सध्या ग्लोबल वार्मिंगमुळे (Global Warming) पृथ्वीचं अस्तित्व धोक्यात आलं असून यामुळे संपूर्ण जगात मुसळधार पाऊस (Heavy Rain), पूर, दुष्काळ, चक्रीवादळ (Cyclone) यासारखी आपत्कालीन परिस्थिती ओढावली आहे.

सध्या ग्लोबल वार्मिंगमुळे (Global Warming) पृथ्वीचं अस्तित्व धोक्यात आलं असून यामुळे संपूर्ण जगात मुसळधार पाऊस (Heavy Rain), पूर, दुष्काळ, चक्रीवादळ (Cyclone) यासारखी आपत्कालीन परिस्थिती ओढावली आहे. या प्रकाराबाबत तज्ञांकडूनही गंभीर इशारा देण्यात आला असून त्यांच्या मते, पृथ्वीवरील संपूर्ण बर्फ वितळून समुद्राच्या (Sea) पाणीपातळीत काही दिवसांत झपाट्याने वाढ होणार आहे. शिवाय, समुद्रात निर्माण झालेल्या बेटांनासुध्दा याचा फटका बसणार असून समुद्राकडेला असणारी शहरही पाण्यात बुडणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी अमेरिकन शास्त्रज्ञ बेनो गुटेनबर्ग (American scientist Beno Gutenberg) यांनी केलेल्या अभ्यासात असे समोर आले आहे, की समुद्राच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून हा मानवी सजीवसृष्टीला धोका आहे. याबाबत गुटेनबर्ग यांनी गेल्या 100 वर्षांचा डेटा संकलित केला असून त्यावर अभ्यासही केला आहे. त्यामुळे त्यांच्या इशारा नुसार, सध्या ध्रुवीय बर्फ वितळत असून समुद्राच्या पाण्यात मोठी वाढ होत आहे. दरम्यान, यापूर्वी नव्वदच्या दशकात नासानेही असा इशारा दिला होता. त्यामुळे समुद्रातील पाण्यात होणारी वाढ म्हणजे, सुंदर बेटांना याचा फटका बसणार असून ती बेटं बुडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अशी अनेक बेटे आहेत, जी पुढील 6 दशकांपेक्षा कमी काळात पाण्यात बुडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सोलोमन द्वीप (Solomon Island) : दक्षिण प्रशांत महासागरात (Pacific Ocean) सुमारे 1000 बेटांचा समावेश असलेला हा गट वेगाने बुडत आहे. रिडर्स डायजेस्टच्या वृत्तानुसार, 1993 सालापासून म्हणजेच, या बेटाच्या देखरेखीची सुरूवात झाल्यापासून या बेटलगतचे पाणी दरवर्षी 8 मिमीने वाढत आहे. इतकेच नाही, तर या बेटावरील 5 बेटं पाण्यात बुडूनही गेली आहेत.
मालदिव (Maldives Island) : पर्यटकांसाठी ‘स्वर्ग’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या बेटाविषयी जवळ-जवळ सर्वच आशियाई लोकांना माहिती असेल. या बेटाला हिंदी महासागराची ‘शान’ देखील म्हटलं जातं. येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी रिसॉर्ट्स आणि पाण्याखाली असणारं हॉटेल देखील उपलब्ध आहे. परंतु, जागतिक बँकेसह अनेक संस्थांमध्ये या बेटाबाबत भीती निर्माण झाली आहे. कारण, समुद्रातील वाढत्या पाण्यानुसार, सन 2100 पर्यंत हा बेट (देश) पाण्यात बुडण्याची शक्यता आहे.
पलाऊ (Palau Island) : प्रशांत महासागरात वसलेला ‘पलाऊ’ हा बेट सध्या बुडण्याच्या मार्गावर आहे. सन 1993 पासून इथल्या समुद्राच्या पाणीपातळीत दरवर्षी सुमारे 0.35 इंचाने वाढ होत आहे. जर याच वेगाने उष्णता वाढत राहिली तर, आगामी काळात पाण्याची पातळी वार्षिक 24 मीटर गतीने वाढण्यास सुरवात होईल. तज्ञांच्या अंदाजानुसार, 2090 पर्यंत हे घडूही शकतं. यानंतर ‘पलाऊ बेट’ वाचविणं खूप कठीण होऊन बसेल.
मायक्रोनेशिया (Micronesia Island) : मायक्रोनेशिया हा प्रशांत महासागरात वसलेला एक बेट देश आहे. हवाईपासून सुमारे 2500 मैलांवर हा द्वीपसमूह 607 बेटांनी बनलेला आहे. ज्यात केवळ 270 चौरस मैल जमीन असून पर्वत आणि समुद्रकिनाऱ्यांचा समावेश आहे. मायक्रोनेशियाची अनेक बेटं देखील समुद्रातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे पाण्यात बुडून गेली आहेत, तर अनेक बेटं आकाराने लहान होत आहेत.
फिजी (Fiji Island) : दक्षिण प्रशांत महासागरातील हे सुंदर बेटही ग्लोबल वार्मिंगमुळे धोक्यात आलंय. संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शननुसार, ध्रुवीय बर्फ वितळल्यास या बेटाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे आतापासूनच या बेटाची काळजी घेतली पाहिजे, अन्यथा हा बेट काही दशकांत समुद्राच्या तळाशी असेल, असे सांगितले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here