आज आपण बरीच आंदोलनं पाहतो, परंतु कर्नाटक-महाराष्ट्र राज्यांच्या दोन्ही सीमेवर असलेल्या निपाणीत तब्बल चाळीस वर्षांपूर्वी पन्नास हजाराहून अधिक शेतकऱ्यांवर पोलिसांकडून बेछूट गोळीबार झाला होता. पुणे-बंगळूर हा राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांच्या रक्तानं माखला होता. यात काही शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला, तर काही शेतकरी गंभीररित्या जखमी झाले होते. तर अनेक शेतकरी आपल्या निधड्या छतीनं पोलिसांचा गोळीबार आपल्या अंगावर झेलत होते. हे सगळं घडत होतं, केवळ तंबाखूच्या हमीभावासाठी, दरासाठी; पण कर्नाटक शासनाला याचा कोणताच फरक पडत नव्हता. पोलिसांकडून बेछूट गोळीबार सुरुच राहिला अन् संबंध कर्नाटकाच्या इतिहासात निपाणी तालुका ‘रक्तरंजित’ झालेला पहायला मिळाला. आजही या घटनेच्या जखमा ताज्या आहेत.

तंबाखू उत्पादनाबाबत लौकिक असलेल्या निपाणीचे नाव ऐंशीच्या दशकात संबंध देशात चर्चिले गेले. त्याला कारण होते, येथील महामार्ग रोखून झालेले पन्नास हजार तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांचे 24 दिवसांचे अभूतपूर्व आंदोलन आणि त्यातील गोळीबारात हुतात्मा झालेले बारा शेतकरी आंदोलक. उत्पादन खर्चावर आधारित तंबाखूला रास्त दर मिळावा, यासाठी ते आंदोलन होते. सनदशीर व लोकशाही मार्गाने झालेले ते आंदोलन बेछुटपणे कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री आर. गुंडूराव यांनी चिरडण्याचा प्रयत्न केला, यामुळे शेतकऱ्यांत चांगलाच रोष निर्माण झाला.
कर्नाटक शासनाविरुध्द शेतकरी आणखी आक्रमक झाले. पण, सरकारने हे आंदोलन हाणून पाडण्याची योजना आखली. प्रसंगी गोळीबाराचीही रणनीती ठरली होती. गोठणाऱ्या थंडीत, अश्रूधूर, पाण्याच्या फवाऱ्याचा मारा सहन करत आज दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाची धग चाळीस वर्षांपूर्वीच्या निपाणीतील तंबाखू शेतकरी आंदोलनाला होती, हे मात्र निश्चित. चाळीस वर्षात तंबाखू उत्पादन, दर, शासकीय निर्बंध, आंदोलक नेते आदींनी अनेक वळणे घेतली. मात्र, तंबाखू दराबाबत योग्य भावाचे स्वप्न उद्ध्वस्त होऊन येथील शेतकऱ्यांच्या तीन पिढ्या उपेक्षित ठरल्या आहेत. आता काळानुरुप तिसऱ्या पिढीतील शेतकरीच पर्यायी शेतीकडे वळल्याने त्यांनी तंबाखूलाच उपेक्षित ठरवले आहे.
तंबाखूचे एकमेव उत्पादन घेणारा शेतकरी व्यापाऱ्यांच्या जाचक अटीत अडकून हवालदिल झाला होता. त्यातून न्यायासाठी तो संघटित झाला. प्रा. सुभाष जोशी, दत्ता पांगम, गोपीनाथ धारिया, एस. टी. चौगुले, साताप्पा शेटके, आय. एन. बेग, जकाप्पा जाधव आदींनी जागृती निर्माण करत शेतकऱ्यांना संघटित केले. शेतकऱ्यांना दिशा देण्याचे ठरविले. प्रा. जोशी यांनी त्यावेळी तंबाखू उत्पादक आणि कामगार महिलांना लढण्याचे मोठे बळ दिले. त्यांच्या पाठिशी ठाम राहिले. तंबाखू आंदोलनावेळी तत्कालीन मुख्यमंत्री आर. गुंडूराव शासनाने पोलिसी बळाचा वापर करुन आंदोलनास बसलेल्या सुमारे ५० हजार शेतकऱ्यांवर ६ एप्रिल १९८१ रोजी बेछूट गोळीबार व लाठीमार केला. त्यात बारा शेतकऱ्यांचा हाकनाक बळी गेला.

शेतकरी संघटनेची व्यापाऱ्यांशी वाटाघाटी निष्फळ ठरल्याने १४ मार्च १९८१ पासून शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली तंबाखूला उत्पादन खर्चाशी निगडीत भाव मिळण्यासाठी व्यापक आंदोलन छेडले होते. त्यावेळी निपाणीतील कोल्हापूर वेसपासून यमगर्णीपर्यंत हजारो शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. त्यामुळे २४ दिवस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी अखेर आंदोलकांना वेढा घातला. रास्तारोको आंदोलनाची शासनाने दाखल घेतल्याने २६ मार्च रोजी कृषी खात्याचे तत्कालिन सचिव विश्वनाथ यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली, तर गुजरातमधील तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ मणिभाई पाठक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात सहभागी झाले होते.
दरम्यान, यातून कोणतातरी मार्ग निघेल असे वाटत असतानाच, ३१ मार्च रोजी कर्नाटक शासनाने आंदोलन चिरडण्याचा निर्णय घेतल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने आंदोलनकर्त्यांपर्यंत धडकली. ४ एप्रिल रोजी शेतकरी संघटनेने निपाणी बंदचा आदेश देऊन ५० हजार शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा शहराच्या प्रमुख मार्गावरुन काढला. यात महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात होती. मात्र, जे व्हायला नको होतं तेच झालं.
अखेर ६ एप्रिल रोजी पहाटे पोलिसांनी बेछूट गोळीबार व लाठीमार करुन २४ दिवस चाललेले आंदोलन उठविले. त्यात १२ शेतकऱ्यांना हौतात्म्य पत्करावे लागले. तर अनेकजण जखमी झाले. शिवाय आंदोलनात कित्येकांना आपला हात, पाय व अन्य अवयव गमवावे लागले. या आंदोलनात अनेकांचे संसार उध्दवस्त झाले. न्याय हक्कासाठी इतका संघर्ष करावा लागेल, याची कोणालाच कल्पना नव्हती आणि सरकारलाही फरक पडला नव्हता. या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या त्या शेतकऱ्यांना सरकारकडून कोणती मदत मिळाली, नाही कोणता हमीभाव, यात केवळ हक्कासाठी गोळ्या छतीवर झेलायला लागल्या, इतकचं!
तंबाखू आंदोलन : आशिया खंडातील सर्वात मोठी घटना
या आंदोलनादरम्यान शरद जोशी, प्रा. सुभाष जोशी, गोपीनाथ धारिया यांच्यासह संघटनेचे नेते व कार्यकर्त्यांना अटक झाली. या गोळीबाराचे वृत्त तत्कालीन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी देखील उचलून धरले होते. सर्वत्र पोलिसांच्या गोळीबाराचा निषेध नोंदवला जात होता आणि कर्नाटक सरकारची बदनामी होतं होती. लोकसभेत विरोधकांनी ७ एप्रिल १९८१ रोजी सभात्याग करुन गोळीबारप्रकरणी चर्चेची मागणी केली होती. मात्र, सरकार आपल्या भूमिकेवर ठाम होते. जसजशी टीका होत गेली, त्यावर सरकारने आपली उर्मट भूमिका बदलत शेतकऱ्यांना न्याय देण्याचे ठरविले. त्यादिवशी निपाणी शहरातही लाठीमार झाला होता. यात अनेक शेतकरी जखमी झाले होते. बारा शेतकऱ्यांचे हौतात्म्य ही आशिया खंडातील सर्वात मोठी घटना मानली जात होती. याची केंद्र सरकारकडूनही दखल घेतली गेली होती.
हौतात्म्य पत्करलेले 12 शेतकरी
भाऊ लक्ष्मण कोंडेकर (गळतगा), गोविंद लक्ष्मण कोंडेकर, आबासाहेब इंगळे (चिखलव्हाळ), ज्ञानू सुबराव सूर्यवंशी (रामपूर), जोती देवू गावड (भोज), महादेव भीमा तावडे (अक्कोळ), ज्ञानदेव मल्लू पाटील (नांगनूर), कृष्णा दादू पाटील (नांगनूर), दिनकर दाजी चव्हाण (ममदापूर), थळू भीमा कांबळे (जत्राट), शंकर रामा रेंदाळे (एकसंबा), अनंत रामा कुराडे (लिंगनूर). शेतकऱ्यांची गळचेपी कायम तब्बल चाळीस वर्षानंतही या आंदोलनाच्या पाऊलखुणा ताज्या आहेत. तंबाखू उत्पादक शेतकरी योग्य भावाच्या प्रतीक्षेत होता. त्यातच मध्यंतरी व्हॅटसह विविध करांच्या प्रश्नामुळे तंबाखूची खेरदी-विक्री थंडावली. अखेर व्यापारी मागतील, त्या दराने तंबाखू विक्री करण्यात आली. निपाणी आणि परिसरातील तंबाखू व्यापाऱ्यांनी वेगवेगळ्या कारणांनी शेतकऱ्यांची गळचेपी अनेक वर्षे केली असून आजही कमी-अधिक फरकाने सुरुच आहे. यांत्रिकीकरणामुळे तंबाखू वखारीतील कामगारांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. बिडी उद्योगावरही विपरित परिणाम झाला आहे. तंबाखू खरेदी-विक्रीची आजची परिस्थिती पाहता शासनाचे उदासीन धोरण आणि व्यापाऱ्यांची मनमानी कायम आहे. त्यामुळे आतातरी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल की, नाही याती साशंकताच आहे.

दोनशे कोटींची आर्थिक उलाढाल
चाळीस वर्षांनंतर आभासी वाढ असली, तरी उत्पादन खर्चावर आधारित तंबाखूला योग्य भाव मिळत नाही. मात्र, त्याच्या खास वैशिष्ट्यामुळे तो देशभरातील विडी उद्योगाला पुरविला जातो. दोनशे कोटींहून अधिक वार्षिक उलाढाल घडविणाऱ्या तंबाखू उत्पादकांची तिसरी पिढीही दराबाबत उपेक्षितच आहे. व्यापाऱ्यांच्या हातात एकवटलेल्या व्यवहारामुळे अडवणूक होणाऱ्या तंबाखू उत्पादकाला नेहमीच तापदायक अनुभव येतात. परिणामी, साठ हजार हेक्टरपैकी आता जेमतेम दहा हजार हेक्टर क्षेत्रातच तंबाखू उत्पादन शिल्लक आहे. तंबाखूची जागा आता ऊस, सोयाबीन, भुईमूग, केळी, शाळू, भाजीपाला, फूल, फळे, दू्ग्ध उत्पादनाने घेतली आहे.
महाराष्ट्रातील काळम्मावाडीचे पाणी ठरतेय वरदान
स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात मोठे शेतकरी आंदोलन निपाणीत मार्च-एप्रिल १९८१ मध्ये झाले. चाळीस वर्षांपूर्वी झालेले हे आंदोलन सरकारने मोडून काढले तरी, या आंदोलनाने देशातील शेतकऱ्यांमध्ये मोठी जागृती निर्माण झाली. शिवाय व्यापाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची लूटमार थांबली. सध्या सरकारच्या निर्बंधामुळे तंबाखू उत्पादन अडचणीचे ठरत असले, तरी महाराष्ट्रातील काळम्मावाडीचे पाणी निपाणीसह सीमाभागासाठी वरदान ठरले आहे. काळम्मावाडीच्या पाण्यामुळे कूस बदलली असून निपाणी भागातील शेतकरी ऊस पिकाकडे वळला, ही बाब सकारात्मक असून अन्य पर्याय देखील निर्माण करण्याची गरज आहे.
Esakal