सातारा : भुयारी गटार योजनेचा ठेकेदार आणि पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याची ऑडिओ क्लीप नुकतीच व्हायरल झाल्यानंतर बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसले असून, त्या आपल्या पदाचा राजीनामा आज (रविवारी) मुख्याधिकारी अभिजित बापट यांना देणार आहेत. या अनुषंगाने त्यांनी उदयनराजे यांना दिलेल्या पत्रात दोन जादुगार, बगलबच्च्यांमुळे प्रतिमा मलिन होत असून, दोन ‘कर’ साताऱ्याची वाट लावत असल्याचे म्हटले आहे. (satara-news-bjp-corporator-siddhi-pawar-demands-forgiveness-to-udayanraje-bhosale)
भुयारी गटार योजनेच्या कामादरम्यान पडलेल्या भिंतीची दुरुस्ती करण्याच्या वादावरून बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी एक जूनला फोनवर ठेकेदारास सुनावले होते. त्याची क्लीप शुक्रवारी व्हायरल झाल्यानंतर साताऱ्यात खळबळ उडाली होती. याची दखल घेत खासदार उदयनराजेंनी विकासकामांत अडथळा आणणाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्याच्या सूचना मुख्याधिकारी अभिजित बापट यांना केल्या होत्या. याच अनुषंगाने शनिवारी त्यांनी १६ मार्च रोजी खासदार उदयनराजेंना उद्देशून लिहिलेले राजीनामा पत्र माध्यमांना सादर केले. यात त्यांनी उदयनराजेंमुळेच मला काम करण्याची संधी मिळाली. ते साताऱ्याची शान आहेत. मात्र, त्यांच्या नावाचा गैरफायदा घेत काही जण पालिकेच्या कामात हस्तक्षेप करत आहेत.
Also Read: आंदाेलन वगैरे करणे ही फालतूगिरी आता जाब विचारा जाब : उदयनराजे
आजूबाजूला असणाऱ्या बगलबच्च्यांमुळे उदयनराजेंची प्रतिमा मलिन होत असून, त्यांना खरी माहिती देण्यात येत नाही. आजूबाजूला असणाऱ्यांना महाराजांचे चांगले करायचे आहे का वाटोळे हा प्रश्न मला नेहमी पडतो. स्लो पॉयझनिंग करून संपविणाऱ्या व्यक्तींना महाराजांनी ओळखणे आवश्यक आहे. महाराजांनी, मालकांनी सांगितलंय, जास्त बोलू नका, भेटू नका, असे सांगत बगलबच्च्यांनी महाराजांना नजरकैदेत ठेवल्याचा भास मला होत आहे. सभापती असतानाही माझ्या विषयांना विषयपत्रिकेत स्थान देण्यात येत नाही, हे गेली चार वर्षे सुरू आहे. पदाला चिकटून राहणारी मी नसून उदयनराजेंच्या नावाचा गैरवापर करत दोन जादूगार त्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
Also Read: केंजळगडावर ट्रेकिंग करताना दरीत कोसळून दहा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी
याबाबत पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की मी १६ मार्चला लिहिलेले राजीनामापत्र १६ एप्रिलला उदयनराजेंना दिले होते. त्या वेळी ते गोव्याला निघाले होते. त्यांनी पंधरा दिवसांनी आल्यानंतर बैठकीअंती मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते, मात्र मार्ग न निघाल्याने माझा नाइलाज होत आहे. आघाडीप्रमुख म्हणून मी त्यांच्याकडे राजीनामा दिला असला, तरी तो रीतसर रविवारी अभिजित बापट यांच्याकडे सोपविणार आहे.

उदयनराजेंच्या आजूबाजूला दोन जादूगार असून, ते ऐनवेळी कुठेही प्रकट होतात. ते कुठलेही टेंडर अचानक बदलतात. त्यांची जादू आम्ही काय बघायची. त्यांची अदृश्य दहशत आहे. आम्ही ती दहशत मानत नसल्याने मला त्रास देण्यात येत आहे. असेच करा, तसेच करा अशी दहशत हे दोन जादूगार करत असतात. खरे तर त्यांनी आपली जादू चांगल्या कामांसाठी वापरावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
Also Read: उदयनराजेंकडून व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल
महाराजसाहेब मला माफ करा; पण मी काही खंडण्या मागितल्या नाहीत. जनतेच्या, सामान्य सातारकरांच्या मनातील आक्रोश मी मांडला. मान्य आहे; रागाच्या भरात तोल सुटला. शब्द चुकले असतील; पण समोरच्याला हीच भाषा समजत असेल, तर मी काय करणार?
– सिद्धी पवार
Esakal