तात्काळ प्रश्न मार्गी न लावल्यास उपोषणाचं शस्त्र उगारण्याचेही संकेत
मुंबई: संजय गांधी उद्यानातील वस्त्या, चाळी तसेच आदिवासी पाड्यांमधील नागरिकांना मूलभूत सोयी मिळत नसल्याबाबत अनेकदा अर्ज, विनंतीपत्रे देऊनही प्रश्न सुटत नसल्याने चित्र आहे. अशा परिस्थितीत सरकारने तात्काळ याप्रश्नी मार्ग काढला नाही, तर उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला. या प्रश्नांबाबत त्यांनी आज भाजपच्या शिष्टमंडळासह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक तसेच वनसंरक्षक आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या नागरिकांच्या मूलभूत सोयींसह त्यांच्या पुनर्वसनाचा संघर्ष अनेक वर्षे सुरु आहे. गेले दीड वर्ष सातत्याने पत्रव्यवहार करून सरकार प्रतिसाद देत नसल्याने रहिवाशांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.
Also Read: मुंबईचा Positivity रेट 2.5 टक्क्यांवर पण ‘ही’ आहे चिंतेची बाब
नुकताच परवाच्या अतीवृष्टीत दहिसरच्या केतकीपाडयामध्ये तीन घरे कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला. या सर्व पाड्यांमधील आणि वस्तीतील लोक आजही जीव मुठीत धरून राहत आहेत. त्या ठिकाणी पाणी माफिया आणि वीज माफिया या गरिबांची लूट करीत आहेत. या नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा आणि पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला नसल्याने सर्वांचीच सहनशक्ती संपली आहे. हे प्रश्न तत्काळ न सोडविल्यास उपोषणाशिवाय दुसरा मार्ग राहणार नाही, असेही ते म्हणाले.

Also Read: “औषधांवरीस GST कमी करून काही होणार नाही, त्यापेक्षा…”
या परिसरातील आदिवासी पाडे आणि वस्त्यांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वेक्षण व्हावे. येथे शौचालय, पिण्याचे पाणी, वीज, रस्ते इत्यादी मूलभूत सुविधा तात्काळ मिळाव्यात. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ सोडवावा. पाणीमाफीया, वीजमाफीयांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी पाणी जोडणी व वीज जोडणी अधिकृतपणे द्यावी, अशा मागण्यांचे निवेदन दरेकर तसेच नगरसेवक प्रकाश दरेकर आदींनी यावेळी दिले.
(कृष्णा जोशी)
Esakal