वणी (जि. यवतमाळ) : शहरालगतच्या ग्रामीण भागात प्राचीन काळात समुद्रात तयार झालेले विविध चुनखडक आढळतात. याच चुनखडकात २०० ते १५० कोटी वर्षांच्या निओप्रोटोरोझोईक (Neoproterozoic) काळात इथे असलेल्या समुद्रात पृथ्वीवर प्रथम विकसित झालेल्या सायनोबॅक्टेरीया (स्ट्रोमाटोलाईट) (Stromatolite) या सूक्ष्म जिवांचे चुनखडकातील अतिशय दुर्मीळ जीवाश्म सापडले आहेत. चंद्रपूर येथील पर्यावरण आणि भूशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी हे दुर्मीळ जीवाश्म शोधून काढले आहेत. (The-first-fossil-of-life-on-earth-found-in-Yavatmal)
पृथ्वीची उत्पत्ती ४.६ अब्ज वर्षांपूर्वी झाली. परंतु, सजीवांची उत्पत्ती मात्र ३ ते ४ अब्ज वर्षादरम्यान झाली. जगात काही ठिकाणीच असे जीवाश्म सापडले आहेत. त्यांना स्ट्रोमाटोलाईट असे म्हणतात. विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात १५० ते २०० कोटी वर्षांच्या निओप्रोटेरोझोईक काळात तयार झालेल्या चुनखडकात हे जीवाश्मे आढळतात.

तेव्हा समुद्राच्या उथळ उष्ण पाण्यात तयार झालेल्या चिखलात हे जिवाणू विकसित झाले. ते पृथ्वीवरील प्रथम विकसित झालेली जीव होती. ही सर्व आदीजीव खनिजे खाऊन जगत होती. पुढे अशाच जिवांपासून बहुपेशीय जीव विकसित होत गेले. मासोळ्या, सरपटणारे जीव, विशाल आकाराचे डायनोसोर ते पुढे मानव असा सजीवांचा विकास झाला.
चंद्रपूर आणि वणी परिसरात चांदा, बिल्लारी आणि पेनगंगा ग्रुपच्या चुनखडकात स्ट्रोमेटोलाईटची जीवाश्मे आढळली. या सजीवांना शास्त्रीय भाषेत कुकोकल्स आणि ओकटोरीअल्स असे म्हणतात. ही जीवाश्मे चिखलात गोल आकाराची गुंडाळी करून समूहाने राहत होती. क्रिटाशिअस काळात भूगर्भीय घडामोडीमुळे चिखलांचे रूपांतर चुनखडकात झाले आणि जिवांचे रूपांतर जीवाश्मात झाले. करोडो वर्षांनंतरही चुनखडकात सजीवांच्या प्रतिमा दिसतात.

वणी शहराचे नाव जगभर पोहोचेल
चुनखडकात आढळलेली ही अतिशय महत्त्वाची स्ट्रोमाटोलाईटची जीवाश्मे प्रथमच आढळली आहेत. दोन वर्षांपासून ते ही जीवाश्मे शोधत होते. प्रथम आस्ट्रेलियामध्ये ही जीवाश्मे मोठ्या प्रमाणावर आढळली होती. भारतात भोजुंदा, राजस्थान, चित्रकुट, मध्य प्रदेश, चंद्रपूर येथे आढळली आहेत. या संशोधनामुळे वणी शहराचे नाव जगभर पोहोचेल. जीवाश्मांच्या संशोधनामुळे जीवशास्त्र, भूशास्त्र आणि जीवाश्म शास्त्राच्या अभ्यासाला चालना मिळेल असा विश्वास प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला.

चंद्रपुरात जीवाश्म संग्रहालय
प्रा. सुरेश चोपणे हे मूळचे वणीचे आहे. ते या परिसरात नियमित ऐतिहासिक आणि भौगोलिक संशोधन करीत असतात. दोन वर्षांपूर्वी त्यांनी चंद्रपूर जवळ स्ट्रोमाटोलाइटची जीवाश्मे शोधून काढली होती. १५ वर्षांपूर्वी वणी परिसरातील बोर्डा येथे झालेल्या भूकंपाचा त्यांनी अभ्यास केला होता. यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी ५ ठिकाणी पाषाण युगीन स्थळे तर ४ ठिकाणी कोट्यवधी वर्षांपूर्वीची शंख-शिंपल्यांची जीवाश्मे शोधून काढली आहे. चंद्रपूर येथे स्वःताचे शैक्षणिक दृष्ट्या अश्म, जीवाश्म संग्रहालय स्थापन केले आहे.
(The-first-fossil-of-life-on-earth-found-in-Yavatmal)
Esakal