वर्ष- १९६०, स्थळ- लाहोर (पाकिस्तान)
पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल अयुब खान यांच्या उपस्थितीत भारत-पाकिस्तानदरम्यान एक महत्त्वाची स्पर्धा सुरू होती. सर्वांचे लक्ष लागले होते, ते मिल्खा सिंग आणि अब्दुल खलीक यांच्यावर. अब्दुल हा पाकिस्तानचा महान धावपटू होता. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नवनवे विक्रम रचून त्याने पाकिस्तानचे नाव उंचावले होते. त्या दिवशी २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत मिल्खा सिंगने आशियाच्या सर्वांत जलद धावपटू अब्दुल खलीक यांना मागे टाकले, असे म्हणतात की त्या दिवशी मिल्खा धावलाच नाही तो उडत होता. या तरुण शिखाकडून जनरल अयुब खान एवढे प्रभावित झाले की त्यांनी मिल्खाला ‘द फ्लाईंग सिख’ असे नाव दिले. त्या दिवशी क्षितिजावर मिल्खा सिंगचा उदय झाला आणि अब्दुलचा अस्त झाला. त्या एका पराभवाने अब्दुल खलीक कायमचा विस्मृतीत ढकलला गेला.
तरुण मिल्खाने पराभूत केलेल्या अब्दुल खलीक यांचे १९८८ मध्ये रावळपिंडी इथे निधन झाले. मरणानंतरही पाकिस्तानचा हा सर्वश्रेष्ठ धावपटू दुर्लक्षित राहिला. पंजाबमधील अब्दुल यांच्या गावाला जाण्यासाठी आजही पक्का रस्ता नाही. आशियाचा सर्वांत वेगवान धावपटूची कबरही दुर्लक्षितच आहे.
मिल्खा सिंगप्रमाणे अब्दुल खलीक लष्करातून पुढे आले. एकमेकांपासून ५०० किलोमीटर अंतरावर दोघेही पंजाबमध्ये जन्मले होते. दोघांनीही पंजाबचा गौरव वाढवला. दोघांनाही विरुद्ध देशाच्या नेत्यांनी पदवी दिली. जनरल अयुब खान यांनी मिल्खाला फ्लाईंग सिख ही पदवी दिली. त्याच पद्धतीने १९५४ मध्ये मनिला इथे भरलेल्या आशियाई स्पर्धेत अब्दुल खलीक यांनी १०.६ सेकंदात धावण्याची स्पर्धा जिंकून नवा विक्रम रचला होता. भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते खलीक यांच्यापासून एवढे प्रभावित झाले की, त्यांनी खलीक यांना ‘द फ्लाईंग बर्ड ऑफ एशिया’ ही पदवी दिली; मात्र मिल्खा सिंग यांच्याकडून पराभव झाल्यानंतर खलीक यांना पाकिस्तान झपाट्याने विसरला. कदाचित इतर देशांच्या धावपटूकडून पराभव झाला असता तर त्यांच्या वाट्याला ही वेळ आली नसती. अब्दुल यांचा लहान भाऊ, अब्दुल मलिक यांना त्याची प्रचंड खंत आहे. ते म्हणतात मिल्खा सिंग यांचा मी खूप आदर करतो. एक माणूस म्हणून मिल्खा मोठा होता; मात्र जेव्हा ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट बघतो, तेव्हा मनाला वेदना होतात. भारताने मिल्खा सिंगसारख्या खेळाडूला डोक्यावर घेतले, खूप आदर, मानसन्मान दिला; मात्र जगभरात पाकिस्तानचे नाव करणाऱ्या खलीकसारखा खेळाडू सरकारकडून उपेक्षित राहिला. मिल्खाच्या जीवनावर चित्रपट निघाला. मिल्खा अजरामर झाला; मात्र आयुष्यभर देशासाठी धावणाऱ्या खलीक यांचे धावणे वाया गेले असेच म्हणावे लागेल, असे ते म्हणतात.

टोकियो आशियाई स्पर्धेदरम्यान मिल्खा आणि खलीक यांची एका हॉटेलमध्ये पहिल्यांदा भेट झाली होती. त्या वेळी मिल्खासारख्या किती धावपटूंचा पराभव मी केला, याची मोजदाद नसल्याचे खलीक यांनी म्हटले. आपल्या दोघांमध्ये स्पर्धाच नाही असा टोमणाही खलीक यांनी मिल्खा सिंग यांना लगावला; मात्र भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मिल्खा सिंग यांनी ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक पटकावले. लाहोरमध्ये पराभूत झाल्यानंतर अपयशाने खचलेल्या खलीक यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न मिल्खा सिंग यांनी केला होता.
मेलबर्न ऑलिंपिक, रोम ऑलिंपिकमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकवत ठेवणारा अब्दुल खलीफ एकमात्र पाकिस्तानी धावपटू होता. राष्ट्रीय खेळ स्पर्धेत १०० सुवर्णपदके, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत २६ सुवर्णपदके, २३ रजतपदके त्याने मिळविली. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान अब्दुल खलीक यांना युद्धकैदी म्हणून अटक झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जेव्हा खलीक यांच्याबद्दल कळाले तेव्हा त्यांनी खलीक यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला; मात्र खुद्द खलीक यांनी ती सुटका नाकारली. इतर युद्धकैद्यांसोबतच माझी सुटका करावी, असे त्यांनी सांगितले. मिल्खा आणि खलीक हे दोन देशातील सर्वोत्तम धावपटू होते; मात्र मिल्खा सिंग यांचे निधन झाल्यानंतर प्रत्येक भारतीय त्यांची आठवण करतोय, हळहळतोय; मात्र अब्दुल खलीक यांच्या नशिबात असा सन्मान आलाच नाही.
Esakal