पुणे विद्यापीठाचा परिसर तसा गर्द हिरव्यागार झाडा-झुडपांनी बहरलेला. मात्र, मागील काही महिन्यांपासून पक्ष्यांची संख्या कमी झाल्याचे जाणवल्याने तेथील सुरक्षा पर्यवेक्षक या पाखरांनो परत या… अशी साद घालत पक्षांसाठी ‘डायनिंग टेबल सजवित आहे. याशिवाय, त्यांनी पक्ष्यांसाठी घरटीही तयार केली आहे. पुणे विद्यापीठ परिसरात पूर्वी अनेक प्रजातींचे पक्षी आढळत असत. तेथील बोटॅनिकल गार्डन आणि छोट्याशा तलावावर मोर, बगळे, खंड्या, करकोचा, पोपट, चिमण्या, पाणकावळे यासारख्या पक्षी मनोसक्त वावरत असत. मागील काही महिन्यांपासून त्यांचा किलबिलाट कमी झाला की काय ? असे तेथील सुरक्षा पर्यवेक्षक सुधीर दळवी यांना जाणविले. सुधीर दळवी यांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची व्यवस्था केली आहे. याशिवाय, वड आणि लिंबांच्या झाडांवर एकूण ११ घरटी बसविली आहेत. सुधीर दळवी म्हणाले, पुणे विद्यापीठ परिसरात निरनिराळ्या प्रकारची झाडे आहेत. त्यामुळे, पूर्वी इथे विविध प्रजातींच्या पक्ष्यांचे दर्शन होत असे. मात्र, मागील काही महिन्यांपासून पक्ष्यांचा वावर कमी झाल्यासारखे वाटत आहे. छोट्या चिमण्या दिसेनाशाच झाल्या आहेत. पक्षांना सुरक्षित घरटी तयार करण्यासाठी जागा राहिली नाही. त्यांच्याबद्दल नागरिकांमध्येही प्रेमभावना कमी झाल्याचे जाणवते. घरात पक्षी आल्यावर हुसकावून लावत आहेत. त्यामुळे, पक्षी आणि प्राण्यांसाठी दाणा-पाण्याची व्यवस्था करत आहे. तसेच झाडांवर घरटीही ठेवली आहेत दळवी हे दररोज पाखरांना बाजरी, हरभरा डाळ, शेंगदाण्याचा कुट तर खारुताईसाठी शेंगा खाण्यासाठी देत आहेत. पक्षी जमिनीवर उतरत नसल्याने त्यांच्यासाठी उंचावरच पाण्याचा ट्रे बांधला आहे.