचाच एक भाग म्हणून ‘आयडेक्स फॉर फौजी’ (iDEX4fauji) आणि ‘आर्मी डे परेड’ सारख्या व्यासपीठाच्या माध्यमातून यावर्षी महाविद्यालयातील अनेक प्रकल्प प्रदर्शित करण्यात आले होते. त्यातील उत्कृष्ट प्रकल्पांना पुरस्कार देण्यात आले.
‘सैन्याचे उज्ज्वल भविष्यासाठी अशा तरुणांची गरज आहे. युवा सैन्य अधिकारी म्हणून नियुक्त होताना सर्व जबाबदाऱ्यांना योग्यरीत्या पार पाडणे गरजेचे आहे. यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण झाल्यामुळे लवकरच आता हे कॅडेट्स लष्करात अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. त्यामुळे निःस्वार्थपणे देशसेवा व संरक्षणाच्या महत्त्वपूर्ण जबाबदारीला पूर्ण करत मूल्ये आणि नीतिशास्त्र आत्मसात करावेत.’’
– लेफ्टनंट जनरल पी. पी मल्होत्रा
Esakal