राजापूरच्या गंगेच्या इतिहासाची पार्श्वभूमीही मोठी रंजक आहे. स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, राजे प्रतापरूद्र, अहिल्याबाई होळकर, सवाई माधवराव, नाना फडणवीस, बापू गोखले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, वि.दा. सावरकर, आदींनी या गंगातीर्थक्षेत्राला भेटी दिल्या आहे. भारतावर दिडशे वर्ष राज्य करणार्या इंग्रजांच्या व्हाईसरॉय लॉर्ड वेलस्ली, माऊंटबॅटन आदींनाही गंगामाईची भूरळ पडली. त्यांनीही गंगातीर्थक्षेत्राला भेट दिली आहे. अनेक लेखक, कवींनीही या ठिकाणी भेटी दिल्याची माहिती उपलब्ध होते. वयाच्या 60 व्या वर्षी गंगातीर्थक्षेत्री भेट देवून गंगास्नान करणार्या कवीवर्य मोरोपंत यांनी गंगेची थोरवी सांगणारे ‘गंगा प्रतिनिधीर्थ कीर्तन’ हे काव्य रचले. ब्रिटीशांच्या काळामध्ये निर्यातकेंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले राजापूरचे बंदर स्वराज्यामध्ये सामील केल्यानंतर राजे प्रसिद्ध तीर्थक्षेत्री गंगास्नानासाठी गेल्याचे सांगितले जाते.
चौदाव्या शतकामध्ये राजा प्रतापरूद्र याने या चौदाही कुंडाचे आणि येथील इमारतींचे बांधकाम केल्याची माहिती ग्रंथांमधील नोंदीद्वारे अवगत होते. व्हाइसरॉय लॉर्ड वेलस्ली आणि सावंतवाडीचे संस्थानिक राजे भोसले यांनी या बांधकामाची त्यानंतर डागडूजी केल्याचाही काही ग्रंथांमध्ये उल्लेख आढळतो. विविध पौराणिक ग्रंथामधून गंगामाईचा श्रीदेव शंकराच्या पिंडीतून उगम झाल्याच्या नोंदी आढळतात. मात्र, उन्हाळे तीर्थक्षेत्री गंगामाई थेट पाताळातून प्रकट होते. गंगामाईचे नेमके कधी आगमन होणार आणि निर्गमन कधी होणार आहे ? हे अनिश्चित आहे. त्याचे अद्यापही कोडे कुणालाही सुटलेले नाही. भिन्न वैशिष्ट्यांच्या उगमानुसार कुंडाच्या क्षेत्राचे बांधकाम करणयाचे आव्हान होते. मात्र, याही स्थितीमध्ये त्या काळात कुंडाच्या आवाराचे करण्यात आलेले बांधकाम आजच्या काळातील स्थापत्यशास्त्राला आव्हान ठरले आहे.सर्वसाधारणपणे तीन वर्षानंतर आणि आगमनानंतर तीन महिन्यांच्या कालावधीनंतर गंगामाईचे निर्गमन होत असल्याचे सांगितले जाते. त्यातच, उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाई असते अशा काळामध्ये गंगामाईचे आगमन होत असल्याचे बोलले जाते. काही अंतरावरील चौदा कुंडामधील वेगवेगळे तापमान असलेल्या पाण्याने गंगामाई भक्तगणांना स्नान घालते. आगमनही यापूर्वी झाले आहे. मात्र, गेल्या काही वर्षामध्ये गंगामाईचे आगमन आणि निर्गमन यासह वास्तव्याच्या कालावधीमध्ये सातत्याने अनियमिततता असल्याचे चित्र दिसते.गंगातीर्थक्षेत्री मूळ गंगा, चंद्रकुंड, सुर्यकुंड, बाणकुंड, यमुनाकुंड, सरस्वतीकुंड, गोदावरी कुंड, कृष्णकुंड, नर्मदा कुंड, कावेरी कुंड, अग्नीकुंड, भीमाकुंड, चंद्रभागा कुंड आणि काशीकुंड अशी चौदा कुंडे आहेत. काही फुटाच्या अंतरावरील नदीच्या पाण्याचे तापमान थंड असताना या झर्याच्या पाण्याच्या तापमानाबाबत गुढ आहे. त्या ठिकाणी पुरूष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्नान करण्याची व्यवस्था आहे. या ठिकाणी स्नान केल्याने त्वचेच्या विकार कमी होत असल्याचे सांगितले जाते. गंगातीर्थक्षेत्रापासून काही कि.मी. अंतरावर गरम पाण्याचे कुंड आहे. अर्जुना नदीच्या काही फुटाच्या अंतरावर हे गरम पाण्याचटे कुंड आहे. गरम पाण्याचा हा झरा बारमाही वाहतो.