मुंबई : जलपर्णीमुळे उल्हास नदीचा कोंडलेला श्वास काहीसा मोकळा होऊ लागला आहे. बदलापूरपासून मोहना बंधाऱ्या पर्यंतच्या परिसरात जलपर्णी नष्ट करण्यासाठी औषध फवारणी करण्यात आली आहे. या फवारणीनंतर परिसरातील जलपर्णी खाडीपर्यंत वाहत गेली आहे. कृषिरत्न चंद्रशेखर भडसावळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांसह मागील काही दिवसांपासून नदीतील जलपर्णी समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. नदीतील पाण्याला फवारणीच्या औषधांचा कोणताही धोका निर्माण होणार नसल्याचे भडसावळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Also Read: मायग्रेनपासून सुटका हवीये? लाइफस्टाईलमध्ये करा हे बदल

भडसावळे म्हणाले, ”नदीतील जलपर्णींमुळे नदी मृत होण्याचा धोका निर्माण झाला होता. मी कल्याणकर सामाजिक संस्थेतर्फे फेब्रुवारी महिन्यात नदीतील जलपर्णी नष्ट करण्यासाठी 18 दिवसांचे आंदोलन केले होते. यानंतर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जलपर्णी नष्ट करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला. सगुणा बागचे कर्ताधर्ता, कृषिरत्न चंद्रशेखर भडसावळे यांच्या प्रयत्नातून मे महिन्यापासून नदीतील जलपर्णी नष्ट करण्यासाठी कामास सुरुवात झाली. याचा पहिला भाग म्हणून जवळपास वीस हजार मत्स्यबीजे नदीपात्रात सोडण्यात आली. त्यानंतर नदीच्या पाण्याचे विविध ठिकाणचे नमुने गोळा करुन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. त्यानंतर या परिसरात वाढत असलेल्या जलपर्णीवर फवारणी करण्यासाठी औषध तयार करण्यात आले. ड्रोनच्या माध्यमातून एकावेळी दहा लिटर औषधाची फवारणी करण्यात आली. यामध्ये साडेनऊ लिटर पाणी तर अर्धा लिटर औषध एकत्रित करण्यात आले होते. बदलापूरपासून वरप, कांबा, मोहना बंधारा तसेच आपटी संगम अशा पाच ठिकाणी ही फवारणी झाली. एक एकर क्षेत्रावर एका वेळी दहा लिटर औषधाची फवारणी केली जात होती.”

Also Read: नाश्ता देतो सांगून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

”मागील अनेक वर्षांपासून या जलपर्णींची नदीपात्रात वाढ झाली होती. या जलपर्णीमुळे पाण्याचा प्रवाह पूर्णपणे झाकला गेला होता. सूर्यकिरणे पाण्याखाली पोहचू शकत नव्हती. त्यामुळे नदीतील जीवसृष्टी धोक्यात येण्याची शक्यता होती. सध्या एक फवारणी करण्यात आली असून त्याला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. येणाऱ्या काळात यावर सातत्याने लक्ष ठेवले जाईल.”

–  चंद्रशेखर भडसावळे, कृषिरत्न, नेरळ

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here