पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. कोरोनाच्या नियमांचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केलं जात आहे. आज पुण्यात वीकेंड लॉकडाऊन आहे; मात्र सोशल डिस्टन्सिंगच्या कोणत्याही नियमांचं पालन या ठिकाणी होताना दिसत नाहीये. अजित पवार पक्ष कार्यालयाची पाहणी करण्यासाठी आत गेले होते. सध्या हा कार्यक्रम सुरु असून मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे.
Also Read: पुण्याबाहेर गेल्यास, करावं लागेल होम क्वारंटाईन : उपमुख्यमंत्री

या कार्यक्रमाला येण्याआधी सकाळीच उपमुख्यमंत्र्यांनी जनतेला उद्देशून नियम पाळण्याचं आवाहन केलं होतं. कडक कार्यवाही करण्याचा इशारा देखील दिला होता. मात्र, खुद्द अजित दादांच्या कार्यक्रमातच हा गोंधळ पहायला मिळत आहे.

1999 नंतर मोठं पक्ष कार्यालय पहिल्यांदाच होत आहे. 22 वर्षांनंतर कार्यालय होत असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. त्यामुळे समजून घ्या, दिलगिरी व्यक्त करतो, असं अंकुश काकडे यांनी यावेळी म्हटलं आहे.
शहरात शनिवार आणि रविवारी विकेंडला कडक निर्बंध राहतील. या दोन दिवशी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील बाधित रुग्ण दर कमी न झाल्यामुळे निर्बंध कायम राहतील. नागरिकांनी पर्यटनासाठी गर्दी करू नये. अन्यथा जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाइन करावे लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. मात्र दुसरीकडे पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी ही तोबा गर्दी पहायला मिळत आहे.
Esakal