साताऱ्याच्या पश्‍चिमेस सुमारे 18 किलोमीटर अंतरावर सज्जनगड आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी तेथे तपश्‍चर्या केली होती. राममंदिरही उभारले आहे, तसेच समर्थ रामदास स्वामी यांची गडावरच समाधी आहे. तेथून पुढं ठाेसेघर, चाळकेवाडी येथील निसर्गात आनंद लुटण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी असते.

सज्जनगडावर जात असताना वाटेतच भली मोठी श्री हनुमानाची मुर्ती पाहायला मिळते. येथे समर्थ रामदास स्वामींचे जीवन चरित्र उलघडणारी समर्थ सृष्टी तयार केली आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोठे झाला येथे पासून ते सज्जनगडावरील समाधीपर्यंतचा कार्यकाल सुंदररित्या समर्थ सृष्टीत मांडण्यात आला आहे. माहितीपूर्ण तसेच उत्तम कलाकृतीच्या माध्यमातून याची मांडणी करण्यात आली आहे.
सज्जनगड : समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेली भूमी. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार व समर्थ द्वार, ही दोन द्वारे म्हणजे 17 व्या शतकातल्या स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे.
सज्जनगडावर समर्थांचे समाधीस्थान आहे. याबराेबरच श्रीराम घळ, घोडतळे, शेजघरात समर्थांच्या वापरण्याच्या अनेक वस्तू आणि पाण्याचे मोठे हंडे आहेत. श्रीराम मंदिर, मारुती मंदिरही गडावर आहे.
सज्जनगड फिरण्यासाठी दोन तास पुरेसे आहेत. गडाच्या पाठीमागील बाजूस धाब्याचा मारुती मंदिर आहे. तेथून हिरवेगार डाेंगर पाहताना पर्यटक हरखून जातात.
ठोसेघर : तारळी नदीच्या उगमावर ठोसेघर गावानजीक भलामोठा धबधबा तयार झाला आहे, तसेच काही छोटे धबधबे आकर्षक आहेत. निसर्गाची मुक्त उधळण असलेले हे ठिकाण पावसाळी पर्यटकांना खुणावते. पर्यटकांना धबधबा आणि निसर्गसौंदर्य व्यवस्थित पाहाता यावे, यासाठी वन विभागाने निरीक्षण गॅलरी उभारली आहे. एकाच वेळी 600 ते 700 निसर्गप्रेमी निसर्गाचे निरीक्षण करू शकतील.
ठोसेघरचा धबधबा पाहून तिथून पुढे गेले चाळकेवाडीचे पठार लागते. या पठारावरची सपाटीची डांबरी वाट पाटणला जाते. दोन्ही बाजूला शेकडो पवनचक्‍क्‍या भिरभिरत असतात. हा सारा आसमंत सदैव धुक्‍यांनी वेढलेला असतो.
वनकुसवडे : चाळकेवाडी व वनकुसवडे परिसरातील पठारावर पवनऊर्जा प्रकल्पातील सुमारे अडीच हजार पवनचक्‍क्‍या पाहायला मिळतात. विविध कंपन्यांनी उभारलेल्या पवनऊर्जा प्रकल्पामुळे वीजनिर्मिती होऊ लागली आहे. पावसाळ्यात हा परिसर धुक्‍यांनी भरलेला असतो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here