नागपूर : अनेक दिवसांपासून चर्चा झाल्यानंतर अखेर १५ जूनपासून देशातील २५६ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंगचा नियम लागू करण्यात आला आहे. देशभरातील ग्राहकांना शुद्ध आणि विश्वासार्ह सोने विकत घेता यावे यासाठी सरकारने हा नियम बनविला आहे. या नियमानुसार, सध्या तरी १४, १८ आणि २२, २०, २३ आणि २४ कॅरेट सोन्याची विक्री करता येणार आहे. तसेच हॉलमार्क असलेले सोने विकणे बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत ग्राहकाजवळ जर हॉलमार्क नसलेले सोने असेल तर त्याचे काय होणार? असा पडला असेल.
Also Read: फक्त एकदाच भरा प्रिमियम आणि दरमहिना मिळवा पेन्शन; कोणती आहे ही पॉलिसी ?
कोणत्या नवीन नियमांची भर?
खरंतर या नियमांची अंमलबजावणी ही १ जूनपासून होणार होती. मात्र, ही मुदत वाढवून देण्यात आली. त्यानंतर १५ जूनपासून हे नियम अनिवार्य असेल, असा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानंतर मंगळवारी (१५ जूनदेशातील सराफा असोसिएशनची दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. अद्यापही देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंगचे केंद्र नाही. त्यामुळे हॉलमार्किंग करणार कसे? असा प्रश्न होता. त्यानुसार आता देशातील फक्त २५६ जिल्ह्यांमध्ये हे हॉलमार्किंग सुरू राहणार आहे. जुने सोने हे हॉलमार्क करण्यासाठी आणखी काही काळ हवा असल्याने हे नियम १ सप्टेंबरपर्यंत ऐच्छिक करण्यात आले आहेत. या काळात भारतीय मानक ब्युरोचा (Bureau of Indian Standards)कुठलाही अधिकारी दुकानात येऊन कारवाई करू शकणार नाही, असेही या नवीन नियमामध्ये सांगण्यात आले आहे.
-
चाळीस लाखापर्यंत व्यवहार असणाऱ्या सराफ सुवर्णकार यांना हॉल मार्किंग लागू केले जाणार नाही
-
आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांसाठी दागिने, शासकीय मान्यताप्राप्त बी 2 बी देशांतर्गत प्रदर्शनांसाठी दागिन्यांना या हॉलमार्किंगमधून मुभा देण्यात आली आहे.
-
सुरुवातीला फक्त १४, १८ आणि २२ कॅरेट सोने विकण्यालाच परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता २०, २२ आणि २४ कॅरेट सोनेही हॉलमार्क लावून विकता येणार आहे.
-
घड्याळ , पेन, कुंदन, पोल्की, जडाऊ आदी दागिन्यांना देखील नवीन नियमांमध्ये मुभा देण्यात आली आहे.
-
जुन्या दागिन्यांना आहे त्याच अवस्थेत किंवा वितळून हॉलमार्क केले जाऊ शकतात.
-
या योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान उद्भवू शकणार्या मुद्द्यांचा विचार करण्यासाठी सर्व भागधारक, महसूल अधिकारी आणि कायदेशीर तज्ज्ञ यांच्या प्रतिनिधींची एक समिती तयार करण्यात येणार आहे.

ग्राहकांना होणारा फायदा-
दागिन्यांना हॉलमार्किंग केल्यास सोन्याची शुद्धता प्रमाणित होणार आहे. ग्राहकांना सोने खरेदीचे समाधान देखील मिळू शकले. तसेच ग्राहकांचे फसवणुकीपासून संरक्षण देखील होईल.
ग्राहकांकडे असलेल्या सोन्याचे काय होणार? –
आता हॉलमार्क असलेले सोने विकणे बंधनकारक आहे. त्यामुळे ग्राहकांकडे असलेल्या जुन्या सोन्याचे काय होणार? असा प्रश्न पडला असेल.
याबाबत बोलताना नागपुरातील सराफा व्यावसायिक राजेश रोकडे सांगतात, ‘तुमच्या घरात असलेल्या सोन्याला सध्या काहीही निर्बंध नाहीत. ग्राहक कधीही सोने घेऊन व्यावसायिकाकडे गेल्यास त्यांना ते सोने परत घेणे नियमानुसार बंधनकारक आहे. ग्राहकांकडे कुठल्याही कॅरेटचे सोने असेल तर ते सोने सराफांना खरेदी करता येईल. त्यानंतर स्वतः सराफा व्यावसायिकांना त्या सोन्यावर हॉलमार्क लावावे लागेल.’
याबाबत बोलताना जळगाव सराफा असोसिएशनचे सचिव स्वरुप लुकंड सांगतात ‘ग्राहकांकडून येणाऱ्या सोन्याला हॉलमार्क करून परत विकले जाईल.’ त्यामुळे तुमच्या घरात असलेल्या सोन्यावर या हॉलमार्किंगच्या नियमामुळे काहीही परिणाम होणार नाही.
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यामध्ये मिळेल हॉलमार्किंग केलेले सोने –
देशभरात एकूण २५६ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग बंधनकारक आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण २२ जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये अकोला, अमरावती, धुळे, लातूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, नागपूर, पालघर, रायगड, अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, पुणे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला हॉलमार्किंग केलेले सोने मिळू शकणार आहे.
शुद्धतेची समस्या असेल तर जबाबदारी कोणाची?
याबाबत एक समिती नेमली जाईल. त्यानंतर यामध्ये हॉलमार्क केंद्राची चूक असेल किंवा सराफा व्यावसायिकाची चूक असेल त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. त्यापूर्वी त्याची चौकशी करण्यात येईल.
ग्राहकांना सोन्यात काही जाणवल्यास तक्रार कोणाकडे करायची?
आता सोनेखरेदी करताना तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. त्यावर हॉलमार्क आहे किंवा नाही हे पाहूनच तुम्हाला सोने खरेदी करावी लागेल. त्यावर हॉलमार्क नसेल किंवा सोने खरेदीबाबत तुमची फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यास तुम्ही भारतीय मानक ब्युरोकडे तक्रार करू शकतात, असे राजेश रोकडे सांगतात.
हॉलमार्क म्हणजे नक्की काय?
हॉलमार्क म्हणजे हे एक प्रकारचे शुद्धतेचे प्रमाण आहे. सोने, चांदी तसेच महागड्या वस्तूंवर हॉलमार्कचं चिन्ह असते. दागिन्यांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी हॉलमार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक देशात हॉलमार्किंगची पद्धत वेगळी आहे. एजन्सी ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड ही तपासणी करते. कोणत्याही प्रकारच्या दागिन्यांची विक्री करण्यापूर्वी या एजन्सीकडून तपासणी करून घेणे अनिवार्य असते. त्यानंतरच त्यावर हॉलमार्क दिला जातो. मात्र, काही विक्रेते हॉलमार्कचे खोटे चिन्ह वापरतात. त्यामुळे हॉलमार्क असला तरी तो खरा आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे. खऱ्या हॉलमार्कवर भारतीय मानक ब्यूरोचे त्रिकोणी चिन्ह असते. त्यात हॉलमार्किंग सेंटरसह सोन्याची शुद्धता आणि दागिने तयार केल्याचे वर्ष तसेच उत्पादकाचा लोगोही असतो.
आपल्या जिल्ह्यातील हॉलमार्किंग केंद्र कसे शोधायचे? –
आपल्या जिल्ह्यामध्ये कुठे आणि किती हॉलमार्किंग केंद्र आहेत, हे शोधण्यासाठी तुम्हाला भारतीय मानक ब्युरोच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
आधी https://bis.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

याठिकाणी तुम्हाला Hallmarking असे लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा. त्याठिकाणी Hallmarking Center या पर्यायावर क्लिक करा. त्यामध्ये list of Hallmark center असा पर्याय येईल त्यावर क्लिक करा.

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज येईल. त्याठिकाणी आपले राज्य आणि जिल्हा टाकून तुम्हाला तुमच्या परिसरातील हॉलमार्किंग केंद्र शोधता येणार आहे.

Esakal