ICC World Test Championship Final 2021 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान विश्व कसोटी अंजिक्यपद स्पर्धेतील अंतिम सामना (World Test Championship Final) रोमांचक स्थितीत पोहचला आहे. पावसाच्या व्यत्यय आणि अंधूक प्रकाशामुळे जवळपास तीन दिवस वाया गेले. आज, बुधवारी राखीव दिवसाचा (Reserve Day) वापर केला जाणार आहे. दिवसभरात 98 षटकांचा खेळ होणार आहे. अंतिम सामना अखेरच्या टप्यात पोहचला असून कसोटीचा बॉस कोण? हे आज समजेल किंवा सामना अनिर्णित राहिल्यास जेतेपद विभागून दिलं जाईल.

सहाव्या दिवशी म्हणजेच, आज पावसाचा कोणताही अंदाज नाही. अशा परिस्थितीत राखीव दिवशी संपूर्ण 98 षटकांचा खेळ पूर्ण होईल, अन् चाहते संपूर्ण आनंद घेतील. पावसामुळे पाचव्या दिवसाच्या खेळाला अर्धा तास उशीराने सुरुवात झाली होती. मोहम्मद शमी आणि इशांत शर्माच्या धारधार गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडला पहिल्या डावांत 249 धावांवर रोखलं. पाचव्या दिवसाअखेर भारतीय संघाने 21 धावांची आघाडी घेतली आहे. अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली मैदानावर तळ ठोकून आहेत. रोहित शर्मा (30) आणि शुबमन गिल यांची विकेट भारताने गमावली आहे. आता सर्व मदार विराट आणि पुजारा यांच्यावर आहे.

भारताची सर्वात अनुभवी जोडी सध्या मैदानावर आहे. विराट-पुजारा यांच्याकडून भारताच्या क्रीडा प्रेमींना खूप आपेक्षा आहेत. भारतीय संघ विजयाचा विचार करत असेल तर पुजारा आणि विराट कोहलीला वेगानं धावा जमवाव्या लागतील. सध्या पुजारा 12 आणि विराट 8 धावांवर खेळत आहेत. याशिवाय ऋषभ पंतला फलंदाजीमध्ये प्रमोशन देऊन अजिंक्य रहाणेच्या जागी पाठवावं लागेल. ऋषभ पंत कोणत्याही परिस्थितीत वेगानं धावा काढण्यात सक्षम आहे. न्यूझीलंडसमोर 180 ते 200 धावांचं लक्ष ठेवल्यास गोलंदाजावर टीम इंडियाचा विजय अवलंबून आहे. न्यूझीलंडला ऑलआऊट करण्यासाठी गोलंदाजांना पुरेसा वेळ हवा, हेही विराट कोहलीने लक्षात ठेवायला हवं.

भारतीय संघाकडे नाममात्र 32 धावांची आघाडी आहे. न्यूझीलंडला 8 विकेटची आवशकता आहे. लवकरात लवकर भारतीय संघाला ऑलआऊट करण्याचा प्लॅन न्यूझीलंडने आखला असेल. बोल्ट, साऊदी, वॅग्नर आणि जेमिन्सन यांच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांचा कीतपत निभाव लागतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल, की पहिल्या डावांप्रमाणे जेमिन्सनच्या जाळ्यात भारतीय संघ अडकतोय. भारताला 150 धावांच्या आत गुंडळल्यास न्यूझीलंडला विजायची संधी आहे.

Also Read: WTC फायनल निकाली लावण्यासाठी गावसकरांचा ICC ला सल्ला

राखीव दिवसाला साउदम्टनमध्ये पावसाचा कोणताही अंदाज नाही. दिवसभर सुर्यप्रकाश असेल. सामन्याचा पहिला आणि चौथा दिवस पावसाने वाया गेला होता. तर अंधूक प्रकाशामुळे अनेकदा सामना थांबवावा लागला होता.

पावसामुळे पाचव्या दिवसी अर्धा तास उशीराने सामना सुरु झाला होता. गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे न्यूझीलंड संघाच्या 8 तर भारताच्या दोन विकेट दिवसभरात गेल्या.

भारतीय संघाने कसोटीत पहिल्या डावात जेव्हा 250 पेक्षा कमी धावा केल्या आहेत, तेव्हा जास्तीत जास्त वेळा पराभवाचा तोंड पाहावं लागलं आहे. 93 कसोटीत भारताने आतापर्यंत पहिल्या डावांत 250 पेक्षा कमी धावा केल्या आहेत. 20 वेळा विजय तर 54 वेळा भारताला पराभव सहन करावा लागला आहे. 19 कसोटी अनिर्णित राहिल्या.

जो संघ फायनलमध्ये बाजी मारेल त्या संघाला 1.6 मिलीयन डॉलर म्हणजेच 11.71 कोटी रुपये मिळणार आहेत. एवढेच नाही तर स्पर्धेतील उपविजेत्याला म्हणजे पराभूत संघालाही 8 लाख डॉलर म्हणजे जवळपास 5.8 कोटी रुपये दिले जाणार आहेत. आयसीसीच्या नियमावलीनुसार, जर मेगा फायनलचा सामना ड्रॉ झाला तर विजेतेपद हे संयुक्तपणे दिले जाईल. बक्षिसाची रक्कमही विभागून दिली जाणार आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here