हाँगकाँग : हाँगकाँगमधील ‘अॅपल डेली’ हे लोकशाहीवादी वृत्तपत्र येत्या रविवारी बंद होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी संचालक मंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल असे सांगण्यात आले. सरकारी अधिकाऱ्यांनी या वृत्तपत्राची एक कोटी ८० लाख हाँगकाँग डॉलरची मालमत्ता गोठविली. नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा भंग केल्याचा आरोप वृत्तपत्र व्यवस्थापनावर ठेवण्यात आला आहे. मुख्य संपादक रायन लॉ आणि कार्यवाह पदावरील इतर चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Also Read: कोरोना रोखण्यासाठी दोन भिन्न लशी प्रभावी; WHOच्या शास्त्रज्ञांचा दावा
या वृत्तपत्राने चीनच्या नेतृत्वावर नेहमीच टीका केली आहे. संस्थापक जिमी लाई यांचे सल्लागार सायमन मार्क्स यांनी काही दिवसांत वृत्तपत्र बंद होऊ शकेल असे संकेत सोमवारीच दिले होते. ते म्हणाले होते की, तुमच्याकडे आर्थिक पाठबळ नसेल तर तुम्ही सेवेची मागणी करू शकत नाही. मुख्य म्हणजे खर्च भागविण्यासाठी रोख रक्कम नसेल तुम्ही लोकांना आर्थिक मोबदल्याचे आश्वासन देऊ शकत नाही. बँक खात्यांवरील कारवाई मागे घेण्यात आली नाही तर वृत्तपत्र बंद पडायला वेळ लागणार नाही.

Also Read: मराठा आरक्षण: संभाजीराजेंनी दिला एक महिन्याचा अल्टीमेटम
५०० पोलिसांची कारवाई
गेल्या आठवड्यात हाँगकाँग पोलिसांनी या वृत्तपत्राच्या कार्यालयावर छापे घातले होते. त्यावेळी तब्बल पाचशे पोलिसांनी त्यात भाग घेतला होता. आपल्याला वॉरंटनुसार झडती घेण्याचा आणि पत्रकारितेशी संबंधित साहित्य जप्त करण्याचा अधिकार असल्याचा पोलिसांनी दावा केला आहे.
३० लेखांचा संबंध
अॅपल डेलीने २०१९ पासून ३० पेक्षा जास्त टीकात्मक लेख छापल्याच दावा पोलिसांनी केला. हाँगकाँग आणि चीनवर निर्बंध घालावेत असे आवाहन या लेखांद्वारे करण्यात आले.
संस्थापक कारागृहात
या वृत्तपत्राचे संस्थापक जिमी लाई यांना यापूर्वीच कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. २०१९ मध्ये परवानगी नसलेल्या सभेत भाग घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. लाई हे लोकशाहीवादी चळवळीचे सर्वाधिक नामवंत समर्थक मानले जातात. ते अब्जाधीश आहेत. मे महिन्यात त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांची बँक खाती गोठविण्यात आली. त्यांच्या बँक खात्यात कोणताही व्यवहार केल्यास सात वर्षे कारागृहात डांबले जाईल असा इशारा दोन प्रमुख बँकांना देण्यात आला
Esakal