कोरोना महासाथीच्या काळात चे गवेराच्या आरोग्यविचारांचा पुन्हा खोलात जाऊन अभ्यास व्हायला हवा. क्युबामध्ये १९५९मध्ये फुलगेन्सीओ बतिस्ता या हुकूमशहाचा पाडाव करून फिडेल कॅस्ट्रो व चे गवेरा यांनी तरुणांना घेऊन क्रांती केली.

क्युबासारख्या छोट्या देशांमध्ये अमेरिकेसारख्या मोठ्या देशापेक्षाही कोरोना काळात चांगले व्यवस्थापन करण्यात आले. यामागे त्यांचा आरोग्य दृष्टिकोन तर आहेच; पण क्रांतिकारक डॉ. अर्नेस्तो चे गवेरा याने क्युबामध्ये घालून दिलेला सामाजिक चिकित्साशास्त्राचा (सोशल मेडिसिन) पाया प्रामुख्याने कारणीभूत आहे. त्याच क्रांतिकारक चे गवेराचा १४ जून हा जन्मदिन आहे.

छापामार युद्ध, राजकीय क्रांती विषयाचे चे गवेराचे विचार जास्त लोकप्रिय आहेत; पण त्याच्या सामाजिक चिकित्साशास्त्रातील कार्याची चर्चा कमी होते. कोरोना महासाथीच्या काळात चे गवेराच्या आरोग्यविचारांचा पुन्हा खोलात जाऊन अभ्यास व्हायला हवा. क्युबामध्ये १९५९मध्ये फुलगेन्सीओ बतिस्ता या हुकूमशहाचा पाडाव करून फिडेल कॅस्ट्रो व चे गवेरा यांनी तरुणांना घेऊन क्रांती केली. एकीकडे देशाच्या पुनर्बांधणीचे व दुसरीकडे अमेरिकी साम्राज्यवादाशी तोंड देणे अशी दुहेरी आव्हाने त्यांच्यासमोर होती.

Also Read: नांदी अमिताभ पर्वाची

आरोग्य, शिक्षण, गरीबी, बालसंगोपन, आर्थिक विषमता हे सर्व विषय एकमेकांवर प्रभाव टाकणारे आहेत, असे चे गवेरा यांचे मत होते. १९६०मध्ये त्याने ‘मिलिशिया’ समोर केलेल्या भाषणात त्याच्या चिकित्साशास्त्राचा दृष्टिकोन व्यक्त झाला. ‘डॉक्टर हा एक शेतकरीही असायला हवा. तो बी पेरेल. त्याच्याकडे नवीन अन्नपदार्थ चाखण्याची दुर्दम्य इच्छा असावी. क्युबाच्या राष्ट्रीय पोषक घटकांच्या रचनेमध्ये त्यांनी वैविध्य आणावे. डॉक्टरांनी राजकारणीदेखील बनायला पाहिजे. यासाठी,की देशाच्या पुनर्बांधणीत त्यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी गरीबांचे ‘वकील’ही बनले पाहिजे. आरोग्य समस्या या केवळ सुटेपणाने वैद्यकीय संशोधनाच्या समस्या नाहीत. आजारावरील उपचारांचा मार्ग म्हणजे तो आजार ज्या परिस्थितीत अस्तित्वात आला त्या परिस्थितीवर उपचार करणे.’

डॉ. रुडॉल्फ फिरकोउ हे फिजिशियन व पॅथॉलॉजिस्ट होते. त्यांनी टायफस रोगाच्या साथीचा अभ्यास केला होता. त्यांना गरीबी तसेच शिक्षणाच्या अभाव ही कारणेदेखील साथ पसरण्यात महत्त्वाचे कारण असतात, असे आढळले. यातून त्यांनी सामाजिक चिकित्साशास्त्राची मांडणी पुढे नेली. त्यांच्या विचारांच्या बहुतांश अनुयायांनी २०व्या शतकाच्या सुरुवातीला चिली व अर्जेंटिनात स्थायिक होऊन त्यांनी अध्यापनात स्वतःला गुंतवून घेतले व चिलीचे भावी अध्यक्ष डॉ. साल्वादोर अलांदे यांच्यावर प्रभाव पाडला. अलांदे यांनी चिलीच्या सामाजिक चिकित्साशास्त्राच्या आधुनिकीकरणात मोठी भूमिका बजावली. या सगळ्याचा चे गवेरा वर खोलवर परिणाम झाला. वैद्यकीय शिक्षणामधून वेळ काढून चे गव्हेरा मित्रांसमवेत मोटारसायकलवरून लॅटिन अमेरिकेच्या अनेक देशांच्या भ्रमंतीला निघाला. त्याने स्वतः सहाशे कुष्ठरुग्णांवर उपचार केले. लॅटिन अमेरिकी देशांत सामाजिक व आर्थिक विषमता यांचा व कुष्ठरोगासारखे तत्सम आजार यामध्ये घनिष्ठ संबंध आहे, असे चे गवेरा चे पक्के मत बनले. राजकीय समाजवाद व वैद्यकीय संशोधन यांचे मिश्रण हा सामाजिक चिकित्साशास्त्राचा आधार आहे. चे ला केवळ मानवी आजारावर उपचार करायचे नव्हते तर अपरिपक्व समाजातील मानवाच्या सततच्या दुःखांवर त्याला उपचार करायचे होते. त्याचा विश्वास होता की मार्क्सवाद-लेनिनवादाच्या तत्वांद्वारे अन्यायाचा शेवट होऊन नवीन प्रकारचा मानव तयार होईल. तो म्हणजे त्याच्या कल्पनेतील ‘सामाजिक मानव’. १९५६ मध्ये चे गवेरा याने मेक्सिकोमध्ये फिडेल कॅस्ट्रो चा क्रांतिकारी गटात एक वैद्यकीय मदतनीस म्हणून प्रवेश केला होता

Also Read: एक अविस्मरणीय हॅट् ट्रिक

क्युबातील यशस्वी प्रयोग

चे गवेरा चे व्हिजन सत्यात उतरवायला तो स्वतः जिवंत राहिला नाही; पण फिडेल कॅस्ट्रोने क्युबामध्ये त्याची अंमलबजावणी यशस्वीरित्या करून दाखवली. तो काँगो व नंतर बोलिविया देशांमध्ये क्रांती तडीस न्यायला गेला;पण तेथे अमेरिकेच्या ‘सीआयए’ ने बोलिविअन सरकारच्या मदतीने १९६७ मध्ये जंगलामध्ये लढत असताना त्याची हत्या केली. केवळ ३९ वर्षांच्या अल्पायुष्यात त्याच्या अनेक क्षेत्रांतील विचारांची उजळणी करण्याची गरज जाणवते आहे. चे गवेराने सर्वप्रथम ७५० डॉक्टर व सर्व वैद्यकीय प्रशिक्षणार्थींना डोंगरी व समुद्रकिनारी भागातील समुदायामध्ये काम करण्यास पाठवले. फिरती वैद्यकीय पथके स्थापन केली. वैद्यकीय शिक्षणाबरोबरच इतर सर्व शिक्षण मोफत केल्यामुळे डॉक्टरांच्या प्रशिक्षणाचा पाया मजबूत झाला.

औषध व नर्सिंग शिक्षणसंस्थांची निर्मिती विविध प्रांतात करून स्थानिक ठिकाणी सेवा बजावण्यात लोकांना प्रोत्साहित करण्यात आले. विकसनशील भारतामध्ये सामाजिक चिकित्साशास्त्र दृष्टिकोनाची गरज आहे. कोरोना साथीमध्ये उद्योगपतींची संपत्ती ३५ टक्क्यांनी वाढली. पण उर्वरित ९९% लोकांनी रोजगाराच्या स्वरूपात, वेतन कपातीच्या स्वरूपात, किंवा कुटुंबीयांच्या जीवाच्या स्वरूपात गमावलच आहे. सामाजिक विषमता, आर्थिक विषमता व आरोग्यव्यवस्था असे विषय जोडूनच त्याचा अभ्यास केला पाहिजे. दलित, आदिवासी, वंचित यांचा आरोग्याचा स्तर व पुढारलेल्या समुदायाचा आरोग्य स्तर यातील तफावतीचे विश्लेषण व्हायला पाहिजे. तरच त्यातून योग्य निष्कर्ष मिळतील. कोरोनातून होरपळलेल्या समाजाने सामाजिक चिकित्साशास्त्र एक चळवळ म्हणून पुढे नेले पाहिजे.

Also Read: ‘तंत्र -सरंजामशाही’चा टिवटिवाट …

आरोग्याचा हक्क सर्वांना

चे गवेरा चे विचार पुढे नेत १९७६ मध्ये राज्यघटनेतील ५० व्या कलमामध्ये क्युबाने आरोग्य हक्काचा समावेश करत सर्वांना समान आरोग्य सुविधा बहाल केली. खाजगी आरोग्य विमा, आरोग्य सेवा व दवाखाने यांना राष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्रांमध्ये रूपांतरित केले. औषधांच्या किमती कमी करून औषध कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. शहरातील मोठ्या दवाखान्यांना पर्याय म्हणून समुदायांना विशेष सेवा या पॉलिक्लिनिकनी बजावली. त्यामुळे क्युबा हे अवयव प्रत्यारोपणाचे, हृदय बायपास तसेच इतर गुंतागुंतीच्या वैद्यकीय सेवेसाठी महत्त्वाचा देश म्हणून उदयास आला. १९५९ च्या क्रांतीअगोदर क्युबात केवळ तीन हजार डॉक्टर होते. सध्या तेथील डॉक्टर प्रमाण हे अमेरिका व भारतापेक्षा पुढे आहे. दर १००० लोकांमध्ये तेथे ९ डॉक्टर आहेत. भारतामध्ये हे प्रमाण १५११ लोकांमागे १ डॉक्टर असे आहे.

(लेखक ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेमोक्रॅटिक यूथ’चे माजी उपाध्यक्ष आहेत.)

girishphondeorg@gmail.com

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here