आटपाडी : तालुक्यातील तळेवाडी (talewadi) येथे दगड फोडून तयार केलेल्या माळावर आय.टी. अभियंता (IT engineer) शशिकांत शिंदे या तरुणाने झिरो बजेट टिशू कल्चर बांबू लागवडीचा (bamboo farming) यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांच्या हटके प्रयोगाला (aatpadi, sangli) अनेकजण भेट देऊन माहिती, मार्गदर्शन घेऊ लागलेत. तळेवाडी येथील ३५ वर्षीय तरुण आय. टी. अभियंता शशिकांत पुण्यात नामांकित कंपनीत नोकरी करतात. वडिलोपार्जित माळरान शेत जमीन गावाकडे अनेक वर्षांपासून पडून होती.
गेल्यावर्षी लॉकडाउनमध्ये (lockdown) ते गावाकडे आले. विरंगुळा म्हणून शेताकडे जायचे. या काळात त्यांनी माळावरील मोठे दगड फोडून बाहेर काढले. माळावर तलावातील काळी माती भरून जमीन तयार केली. त्यांच्या एका शेती मित्राने टिशू कल्चर बांबू लागवडीचा सल्ला दिला. त्याच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबरमध्ये प्रतिरोप १४० रुपये प्रमाणे बलगोवा प्रजातीची ५५० टिशू कल्चर रोपांची एक एकरात घन पद्धतीने खड्डे पाडून शेणखत घालून लागवड केली. दोन ओळीतील अंतर आठ, तर रोपातील अंतर सात फूट ठेवले. ठिबक सिंचन केले. लागवडीला आठ महिने झालेत. दिवसाला एक इंच वाढ होते. तीन वर्षांनंतर ४० फूट उंचीची झाल्यावर कापणी केली जाते. त्यानंतर दर वर्षी कापणी केली जाते. एका बांबूला नवीन अनेक कोंब फुटून त्यापासून बेटच तयार होते. या बांबूशेतीला अनेक शेतकरी भेट देऊन माहिती घेऊ लागले.
Also Read: ‘मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन सरसकट व्यापारी दुकाने सुरु करु’

आटपाडीचे ॲड. धनंजय पाटील, उपसरपंच प्रा. अंकुश कोळेकर, इतर शेतकऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली. सध्या टिशू कल्चर बांबूची तीन हजार पाचशे रुपये टन जागेवर खरेदी केली जाते. त्यांनी लावलेली व्हरायटी पश्चिम महाराष्ट्रात कुठेही माफक पाण्यात येऊ शकते. तसेच खर्च शून्य आहे. औषध फवारणी करावी लागत नाही. बांबूपासून इथेनॉल, कागद निर्मिती केली जाते. कलाकुसरीसाठीही वापर केला जातो. मागणी चांगली असल्यामुळे विक्रीची समस्या कसलीही नसल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.
कोरोनाने शेतीकडे वळले. कोरोनामुळे शिंदे गावाकडे आले होते. कसलेच काम नव्हते. मित्राच्या मदतीने बांबूची लागवड केली आहे. सध्याही ते गावी आले आहेत. कमी पाण्यावर येणारी गोड चिंच आणि केशर आंबा लागवडीचे तयारी सुरू केली आहे.
Also Read: बिग बॉस मराठी ३ लवकरच; महेश मांजरेकरांनी शेअर केला व्हिडीओ
“मित्राच्या मार्गदर्शनाखाली पडीक माळावर बांबूची लागवड प्रयोग म्हणूनच केली. आठ महिन्यांत सहा फुटांवर वाढ झाली. त्यानंतर गोड चिंच आणि आंबा लागवडीचे नियोजन आहे. पुण्यातील कंपनीत जे समाधान मिळत नाही ते गावातील शेतीमध्ये मिळते.”
– शशिकांत शिंदे
Esakal