नवी दिल्ली : रेल्वेस्थानकांवर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या तिकिटाचे दर ५ ते १० वरून ५० रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तिकिटांच्या विक्रीत ९४ टक्के इतकी मोठी घट झाल्याचे रेल्वेने मान्य केले आहे.
Also Read: ममता बॅनर्जीचं सोशॅलिझमशी लग्न; अनोख्या विवाहाची तमिळनाडूत चर्चा
दरम्यान, दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातल्या सर्वाधिक गर्दीच्या ८ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्री पूर्वीप्रमाणे सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ही स्थानके अशी : नवी दिल्ली, जुनी दिल्ली स्थानक, हजरत निजामुद्दीन, आनंद विहार टर्मिनल, मेरठ, गाझियाबाद, दिल्ली सराय रोहिल्ला व दिल्ली कॅन्टोन्मेंट. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीपासून देशभरात सर्वत्र प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर पुन्हा दहा रुपये करण्याचा हालचाली आहेत. कोरोना काळात रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर ३० ते ५० रुपयांपर्यंत वाढवले होते.

Also Read: शशीकलांशी बोलणाऱ्या 16 नेत्यांची AIADMK कडून हकालपट्टी
परिणामी फेब्रुवारी २०२१ पर्यंतच्या एका वर्षाच्या काळात या तिकिटांच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न दर वर्षीच्या सरासरी १३० कोटींवरून १० कोटीपर्यंत घसरले, असे रेल्वेनेच एका माहिती अधिकाराच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. मागच्या वर्षी म्हणजे २०१९-२० वर्षामध्ये रेल्वेला विक्रमी १६०.८७ कोटी रुपयांचे उत्पन्न प्लॅटफॉर्म तिकिटांतून मिळाले. गेल्या पाच वर्षातील ते सर्वाधिक उत्पन्न होते. त्याच्या आधीच्या वर्षात हा आकडा सुमारे १३१ कोटी रुपये इतका होता. मात्र २०२० – २१ मध्ये हा आकडा १० कोटींवर आला. प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात झालेली मोठी वाढ हेही यामागील ठळक कारण असल्याचे स्पष्ट आहे.
Esakal