जगातील सर्वाधिक आनंदी देश अशी ओळख असलेल्या भूतानमध्ये राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचूक यांनी कोरोना नियंत्रणात सक्रिय पुढाकार घेतला आहे.
थिंफू – जगातील सर्वाधिक आनंदी देश अशी ओळख असलेल्या भूतानमध्ये राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचूक यांनी कोरोना नियंत्रणात सक्रिय पुढाकार घेतला आहे. सीमावर्ती भागांत ते स्वतः गस्त घालतात आणि चेकपोस्टवरील बंदोबस्ताची तपासणी करतात. पूर्वेकडील सीमावर्ती भागात त्यांनी नुकताच पाच दिवसांचा ट्रेक पूर्ण केला. त्यावेळी त्यांना काही ठिकाणी खडकाळ भागातून जावे लागले, तर काही ठिकाणी घनदाट जंगलातून मार्गक्रमण करावे लागले. कोरोना नियंत्रण, सीमेवरून परदेशी नागरिकांनी अवैध प्रवेश करू नये आणि एकूणच देशाची सुरक्षा असे त्यांचे उद्देश आहेत.
द भूतानीज वृत्तपत्राचे संपादक आणि मीडिया असोसिएशन ऑफ भुतानचे अध्यक्ष तेनझिंग लामसांग यांनी काही छायाचित्रांसह ट्विटरवर ही माहिती दिली आहे. त्यानुसार वांगचूक यांचा हा किमान १४वा दौरा आहे. यावेळी पंतप्रधान लोटाय त्शेरिंग हे सुद्धा त्यांच्याबरोबर होते.
Also Read: रेल्वेच्या विशेष डब्यात विषाणू नष्ट करणारे तंत्र
घरी दोन चिमुकले
राजे वांगचूक यांना दोन मुले आहेत. यातील एक पाच वर्षांचा आहे, तर दुसरा अलीकडेच जन्मला आहे. देशाचा कारभार पाहताना राजांना बाहेर जावे लागते, अधिकाऱ्यांसह बैठका घ्यावा लागतात तसेच नागरिकांना भेटावे लागते. त्यामुळे गेली अनेक महिने त्यांना स्वतःच्या दोन चिमुकल्यांच्या सहवासास मुकावे लागले आहे.

एकच मृत्यू
भूतानमध्ये कोरोनामुळे आतापर्यंतच एकाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत नव्या रुग्णांचा सरासरी आकडा १७ इतका आहे. आतापर्यंतचा रुग्णांचा एकूण आकडा एक हजार ८२६ इतकाच आहे.
Also Read: ‘पॉझिटिव्ह’ मातेला मोदींची दाद!
पंतप्रधानांचाही संदेश
पंतप्रधान त्शेरिंग यांनी जनतेला वेळोवेळी सावधानतेचा इशारा दिला आहे. कोरोना विषाणूला आता रोखले नाही तर आपण उद्ध्वस्त होऊ, असा इशारा त्यांनी गेल्या महिन्यात दिला होता. दोन लाटा येऊन गेल्या, लसीकरणही सुरु झाल्याने कोरोना संपला असे अनेक देशांना वाटले, पण आता स्थिती किती बिकट आहे हे पाहा असे त्यांनी नमूद केले.

त्शेरिंग हे स्वतः डॉक्टर आहेत. अनेक वेळा ते रुग्णालयात १५ ते १८ तास असतात. मुख्य म्हणजे ते विकेन्ड घेत नाहीत. तेव्हा सुद्धा रुग्णांची सेवा करण्यात व्यग्र असतात.
Esakal