न्यूझीलंडपेक्षा चांगली कामगिरी कोणत्या संघाने केली असेल तर ती टीम इंडियाने. जय पराजयाच्या गुणोत्तराबाबतीत गेल्या सात वर्षांच्या काळात टीम इंडियानंतर न्यूझीलंडचा क्रमांक लागतो.
दोन वर्षांपूर्वी आयसीसीच्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडला इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. जिंकलेला सामना त्यांनी घाई गडबडीत केलेल्या चुकांनी गमावला. त्यावेळी दु:ख लपवून चेहऱ्यावरच्या स्मित हास्यानं केननं सर्वांची मन जिंकली. आज दोन वर्षांनी त्याच्यासह न्यूझीलंडचा संघच नाही तर त्याचा जगभरात विखूरलेला चाहताही जिंकला. खऱ्या अर्थानं कसोटीत बेस्ट चॅम्पियन क्रिकेट जगताला मिळालाय. गेल्या काही वर्षांत न्यूझीलंडचा संघ बलाढ्य संघ म्हणून पुढे आलाय. त्यातही कसोटीत त्यांनी मोठी झेप घेतली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्यापूर्वी आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये त्यांनी पहिलं स्थानही पटकावलं. आणि ते स्थान आज दिमाखात कायम ठेवलं.
न्यूझीलंडच्या संघात 2014 पासून मोठा बदल झाला. त्याआधी संघाची अवस्था खूपच बिकट अशी होती. 2007 ते 2013 या कालावधीत त्यांना 57 पैकी 12 कसोटी सामने जिंकता आले. तब्बल 27 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. बांगलादेश, झिम्बॉब्वे, वेस्ट इंडिज या संघाच्या तुलनेत त्यांची कामगिरी बरी होती असंच म्हणता येईल. मात्र 2014 नंतर मात्र संघाने कात टाकली. गेल्या सात वर्षात न्यूझीलंडने 59 कसोटी सामने खेळले. त्यापैकी 32 सामन्यात दिमाखदार विजय नोंदवला तर 17 सामने गमावले. या काळात न्यूझीलंडपेक्षा चांगली कामगिरी कोणत्या संघाने केली असेल तर ती टीम इंडियाने. जय पराजयाच्या गुणोत्तराबाबतीत गेल्या सात वर्षांच्या काळात टीम इंडियानंतर न्यूझीलंडचा क्रमांक लागतो.
Also Read: WTC : मानाच्या गदेसह ICC टेस्ट चॅम्पियन्सची गादी न्यूझीलंडचीच!
कसोटीमध्ये चांगली कामगिरी उंचावण्यात न्यूझीलंडला एका गोष्टीचा फायदा झाला तो म्हणजे घरच्या मैदानावर सातत्याने मिळवलेले विजय. 2014 पासून न्यूझीलंडने घरच्या मैदानावर 22 सामने जिंकले तर फक्त तीन सामन्यात पराभव पत्करला. घरच्या मैदानावर सामने जिंकण्यातसुद्धा भारतच न्यूझीलंडपेक्षा वरचढ आहे. न्यूझीलंडची 2007 ते 2013 या काळातली आकडेवारी पाहिली तर त्यांनी 16 कसोटी मायदेशात खेळल्या होत्या आणि त्यात 8 विजय आणि 8 पराभव होते.

न्यूझीलंडच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत फक्त 14 खेळाडू असे आहेत ज्यांनी 70 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील पाच जण सध्याच्या संघात आहेत. ते खेळाडू म्हणजे रॉस टेलर, केन विल्यम्सन, टिम साउदी, वॉटलिंग आणि ट्रेट बोल्ट. आता या पाच खेळाडूंपैकी वॉटलिंगने कसोटीतून निवृत्ती घेतली. आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपची ट्रॉफी उंचावून विजयी पदक गळ्यात घालून त्यानं निवृत्ती घेतली. याशिवाय सध्या संघात टॉम लॅथमने 58 तर नील वॅगनरने 53 कसोटी सामने खेळले आहेत. या खेळाडुंच्या अनुभवाची शिदोरी आणि नव्या दमाच्या खेळाडूंना साथीला घेऊन केन विल्यम्सनने आयसीसी ट्रॉफी जिंकली.
Also Read: WTC Final : भारतीय चाहत्यांकडून किवी खेळाडूंना अपशब्द
संघाच्या कामगिरीसोबतच न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनच्या खेळानेही गेल्या काही वर्षात मोठं योगदान दिलं आहे. त्याने 55 कसोटीत 64.27 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याच्या संघात चार असे खेळाडू आहेत ज्यांनी 40 पेक्षा जास्त सरासरीने 1500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर तीन गोलंदाजांनी 29 पेक्षा कमी सरासरीसह 180 हून अधिक बळी घेतले आहेत. विल्यम्सनच्या आधी संघात इतक्या अनुभवी खेळाडूंचा भरणा संघात नव्हता.

न्यूझीलंडने अलिकडच्या काळात 59 पैकी ज्या 32 कसोटी जिंकल्या त्यामध्ये 16 वेगवेगळ्या खेळाडूंना सामनावीर पुरस्कार मिळाला. त्यांच्या यशाचं खरं गमक यातच आहे. एक टीम एकत्र येऊन सातत्यानं कशापद्धतीने कामगिरी करते हेच यातून दिसतं. चार दोन खेळाडूंच्या जोरावर सामने जिंकण्यापेक्षा एक संघ म्हणून विजय मिळवण्याकडे त्यांचा कल दिसून येतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडचं टीम स्पिरीट दिसलं आणि त्यांनी कसोटीतलं वर्चस्व सिद्ध करून दाखवलं.
Esakal