अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची 16 जून रोजी भेट होणार आहे. जगातील दोन सर्वात शक्तीशाली नेत्यांच्या भेटीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
वॉशिंग्टन- रशिया आणि अमेरिकेमधील शत्रुत्व काही लपून राहिलेलं नाही. या देशांच्या प्रमुखांमध्ये कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद पाहायला मिळतो. पण, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची 16 जून रोजी भेट होणार आहे. जगातील दोन सर्वात शक्तीशाली नेत्यांच्या भेटीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. या भेटीआधी एनबीसी न्यूजने पुतिन यांची एक मुलाखत प्रकाशित केली आहे. यात अमेरिकी पत्रकाराने पुतिन यांना तुम्ही खुनी आहात का? असा प्रश्न केला. यावर पुतिन यांनी म्हटलं की, ‘अशा प्रकारचे आरोप माझ्यावर होत असतात.’ (Russia Vladimir Putin said about murderer comment to America journalist)
ट्रम्प-बायडेन यांची तुलना
डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यामध्ये काय फरक आहे? या प्रश्वावर पुतिन म्हणाले की, ‘ट्रम्प रंगेल प्रकारचे व्यक्ती आहे, तर ज्यो बायडेन एक राजकारणी आहेत. ट्रम्प आणि बायडेन यांच्यामध्ये खूप अंतर आहे. दोन्ही वेगवेगळे व्यक्तिमत्व आहे. त्याचे वेगळे फायदे आणि नुकसान आहेत. पण, मला आशा आहे की, नवे राष्ट्रपती कोणते चिथावणीखोर पाऊल उचलणार नाहीत.’ पुतिन यांनी 2018 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. आता ते जिनिव्हा येथे 16 जूनला ज्यो बायडेन यांची भेट घेणार आहेत.

Also Read: नेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; 12 वर्षांनी नेतान्याहू पायउतार
पुतिन यांच्याविषयी बायडेन यांचे मत
काही दिवसांपूर्वी बायडेन यांनी एका मुलाखतीत व्लादिमीर पुतिन खुनी असल्याचं म्हटलं होतं. यावरुन दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. रशियाने यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेतला होता. मॉस्कोने अमेरिकेतील रशियाच्या राजदूताला परत बोलावलं होतं. यावर्षीच्या सुरुवातील बायडेन यांनी रशियावर काही निर्बंध लादले होते. अमेरिकेत झालेला सायबर हल्ला आणि 2020 मधील निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप बायडेन यांनी केला होता.
Also Read: COVID Alarm: गर्दीत कोरोना रुग्ण असल्यास वाजणार अलार्म
पुतिन काय म्हणाले
रशियात अनेक नेत्यांच्या हत्या होत आहेत याबाबत काय सांगाल, असा प्रश्न एनबीसीच्या पत्रकाराने विचारला. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्वावर पुतिन भडकल्याचं पाहायला मिळालं. मला असभ्य वागायचं नाही, पण तुम्ही विचारलेला प्रश्न उद्धट आहे. असे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. अनेकांना शिक्षा झाली आहे. आम्ही या दिशेने काम करत आहोत. कार्यकाळात माझ्यावर अनेक आरोप झाले. मला आता याची सवल झालीये. मला यात आता काहीही नवल वाटत नाही, असं पुतिन म्हणाले.
Esakal