राष्ट्रमंचच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चर्चेविषयी माहिती देण्यात आली. मात्र या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी बोलण्याचं टाळलं.
नवी दिल्ली – राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेली राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी पार पडलेली ‘राष्ट्रमंच’ची बैठक राजकीय स्वरूपाची नव्हती. ही बैठक भाजपविरोधात अन्य राजकीय पक्षांची आघाडी करण्याचा तसेच काँग्रेसला एकाकी पाडण्याचा प्रयत्न मानणेही चूक ठरेल, असे आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्पष्ट करण्यात आले. यामुळे राजकीय मंचावरील संभाव्य तिसऱ्या आघाडीची शक्यता तूर्त तरी थंडावली आहे.
यशवंत सिन्हा यांच्या ‘राष्ट्रमंचा’च्या बैठकीच्या निमित्ताने प्रस्तावित तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झाली होती. या बैठकीसाठी बोलाविण्यात आलेले राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रमुख चेहरे लक्षात घेतले तर भाजपविरोधात काँग्रेसला बाजूला ठेवून इतर विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्याचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा प्रयत्न असल्याचे चित्र निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अडीच तास चाललेल्या बैठकीनंतर ही राजकीय पर्याय उभा करण्यासाठीची चर्चा नसल्याचा खुलासा करण्यात आला. मात्र, स्वतः शरद पवारांनी माध्यमांना सामोरे जाणे टाळले.
Also Read: खूशखबर! लहान मुलांना सप्टेंबरपर्यंत मिळणार लस; एम्सची माहिती
विविध विषयांवर चर्चा
राष्ट्रमंचाच्या बैठकीमध्ये यशवंत सिन्हा, शरद पवार, उमर अब्दुल्ला, पवन वर्मा, नीलोत्पल बसू, जयंत चौधरी या राजकीय क्षेत्रातील प्रमुख चेहऱ्यांसोबतच जावेद अख्तर, माजी न्या. ए.पी. शाह आदी सहभागी झाले होते. ‘राष्ट्रमंच’चे प्रमुख असलेले यशवंत सिन्हा यांनी याआधीच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना यशवंत सिन्हा यांनी सांगितले की ,‘‘ या अडीच तासांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.’’ राष्ट्रवादीचे नेते माजीद मेमन, समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनशाम तिवारी यांनी बैठकीतील मुद्द्यांची माहिती दिली.

सिन्हांनीच बैठक बोलाविली
माजीद मेमन यांनी प्रारंभीच ही बैठक राजकीय स्वरूपाची नसल्याचा खुलासा केला. मागील २४ तासांपासून प्रसारमाध्यमांमध्ये चाललेली चर्चा पाहता राष्ट्रमंचची बैठक भाजपविरोधातील राजकीय पक्षांना एकत्र करण्यासाठी शरद पवार यांना बोलावल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात असे काहीही नाही. ही बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली असली तरी ती पवारांनी नव्हे तर राष्ट्रमंचचे प्रमुख यशवंत सिन्हा यांनी बोलाविली होती. राष्ट्रमंचचे संस्थापक सदस्य, कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. असे माजीद मेनन यांनी स्पष्ट केले.
Also Read: काँग्रेसविना तिसऱ्या आघाडीचा कोणताही विचार नाही – माजीद मेमन
काँग्रेसवर बहिष्कार नाही
मेमन म्हणाले की, ‘‘ या राजकीय निर्णयात पवारांनी काँग्रेसला एकाकी पाडले असे चित्र रंगविले जात असले तरी तसे अजिबात नाही. निमंत्रणात राजकीय भेदभाव झालेला नाही. राष्ट्रमंचच्या विचारसरणीशी सहमत असलेल्यांनाच बोलाविण्यात आले होते. काँग्रेसचे विवेक तनखा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, अभिषेक मनू सिंघवी आणि शत्रुघ्न सिन्हा यांना निमंत्रण देण्यात आले होते. परंतु ते दिल्लीत नसल्यामुळे या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. त्यामुळे हा काँग्रेसवरचा बहिष्कार मानणे पूर्णतः चूक आहे.’’

पर्यायी विचार देण्याचा प्रयत्न
देशातील विद्यमान राजकीय, आर्थिक आणि सामाजिक वातावरण सुधारण्यासाठी राष्ट्रमंच काय करू शकतो? यावर विचारमंथन झाल्याचेही मेमन म्हणाले. देशात ज्वलंत मुद्द्यांवर पर्यायी विचारसरणी तयार करण्याची नितांत आवश्यक असून त्यासाठी टीम तयार करण्याची जबाबदारी ‘राष्ट्रमंच’चे संस्थापक समन्वयक यशवंत सिन्हा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तसेच ‘राष्ट्रमंच’ची पुन्हा बैठक घेण्याचेही ठरले असून इंधन दरवाढ, महागाई, शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न यावर राष्ट्रमंच आक्रमक भूमिका घेणार असल्याचेही मेमन यांनी सांगितले.
Esakal