2013 म्हणजेच तब्बल 8 वर्ष आधी भारतीय मोबाईलच्या बाजारात अ‍ॅपल आणि सॅमसंग या दोन कंपन्यांनी आपली पाळंमुळं रोवली होती. त्याच काळात बाजारात उतरला एक नवीन मोबाईल ब्रँड ज्याचं नाव होतं वन प्लस टेक्नॉलॉजि शंझेन कंपनी लिमिटेड. आपण सर्वच या कंपनीला वन प्लस या नावाने ओळखतो. पिट लाउ यांनी 16 डिसेंबर 2016 रोजी या कंपनीची स्थापना केली. या कंपनीची खास बाब म्हणजे या कंपनीचे संस्थापक पिट लाउ यांनी आपल्या करिअरची सुरवात ओप्पो इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या मोबाईल कंपनीत एक हार्डवेअर इंजिनिअर म्हणून केली होती. मात्र आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर पिट लाउ यांनी ओप्पोच्या ब्लु रे डिव्हिजनचं डायरेक्टर पद, हेड ऑफ मार्केटिंग आणि पुढे ओप्पोचे व्हाईस प्रेसिंडेंट म्हणून पदे भूषवलीत. आणि याच अनुभवाच्या जोरावर पिट लाउ यांनी वन प्लस या स्वतःच्या मोबाईल कंपनीची सुरवात केली.

कॅफेमध्ये बसून सुरु केलं काम

आपण अनेकवेळा वाचलंय की बहुतेक स्टार्टअप्स हे एका कॅफेत बसून आपलं काम सुरु करतात. अगदी तशाच प्रकारचं काम पिट लाउ यांच्या टीमने देखील सुरु केलं. पिट लाउ आणि त्यांची टीम एका कॅफेमध्येबसून आपल्या स्टार्टअपबाबत चर्चा करत असत. त्यावेळी त्यांच्या टीममध्ये अधिकतर लोकांकडे आयफोन होता. त्यावेळी पिट लाउ आणि त्यांच्या टीममध्ये एक विचार कायम येत, की लोकं अँड्रॉईड फोन वापरण्याऐवजी आयफोन कशाला वापरतात? पिट लाउ यांच्या मते स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये अनेक कमतरता होत्या. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कमतरता म्हणजे एका चांगल्या प्रीमियम फोनची मोठी किंमत. चांगल्या फीचर्सचा प्रीमियम स्मार्ट फोन सर्वांना परवडत नसे. आणि याच कल्पनेला धरून पिट लाउ आणि त्यांच्या पार्टनरनी फक्त 5 माणसांना हाताशी धरत स्वतःची कंपनी सुरु केली.

2014 मध्ये पहिला स्मार्टफोन झाला लॉन्च

2014 मध्ये त्यांनी आपला पहिला स्मार्टफोन वन प्लस वन बाजारात उतरवला. आपल्या सर्वोत्तम फीचर्स असणाऱ्या फोनला कमीत कमी किमतीत ग्राहकांना विकणे हे वन प्लस कंपनीचं कायम लक्ष्य राहिलंय. कदाचित म्हणूनच वन प्लस या कंपनीने 2014 च्या शेवटपर्यंत जागतिक बाजारपेठेत 15 लाखांपेक्षा अधिक स्मार्ट फोन विकले. महत्त्वाची बाब म्हणजे वन प्लस कंपनीने कोणत्याही मोठ्या जाहिरातबाजी शिवाय जगभरात आपले स्मार्ट फोन विकून दाखवले होते. इतर देशांच्या तुलनेत भारतीय स्मार्टफोन युजर्सनी वन प्लस या कंपनीच्या स्मार्ट फोन्सला चांगला प्रतिसाद दिला.

  • “आमच्या सुरुवातीच्या काळात, वन प्लस वन जेंव्हा लॉन्च होणार होता तेंव्हा आम्हाला खरंच कल्पनाही नव्हती की, या बाजारपेठेत नवीनच प्रवेश करणाऱ्या कंपनीला ग्राहकांकडून कसा प्रतिसाद मिळेल. आमचा पहिला स्मार्ट फोन बाजारात आला. आमच्या उत्पादनाबाबत लोकांना माहिती झालं, आमचे फोन ग्राहकांना भावले, आमच्या पहिल्या फोनची मागणी अपेक्षेपेक्षा जास्त झाली, तेंव्हा आम्हाला खात्री पटली की हो आपल्या कामाचं चीज झालं. ” – पिट लाउ – संस्थापक, वन प्लस”

Oneplus

‘वन प्लस’वर आली बंदी

2014 मध्ये भारतीय मोबाईल बनवणाऱ्या मायक्रोमॅस्क कंपनीने तक्रार केल्यानंतर दिल्ली हायकोर्टाने वन प्लस या कंपनीवर भारतात बंदी आणली. मायक्रोमॅक्स कंपनीचा आरोप होता की ‘सेनोजेन मोड’ या सॉफ्टवेअर वापराचे अधिकार केवळ त्यांच्याकडे आहेत आणि त्याचा वापर कोणतीही इतर कंपनी करू शकत नाही. मात्र वन प्लस कंपनीचा दावा होता की, हा कायदा केवळ भारतीय स्मार्ट फोन कंपनीवर लागू होऊ शकतो. ज्यामुळे नंतर 21 डिसेंबर 2014 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने वन प्लसवरील भारतातील बंदी उठवली.

जोरदार कमबॅक

पुढे 2015 मध्ये वन प्लसने आपले 2 नवीन फोन भारतीय बाजारात आणले. वन प्लस 2 आणि वन प्लस एक्स हे फोन 2015 मध्ये भारतीय बाजारात आले खरे, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ते जास्त लोकप्रिय झाले नाहीत. मात्र या गोष्टीमुळे पिट लाउ नाराज झाले नाहीत. त्यांनी स्वतःच्या स्मार्ट फोन्सवर अधिक अभ्यास केला आणि 2016 मध्ये पुन्हा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात आणले. 2016 मध्ये वन प्लसने भारतीय बाजारात तगडा कमबॅक केला आणि त्यानंतर एकामागून एक उत्तमोत्तम फोन लॉन्च केले. यानंतर वन प्लस ने कधीच मागे वळून पाहिलं नाही. एकामागोमाग एक उत्तमोत्तम फोन बाजारात आणून कंपनीने 2020 पर्यंत जगभरातील तब्बल 34 देशांमध्ये आपले ग्राहक निर्माण केले आहेत.

येणारा काळ 5G चा आहे. अशात भारतीय स्मार्ट फोन बाजारपेठेत 5G चा झेंडा हातात घेऊन वन प्लस हीच कंपनी पुढे असल्याचं पाहायला मिळतंय. 5G फोन्समध्ये वन प्लसचा भारतीय बाजारातील हिस्सा तब्बल 33 टक्के आहे.

वन प्लस कंपनीचे मालक आणि वन प्लस कंपनीची ही कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे. ज्या व्यक्ती उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहतात आणि ज्यांना आपल्या कामावर विश्वास आणि त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी असते त्या व्यक्ती कायम पुढे जातात हेही पिट लाउ यांच्या कहाणीवरून सिद्ध होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here