सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळ नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी (ता.११) सायंकाळपासून पावसाला सुरूवात झाली. त्यावेळेपासून पावसाच्या अधूनमधून दमदार सरी बसरल्या. काही परिसरात ढगफुटीसजदृश्य पाऊस झाला आहे. परिणामी काही नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसाच्या प्रसंगांचे दृश्य टिपले आहेत, सिंधुदुर्ग ‘सकाळ’चे पत्रकार निलेश मोराजकर यांनी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढली. नदीच्या पुराचे पाणी पात्राबाहेर येऊन बांदा शहरातील आळवाडी बाजारपेठेत घुसले आहे.
शहरातील आळवाडी-निमजगा रस्ता पाण्याखाली गेला आहे. येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी दुकानातील सामान सुरक्षित स्थळी हलविले आहे. बांदा शहर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसाने तेरेखोल नदी दुथडी भरून वाहत आहे.
आज पहाटेच्या सुमारास तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी भरण्यास सुरुवात झाल्याने व्यापारी व स्थानिकांची एकच तारांबळ उडाली. आळवाडी येथील अनेक दुकाने व घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पाण्याची पातळी वाढत असून स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा देखील सखल भागात पाणी आल्याने अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पावसाचा जोर अद्याप असल्याने व पाणी पातळी वाढत असल्याने पूर प्रवण क्षेत्रातील नागरिक चिंतेत आहेत.
आतापर्यंत यंदाच्या हंगामातील सर्वाधिक पाऊस झाला. आजही सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
आळवाडी येथील मच्छीमार्केट इमारतीत पुराचे पाणी घुसले आहे. आळवाडी-निमजगा रस्ता पहाटेच पाण्याखाली गेला आहे. येथील छोटे विक्रेते, स्टॉल, चिकन सेंटरमध्ये पाणी शिरले आहे.
गेल्या चोवीस तासात आज सकाळपर्यंत येथे १५० मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली. दरम्यान, तालुक्यात काही भागात किरकोळ झाडांच्या पडझडीचे प्रकार घडले.
ग्रामीण भागात ओहोळ, नद्या खळखळून वाहत आहेत. शेतीकामांनी वेग घेतला आहे. तालुक्यातील वाडा परिसरात पाणी रस्त्यावर आले होते. सखल भागात पाणी साचले होते. समुद्राच्या लाटांचा आवाज वाढला होता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here