पुणे – शिवाजीनगर न्यायालय ते लोणीकाळभोर या १९ किलोमीटर लांबीच्या मेट्रो (Metro) मार्गाबरोबरच स्वारगेट- रेसकोर्स- हडपसरमार्गे सासवड रेल्वे स्टेशन (Swargate to Saswad) दरम्यानच्या नवीन मेट्रो मार्गांचा सुधारित प्रारूप अहवाल (Report) दिल्ली मेट्रोने नुकताच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) (PMRDA) सादर केला आहे. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्क ते सासवड आयटी पार्क मेट्रो मार्गाने जोडण्याचे नियोजन पीएमआरडीएने केले आहे. (Swargate to Saswad Metro Project PMRDA Report)

पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. शिवाजीनगरपासून ही मेट्रो हडपसर येथे नेण्याची मागणी होत होती. त्यामुळे हिंजवडी -शिवाजीनगर- हडपसर -फुरसुंगीपर्यंत मेट्रो मार्ग करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मध्यंतरी पालकमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर ते लोणीकाळभोरपर्यंत मेट्रो मार्ग दाखविण्यात यावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर दिल्ली मेट्रोने पीएमआरडीएला मध्यंतरी प्रारूप अहवाल सादर केला होता. त्यामध्ये भविष्यातील पुरंदर विमानतळाचा विचार करून शिवाजीनगर ते सासवड हा मेट्रो मार्ग प्रस्तावित केला होता. त्यामध्ये पीएमआरडीएने काही बदल सुचवीत नव्याने स्वारगेट ते पुलगेट आणि गाडीतळ ते लोणीकाळभोर मार्गांचा समावेश करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्ली मेट्रोला केल्या होत्या.

त्यानुसार दिल्ली मेट्रोने सुधारित प्रारूप अहवाल पीएमआरडीएला सादर केला आहे. त्यामध्ये शिवाजीनगर ते लोणीकाळभोर हा १९ किलोमीटरचा इलेव्हेटेड मार्ग प्रस्तावित केला आहे. याशिवाय, स्वारगेट ते सासवड रेल्वे स्टेशनपर्यंत दुसरा मार्ग प्रस्तावित केल्याचे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हिंजवडी-सासवड आयटी पार्क जोडले जाणार

दिल्ली मेट्रोने यापूर्वीच्या प्रारूप अहवालात गाडीतळ येथून सासवडमधील आयटी पार्कपर्यंत मार्गाचा विस्तार करणे आर्थिकदृष्ट्या आणि प्रवासी संख्येच्या दृष्टीने सोईस्कर होऊ शकत नाही, असे म्हटले होते. परंतु, आता सादर केलेल्या सुधारित प्रारूप अहवालात हा मार्ग फायदेशीर ठरण्यासाठी स्वारगेट ते सासवड रेल्वे स्टेशन असा मार्ग दर्शविला आहे. त्यामध्ये स्वारगेट ते रेसकोर्स या तीन किलोमीटर लांबीचा, तर हडपसरपासून सासवड रेल्वे स्टेशन असा सुमारे २५ किलोमीटरचा मार्ग नव्याने दर्शविला आहे. तर रेसकोर्स ते हडपसर या दरम्यानचा मेट्रोमार्ग शिवाजीनगर ते लोणीकाळभोर आणि स्वारगेट ते सासवड रेल्वे स्टेशन या दोन्ही मार्गासाठी कॉमन सुचविला आहे. जेणेकरून हिंजवडी ते सासवड आयटी पार्क हे दोन्ही एकमेकांना जोडले जाणार आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here