NSG म्हणजे ‘ब्लॅक कॅट कमांडो’. दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी आणि VIP सुरक्षेसाठी या कमांडोंना खासकरुन प्रशिक्षित केले जाते. अनेकदा आपण NSG कमांडो VIP सुरक्षेसाठी तैनात असल्याचे पाहतो. NSG साठी अत्यंत कठोर अशा प्रक्रियेतून कमांडोंची निवड केली जाते. त्यासाठी मानसिक आणि तितकीच शारीरिक कणखरता लागते. मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्यावेळी सुद्धा याच कमांडोंनी आपले शौर्य दाखवून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. या कमांडोजकडे पाहून अनेक युवकांच्या मनात ब्लॅक कॅट कमांडो बनण्याची इच्छा निर्माण होते. पण हे इतके सोपे नाहीय. ही अत्यंत कठिण प्रक्रिया आहे. जिथे प्रत्येक पायरीवर तुमची कसोटी लागते. पंतप्रधानांसह देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा प्रदान करण्यासाठी एनएसजीची म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाची १९८४ मध्ये स्थापना करण्यात आली. NSG मध्ये भरतीचा विषय येतो, तेव्हा थेट निवड होत नाही. लष्कर आणि निमलष्करी दलातून NSG साठी जवानांची निवड केली जाते. ५३ टक्के जवान भारतीय लष्करातून निवडले जातात. उर्वरित ४७ टक्के जवान सीआरपीएफ, ITBP, आरएएफ आणि BSF या निमलष्करी दलातून निवडले जातात. NSG कमांडो बनण्यासाठी निवड झालेल्या जवानांना ९० दिवसांचे अत्यंत खडतर प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. सुरुवातीला निवडीसाठी एक परिक्षा पास करावी लागते. ही परिक्षा म्हणजे आठवड्याभराचा खडतर प्रशिक्षण कार्यक्रम असतो. असे म्हटले जाते की, ८० टक्के जवान या पहिल्याच टप्प्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमात फेल होतात. फक्त २० टक्के दुसऱ्या टप्प्यावर पोहोचतात. शेवटच्या फेरीत हा आकडा १५ टक्क्यापर्यंत खाली येतो. अंतिम फेरीत निवड झाल्यानंतर सर्वात खडतर अशा प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात होते. हा ९० दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम असतो. यावेळी शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षण दिले जाते. विविध अडथळे पार करण्याच्या सरावाबरोबरच दहशतवाद्यांशी लढण्याचे प्रशिक्षण दिले जाते. शेवटच्या टप्प्यात मानसिक कणखरतेची परिक्षा पाहिली जाते. NSG मध्ये निवड झाल्यानंतर चांगले वेतनही मिळते. NSG कमांडोंचे प्रतिमहिना वेतन ८४ हजार ते अडीच लाखाच्या घरात असते. प्रतिमहिना सरासरी पगार दीड लाखापर्यंत असतो. त्याशिवाय काही भत्ते सुद्धा दिले जातात.