वाई (जि. सातारा) : वाई शहरात सध्या काेविड 19 चे रुग्ण संख्या 83 टक्के झाली असल्याने संपुर्ण वाई शहर आणि शहरा लगतचा भाग प्रतिबंधित न करता ज्या प्रभागात रुग्ण आढळून आले आहेत. त्या त्या प्रभागातील भागात सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घाेषित करण्याचा निर्णय प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चाैगुले यांनी घेतला आहे. त्यानूसार उद्यापासून (साेमवार) वाई शहर व परिसरातील बहुतांश भाग सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात असणार आहे. परिणामी या भागातील व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे. (covid19-paitents-decreased-wai-unlock-monday-satara-news)
काेरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने वाई शहरातील प्रतिबंधित क्षेत्राच्या अटी व नियम शिथिल करण्याबाबत आमदार मकरंद पाटील यांनी स्थानिक प्रशासन आणि वाई व्यापारी महासंघाच्या पदाधिकारी यांच्यामध्ये नुकताच संवाद घडवून आणला. या वेळी संपूर्ण शहाराऐवजी ज्या भागात बाधित रुग्ण आढळत आहेत, त्या भागापुरता सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र करून जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार किराणा माल, भाजी विक्री, डेअरी, बेकरी व इतर आवश्यक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रांताधिकाऱ्यांनी आदेश जारी केला. मात्र, संपूर्ण जिल्ह्यात विकेंड लॉकडाउन असल्याने त्याची कार्यवाही उद्यापासून सोमवार (ता. १४) सुरू केली जाणार आहे.
Also Read: ग्रामस्थांनाे! 15 ऑगस्ट पर्यंत काेयनेतील तराफा सेवा बंद
येथील विश्रामगृहात आयाेजिलेल्या बैठकीस प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार रणजित भोसले, पालिका मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ उपस्थित होत्या. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २७ एप्रिलपासून संपूर्ण वाई शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, आस्थापना बंद आहेत. शहरातील सर्व व्यवहार ठप्प असल्याने व्यापारी वर्गाचे आर्थिक नुकसान होत आहे. आता शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्रातील अटी व नियम शिथिल कराव्यात, अशी मागणी व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी केली हाेती.
लॉकडाउनच्या काळात सर्व व्यवहार बंद असताना रुग्ण आणि बाधितांची संख्या वाढत आहे. याचाच अर्थ कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून शासनाने घातलेल्या निर्बंधांचे पालन अजूनही नागरिक करीत नाहीत. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्राचा निर्बंध उठविल्यानंतर संसर्ग वाढल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न स्थानिक प्रशासनाने उपस्थित केला. त्यावर कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी व्यवसाय करताना शासनाने ठरवून दिलेल्या वेळेचे, मास्कचा वापर व सामाजिक अंतर या नियमांचे काटेकोर पालन करण्याची, सर्व व्यापारी, कर्मचारी यांची कोरोना चाचणी करून घेण्याची ग्वाही व्यापारी प्रतिनिधींनी दिली. या वेळी सचिन फरांदे, अशोक लोखंडे, हेमंत येवले, अजित वनारसे, भवरलाल ओसवाल, उमेश शहा यांनी व्यापाऱ्यांची बाजू मांडली. याप्रसंगी व्यापारी व काही पालिका पदाधिकारी उपस्थित होते.
Also Read: पहिल्याच पावसात कोयनेतील पाऊस माेजण्याची यंत्रणा ठरली फेल
वाई शहरातील रुग्ण संख्या कमी झाल्याने शहर प्रतिबंधित क्षेत्र न करता सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात रविवार पेठ भाग 1, फुलेनगर, रविवार पेठ भाग 2, ब्राम्हणशाही, रामडाेह आळी, गणपती आळी, गंगापूरी, धर्मपूरी, सिद्धनाथवाडी, दत्तनगर धाेमकाॅलनी, साेनगिरवाडी याचा समावेश आहे. त्यानूसार नवा आदेश काढण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.
भाजी विक्रेत्यांना प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य भागात पूरेसे अंतर ठेवून बसविण्याची व्यवस्था वाई पालिका करेल.
बाजार क्षेत्रातील एका रांगते असलेली किराणा मालाची दुकाने ही एका आड एक दिवस याप्रमाणे उघडता येतील. त्यानूसार संबंधित विक्रेत्यांना सम-विषम तारखेनूसार दुकाने सुरु ठेवावीत.
दुकानदार आणि त्याचे कर्मचा-यांनी येत्या 10 दिवसांत लसीकरण करणे बंधनकारक आहे.

वाईतील एक जानेवारीपासून नऊ जून अखेरची स्थिती
एकूण काेविड रुग्ण – 1450
एकूण पाॅझिटिव्ह दर (45 हजार लाेकसंख्या धरुन) 3.22 टक्के
एकूण मृत्यू – 42
एकूण मृत्यू दर – 2.90 टक्के
एकूण रुग्ण बरेहून घरी परतले 1357
सध्या उपचारार्थ रुग्ण 51
हाेम आयसाेलेशनमध्ये असलेले रुग्ण 1234
हाेम आयसाेलेशन कालावधी पुर्ण झालेले रुग्ण 1205
सध्या हाेम आयसाेलेशनमध्ये असलेले रुग्ण 29
Esakal