काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचे ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये सूचक वक्तव्य
मुंबई: महाविकास आघाडी सरकार म्हणजे नवरा बायकोच्या संसाराप्रमाणे आहे. नवरा-बायकोचे भांडण झाल्यावर कालांतराने त्यांचा संसार अधिक घट्ट आणि सुखाचा होतो. तसेच, आमच्या तिन्ही पक्षातदेखील मतभेद होतात. पण त्या मतभेदांवर तोडगा निघाला की आम्ही अधिक एकत्र येतो आणि आमच्यातील समन्वय अधिक घट्ट होतो, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ कार्यक्रमात महाविकास आघाडी सरकारचे छान वर्णन केले. (Mahavikas Aghadi Govt is like Husband wife world says Congress Minister Yashomati Thakur in Coffee with Sakal)
Also Read: “कोरोनाकाळात कोणीही उपाशी झोपू नये यासाठी आम्ही प्रयत्न केले”
विरोधकांना काहीही म्हणू दे पण हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार, यात दुमत नाही. आम्हाला राष्ट्रवादी आणि सेनेसोबत व्यवस्थित काम करता येतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आघाडी करून आम्ही तिन्ही पक्ष व्यवस्थित काम करत आहोत. मुख्यमंत्री म्हणून ते आम्हाला सगळयांनाच व्यवस्थित सांभाळून घेतात. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार हे वेगळ्या पद्धतीने काम करत असले तरी तेदेखील साऱ्या मंत्रिमंडळाशी समन्वय साधत असतात.

Also Read: धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर झाला महत्त्वाचा निर्णय
“भारतीय जनता पक्षाचे लोक कायम महाविकास आघाडीवर टीका करत असतात. कारण आमच्याविरोधात असल्याने ते स्वत:ला कायम असुरक्षित समजतात. आपण सत्तेत नाही ही बाब त्यांना सहन होत नाही. म्हणून आमचे तीन नेते जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आले, तेव्हा त्या भेटीचे मोठ्या मनाने स्वागतही या नेतेमंडळींना करता आले नाही”, अशा शब्दात त्यांनी भाजपला टोला लगावला.
Also Read: “भाजपने सुचवलेल्या ‘या’ नावाला शिवसेना विरोध करणार नाही”
“पोषण आहारासाठी अंगणवाडी सेविका दुर्गम खेड्यापाड्यातही काम करत आहेत. अंगणवाडी सेविका दुर्लक्षित नाहीत, पण त्यांचे पुन्हा पैसे कसे वाढवायचे याचा विचार आम्ही करत आहोत. त्यांच्या विकासाचा विचार आम्ही कायमच करत आहोत. त्याचसोबत आशावर्कर्सचे मानधनदेखील वाढले पाहिजे यासाठी मी पत्र दिले आहे. आपण त्यांना कायमस्वरूपी नोकरदार वर्गात समाविष्ट करू शकत नाही, पण त्यांना सोयीसुविधा, पेन्शन कसे मिळेल? यासाठी मी स्वत: 12 बैठका घेतल्या आहेत”, अशी माहिती त्यांनी दिली.
“कोरोना काळात कौटुंबिक हिंसाचार खूपच वाढला आहे. आम्हाला या काळात खूप तक्रारी आल्या आहेत. ही प्रकरणे सध्या वाढली आहेत. म्हणूनच महिला आयोगाजवळच इतर संबधित कार्यालये असावीत असा आमचा प्रयत्न आहे”, असेही त्या म्हणाल्या.
Esakal