औरंगाबाद: योग ही साधनाही आहे आणि संस्कारही. याच्या बळावर शरीराचे मंदिरही होऊ शकते, अर्थात शारीरीक व्याधींपासून मुक्ती, मनःशांती, चिंतामुक्त जगण्याची समृद्धता याच योगामुळे येते. भारतीय संस्कृतीतून ती मिळालेली एक अनमोल देणगी असून, साधनेतून जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचाही दृष्टिकोन वृद्धींगत होतो. एमजीएम विद्यापीठाचे योग विभाग प्रमुख गंगाप्रसाद खरात म्हणाले की, योगशास्त्राचा मूळ उद्देश शरीर व मन यांची समग्र साधना करणे हा आहे. यंदा सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. योगशास्त्र अखिल मानवजातीसाठी असून, सर्व धर्माच्या पलीकडे जाणारे शास्त्र आहे. याला एक प्रकारे प्राचीन मानसशास्त्र म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

अलीकडच्या काळामध्ये जगभरातील लोक योग साधनेकडे वळत आहेत. अर्थात योगसाधना समाजाची सांस्कृतिक पातळी उंचावण्याचे काम करते. पतंजली योगसूत्र मनस्वास्थ्यासाठी, शरीर स्वास्थ्यासाठी काम करते. ते कोणत्याही धर्माच्या चौकटीत बसवता येत नाही. महर्षी पतंजलींनी योगशास्त्र लिहिलं तेव्हापासून योगाभ्यास हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, भारतीय तत्त्वज्ञानामध्ये योग शास्त्राला एक दर्शन म्हणून मान्यता आहे, गौतम बुद्धांनी देखील योगशास्त्राचा अभ्यास केला होता. योगशास्त्राचा हा प्राचीन भारतीय वारसा आधुनिक काळात शरीर व मनाच शास्त्र म्हणून योग आता हळूहळू व्यापक स्वरूप धारण करीत चाललेला आहे.
Also Read: दहावीच्या मूल्यमापनाबाबत संभ्रम दूर करण्यासाठी बोर्डाकडून हेल्पलाइन
योग ही भारताने जगाला दिलेली अनमोल अशी देणगी आहे. महर्षी पतंजली यांनी योग दर्शनमध्ये सांगितलेल्या योगसूत्रांमध्ये ‘योग चित्त वृत्ती निरोध’ म्हणजे मनाच्या वृत्तीवर नियंत्रण मिळवणे म्हणजे योग होय.
-दररोज नियमित योग साधना केल्यास आपल्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वैचारिक आणि भावनिक पातळीवर संतुलन साधता येते.
-कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमचे मन नेहमीसाठी संतुलित ठेवू शकता.
-शरीर निरोगी राहण्यासाठी, कामात तत्परता व स्वतःकडे आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो.
-चोवीस तासांपैकी एक तास स्वतःसाठी द्यायला हवा. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी राहू शकू एवढे योगसाधनेत सामर्थ्य.
-धावपळीच्या काळात योग साधना अत्यंत महत्त्वाची आहे.
-भारतीय संस्कृतीत सात सुखांपैकी निरोगीपण हे पहिले ते नसल्यास उर्वरित सुखाचा उपयोग नाही.
– रोज एक तास प्राणायाम, ध्यान आणि योगासनाने शरीर, मन, बुद्धी, विचार आणि भावना संतुलित ठेवता येतात.
-योगामुळे हळूहळू यशाचा आलेख उंचावतो.

योग हा तसा खूप मोठा आणि गहन विषय असून महत्त्वाचाही आहे. इंग्रजीतील एक म्हण असून तिचा मथितार्थ शरीर मजबूत तर मन मजबूत असा आहे. आजच्या काळात योगाचे उद्दिष्ट आणि महत्त्व लोकांना समजू लागले. म्हणूनच ते आपल्या जीवनशैलीमध्येही अवलंबण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. शरीर सुदृढ असेल तर त्यांचे आरोग्यही सुदृढ आणि आरोग्य सुदृढ तर सर्व गोष्टी सोईस्कर पार पडतात.
गंगाप्रसाद खरात, योग विभागप्रमुख, एमजीएम विद्यापीठ औरंगाबाद.
Esakal