मध्य रेल्वे मार्गावरील भायखळा स्थानकावर जाताच इतिहासातील गोष्टी पुन्हा जिवंत झाल्याचा भास होतोय. भायखळा स्थानकाचा पुनर्विकास करून त्याला त्यांचे 1857 सालचे रुप देण्यात आले आहे. आता फक्त स्थानकात लहान-सहान बाबींवर शेवटचा हात फिरविण्याचे काम बाकी असून पुढील महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भायखळा स्थानकाचा जीर्णोद्धार करण्याच्या कामांसाठी जुलै, 2019 रोजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर हे काम एका वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र, कोरोना महामारीने, देशभरातील लॉकडाऊनमुळे पुनर्विकासाचे काम रखडले. लॉकडाऊन हटवल्यानंतर पुन्हा कामे वेगाने हाती घेतली. जुलै, 2019 ते जुलै 2021 या दोन वर्षात भायखळा स्थानकाचे काम पूर्ण होऊन ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या स्थानकासारखेच जसेच्या तसे स्थानक पुन्हा उभे केले आहे. या कामासाठी एकूण 2 ते 3 कोटी रुपये खर्च आला आहे.देशातील सर्वाधिक जुन्या स्थानकांपैकी एक असलेल्या भायखळा स्थानकाचे रुप पालटण्याचे काम मुंबई हेरिटेज कमिटी, आय लव्ह यू मुंबई, आभा लांबा असोसिएशन यांच्यावतीने करण्यात आले आहे. स्थानकाचे काम दोन टप्प्यात करण्यात आले. पहिल्या टप्प्यात नक्षी, दरवाजे, खिडक्या, छत, भिंती यांचा कायापालट करण्याची कामे केली. तर, दुसऱ्या टप्प्यात छत, छप्पर, स्थानकातील फलाट क्रमांक एकची दुरूस्ती, स्थानक प्रबंधक, आरपीएफ यांच्या कार्यालयाचे काम पूर्ण करण्यात आले. 1857 सालापासून उभ्या असलेल्या भिंतींना पॉलीश करून चमकविले आहे. भायखळा स्थानकाच्या पश्चिमेकडे 26 कमानी आहेत. या कमानींवर फुलांवर नक्षीकाम केलेले आहे. हे नक्षीकाम चकाचक केल्या आहेत. स्थानकातील बाहेरील भागातील भिंती स्वच्छ केली असून छतावर नवीन ब्रिटिनकालीन कौले लावण्यात आली आहेत. भायखळा स्थानक हे व्यस्त स्थानकांपैकी एक स्थानक आहे. मुंबई-ठाणे लोकल 1853 साली चालविण्यात आली. तेव्हा सुरूवातीचे स्थानक भायखळा होते. त्यावेळी 200 कामगारांनी रेल्वेचे इंजिन या स्थानकावर आणले होते. सुरूवातीला हे स्थानक लाकडी होते. त्यानंतर 1857 पुन्हा नव्याने बांधकाम करण्यात आले.