ICC World Test Championship Final 2021 : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, शुक्रवारी पावसानं हजेरी लावली होती. साउदम्टनमधून क्रीडा प्रेमींसाठी खूशखबर आली आहे. आज, शनिवारी सुर्यप्रकाशाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केल्यामुळे सामना सुरु होणार आहे. शनिवारी आणि रविवारी सुर्यप्रकाश असेल असं हवामान विभागानं सांगितलं आहे. सोमवारी 21 जून रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पहिला दिवस पावसाने वाया गेला असला तरिही अंतिम सामन्यावर फारसा प्रवाभ पडण्याची शक्यता नाही. कारण, उर्वरित चार दिवसांमध्ये अतिरिक्त तासभर सामना खेळवून षटकं पूर्ण केली जाणार आहेत. शिवाय, राखीव दिवसही आहे.
शुक्रवारी येथील हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला होता. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळपासूनच पावसानं हजेरी लावली होती. शुक्रवारी दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला होता. पावसानं उसंत दिल्यानंतर पंचांनी दुपारी तीन वाजता (भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेसात वाजता) मैदानाची तपासणी करत पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.



विश्व कसोटी अंजिक्यपद स्पर्धेसाठी 23 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. उर्वरित दिवसांत सामन्याचा निकाल न लागल्यास या राखीव दिवसाचा वापर करण्यात येणार आहे. पावसामुळे वाया गेलेला वेळ 23 जून रोजी भरुन काढला जाईल. मर्यादीत षटकांचा वर्ल्ड कप आणि टी-20 वर्ल्ड कपनंतर आयसीसीने पहिल्यांदाच कसोटीमधील मोठ्या स्पर्धेला सुरुवात केली होती. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या माध्यमातून दोन वर्षांतील कामगिरीच्या जोरावर कसोटी जगतातील नंबर वन संघ ठरवण्यात येणार आहे. विजेत्या संघाला मोठे बक्षीस आणि ट्रॉफीसह मानाची गदा देण्यात येणार आहे. पहिली वहिली-स्पर्धा जिंकून इतिहास घडवण्यासाठी दोन्ही कर्णधार सज्ज आहेत.
Esakal