एलियन (alien) म्हणजे परग्रहवासी खरंच आहेत का? जर ते अस्तित्वात असतील तर नेमके कसे दिसत असतील? असे असंख्य प्रश्न शास्त्रज्ञांप्रमाणेच (physicist) सामान्य माणसांनाही पडत असतात. त्यामुळेच गेल्या कित्येक वर्षांपासून शास्त्रज्ञ, वैज्ञानिक या एलियनचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच अनेकदा एलियनच्या उडत्या तबकड्या किंवा अवकाशयान पाहिल्याचा दावाही सोशल मीडियावर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक देशांचे वैज्ञानिक या एलियनचा शोध घेण्याचा आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र, ‘एलियनशी संपर्क करण्याचा प्रयत्न थांबवा. नाहीतर, सजीवसृष्टीवर संकट कोसळेल’, असा सतर्कतेचा इशारा प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक मार्क बुकानन यांनी दिला आहे. (us-top-physicist-warns-alien-contact-could-result-in-the-end-of-all-life-on-earth)
मार्क बुकानन यांनी एक व्हिडीओ शेअर करुन ‘एलियनशी संपर्क करु नका’, हा दावा केला आहे. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ एप्रिल २०२० मधील असून तो अमेरिकेच्या संरक्षण विभागाने शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अमेरिकेच्या नौदलाला एक अज्ञात वस्तू समुद्राच्या लाटेवर तरंगतांना दिसत होती. या वस्तूचा हवेतील वेग आणि दिशा ही थक्क करणारी होती. विशेष म्हणजे कोणत्याही मानवनिर्मिती वस्तूचा वेग इतका असणं शक्यच नसल्याचं यात म्हटलं होतं.
Also Read: कोडं उलगडलं; झारखंडमध्ये दिसलेली ती आकृती एलियनची होती का?
एलियनशी संपर्क कराल, तर ओढावेल संकट
बुकानन यांचा वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात त्यांनी एलियनशी संपर्क करु नका असं म्हटलं आहे. एलियन खरंच अस्तित्वात आहेत याविषयी आपल्याकडे एकही ठोस पुरावा नाही हे फार बरं आहे. कारण, जर एलियन अस्तित्वात असतील आणि आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असून तर ते आपल्यासाठी अत्यंत घातक आहे, असं बुकानन यांनी म्हटलं. विशेष म्हणजे बुकानन यांच्या या वक्तव्याचं खगोलशास्त्रज्ञ जो गेर्ट्ज यांनीही समर्थन केलं आहे.
एलियनशी संपर्क करण्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. ज्या प्रमाणे ख्रिस्तोफर कोलंबस उत्तर अमेरिकेत आला होता. त्याचप्रमाणे एलियनचा शोध घेण्यासारखं आहे हे बुकानन यांचं मत मला पटतं. आपली आकाशगंगा अजून नवीन आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या आकाशगंगेचा अन्य दुसऱ्या आकाशगंगेसोबत नक्कीच काही तरी संबंध असेल, असं जो यांनी म्हटलं.

बुकानन यांच्या दाव्यानंतर अनेक चर्चांना उधाण
एलियनशी संपर्क करु नका हा दावा बुकानन यांनी केल्यानंतर अमेरिकेतील अनेक शास्त्रज्ञ यावर चर्चाविमर्श करत आहेत. त्यांच्या मते, जर आपण एलियनसोबत संपर्क केला तर त्याचा मानवजातीला फायदाच होईल. एलियनच्या टेक्नॉलॉजिचा वापर आपण मानवाच्या प्रगतीसाठी करु शकतो. त्यामुळे पृथ्वीचं संरक्षण होईल, असं मत अमेरिकेच्या शास्त्रज्ञांचं आहे.
Esakal