-
सर्व आरोपी वाझे आणि प्रदीप शर्माच्या संपर्कात असल्याचा NIA चा दावा
-
प्रदीप शर्मा, संतोष शेलार, मनीष या तिघांना २८ जूनपर्यंत NIA कोठडी
मुंबई: एन्काऊंटर स्पेशालिस्ट निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला आज NIA ने मनसुख हत्या प्रकरणात अटक केली. सकाळपासूनच NIA ने त्याच्या घराची झाडाझडती घेण्यास सुरूवात केली आणि दुपारी त्याला अटक करण्यात आली. त्याच्यासोबतच संतोष शेलार आणि मनिष या दोघांनीही ताब्यात घेण्यात आले. या तिघांनाही NIA च्या विशेष न्यायालयाने २८ जूनपर्यंत NIA कोठडीची शिक्षा दिली आहे. मनसुखच्या हत्येत हे तिघेही प्रत्यक्ष सहभागी असल्याचा दावा NIA ने कोर्टात केला. तसेच, निवृत्त असूनही प्रदीप शर्मा यांच्याकडे सचिन वाझेप्रमाणेच एक रिव्हॉल्वर सापडली असल्याचाही दावा NIA ने कोर्टात केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर विशेष कोर्टाने या तिघांना NIA कोठडीत पाठवले. (Pradeep Sharma sent to NIA Custody in Mansukh Hiren Murder Case along with tipper Santosh Shelar Manish)
Also Read: दाऊदच्या भावाला अटक करणारे प्रदीप शर्मा वादग्रस्त का ठरले?

NIA केलेल्या दाव्यानुसार, मनसूखच्या हत्येमध्ये प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे थेट जोडलेले होते. मनिष, सतीष, संतोष आणि इतर काही लोक मनसूख हत्येच्या कटाच्या वेळी सचिन वाझे आणि प्रदीप शर्माच्या सतत संपर्कात होते. सचिन वाझेच्या घरी जशी पिस्तुल सापडली तशीच पिस्तुल प्रदीप शर्माच्या घरी सापडली. त्याचा परवाना संपलेला असल्याचीही माहिती आहे. टवेरा गाडीत मनसुखची हत्या झाल्याचा संशय NIA ला आहे. या गाडीत संतोष शेलार आणि आनंद जाधव हे दोघे होते. सचिन वाजेसोबत प्रदीप शर्माचाही दोन्ही गुन्ह्यात सहभाग होता. सतीष, मनीष, रियाज, संतोष, आनंद, सचिन वाझे यांचा हत्येत सहभाग होता. सतीश आणि मनीष हे घटनास्थळी होते. हिरेन हत्येनंतर सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांनी कट रचून पुरावे नष्ट केले. सर्व आरोपी दोघांच्या संपर्कात होते. मोठ्या प्रमाणात त्यांच्याजवळून पैसेही जप्त केले आहेत.
सचिन वाझे आणि सुनील मानेला अटक केल्यानंतर इतक्या वेळानंतर या आरोपींना का अटक केली? असा प्रश्न कोर्टात विचारण्यात आला. त्यावर, ‘ठोस पुरावे न मिळाल्याने त्यांना आतापर्यंत अटक केली नव्हती. हे आरोपी पोलिस अधिकारी आहेत. त्यामुळे तपास कसा भरकटवायचा याची पूर्ण माहिती त्यांना आहे. पण आता NIA वकिलांकडून माहिती कोर्टात सादर करण्यात आली आहे. जी टवेरा गाडी मनसुखच्या हत्येच्या वेळी वापरली गेली, त्यात मनसुखसह चौघांचे DNA या कारमध्ये सापडले. याचे ठोस पुरावे NIA कडे आहेत. मनसुखच्या हत्येवेळी मनीष सोनी, सतीष मोटेकरी, संतोश शेलार आणि आनंद जाधव हे उपस्थित होते’, असं उत्तर NIAकडून देण्यात आल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणात आरोपींसह साक्षीदारांना पैसे पुरवले असून ज्या गाडीत मनसुखची हत्या झाली, ती टवेरा गाडी संतोष शेलारची आहे, असा दावाही करण्यात आला आहे.

Also Read: प्रदीप शर्मांच्या घरात NIA च्या हाती लागले महत्त्वाचे पुरावे
मनसुखला वाझेनेच फोन करून बोलावले. त्यावेळी गाडीत वाजेसोबत सुनिल मानेही होता. या दोघांनी मनसुखला मनीष, संतोष, आनंद, सतीषच्या गाडीत बसण्यास सांगितले. ४ मार्चला मनसुख घराबाहेर पडले आणि ५ मार्चला मनसुखचा मृतदेह सापडला, असा घटनाक्रम असल्याचा युक्तिवाद NIAकडून करण्यात आल्याची माहिती आहे. या साऱ्या युक्तिवादानंतर तिघांना २८ जूनपर्यंत NIA कोठडी सुनावण्यात आली आहे.
Esakal