साडेपाचशे वर्षांपूर्वीची ही कहाणी आहे. काशीजवळील लहरतारा येथे नीरू आणि त्याची पत्नी नीमा या कोष्टी दांपत्याला एक बाळ रस्त्यावर टाकून दिलेल्या अवस्थेत सापडलं, ते रडत होतं. त्या गोंडस बालकाला पाहून नीमाचचं हृदय भरून आलं. नीरू आणि नीमानं त्या बाळाला घरी नेण्याचे ठरविले. संकटाचे हरण करणारा परमेश्वर अशा अर्थाने त्यांनी लहान बाळाचं नाव ‘कबीर’ ठेवलं. नीरू आणि नीमा हे मुसलमान कुटुंब होतं. हे लहान बाळ जसजसे मोठं होऊ लागलं तसतसं परमेश्वराचे नामस्मरणही तो नियमित करू लागलं. त्यांच्या भक्तीत हिंदू मुस्लिम असा भेद नव्हता. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना नवल वाटे. मुस्लिम घरातील मुलगा नामस्मरण करतो याची चर्चा होऊ लागली होती. त्यामुळे हिंदू-मुस्लिम समाजात तणावाची परिस्थिती होती. कबीरांच्या रामनाम जपामुळे मुसलमान धर्मियांत अस्वस्थता वाढली होती. त्यांना कबीरांचा राग येत होता. “हे पोर भारी नास्तिक (काफिर) निपजकार आहे” असे म्हणत. यावर कबीर उत्तर देत की, “दुसऱ्याच्या संपत्तीचे जो अपहरण करतो तो काफिर होय; ढोंग करून समाजाला फसवितो तो काफिर, निष्पाप जीवांचा नाश करतो तो खरा नास्तिक होय!”

साधारणपणे पंधराव्या-सोळाव्या शतकात कबीर हे सर्वदूर पसरलेले प्रभावशाली नाव होते. कबीराच्या जन्मतारखेबाबतही बराच घोळ आहे. कबीराच्या पूर्वायुष्याबाबत विश्वसनीय माहिती मिळत नाही. कबीराचे दोहे, रचना, पदे यांवर अतिशय विपुल प्रमाणात उपलब्ध असून देखील कबीरावर तो अमुक-अमुक धर्माचा असा शिक्का मारता येत नाही. कबीराने तशी सोयच ठेवली नाही. कबीराच्या रचना या पूर्वी अनुयायांकडून मुखोद्गत करण्यात आल्या आणि नंतर कधी तरी त्या एकत्रितपणे संकलित केल्या गेल्या.

मी धर्म, पंथाचा नाही!

कबीरा खड़ा बाजार मा, सबकी मांगे खैर।

न काहू से दोस्ती, न काहू से बैर ।।

कबीर स्वतंत्र प्रज्ञेचे, विवेकशील, चिकित्सक बुद्धीचे असल्याने त्यांन धर्म, पंथाचीही चिकित्सा केली. पटले ते स्वीकारले आणि जे चुकीचे वाटले, त्या गोष्टीची टीका केली. स्वतः चा कोणताही धर्म, पंथ जाहीर केला नाही. तसेच समाजाला जे विचार घातक ठरतील, त्याचा त्यांनी निःसंदिग्धपणे विरोध केला. त्यांना जो विचार पटला त्याचा त्यांनी प्रचार केला. ‘सब आया एकही घाटसे’ या लोकप्रिय भजनात कबीर म्हणतात, हिंदू कहूं तो हो नहीं, मुसलमान भी नाही। गैबी दोनो दीन में, खेलूं दोनो माही। कबीर सांगतात, `मी तर हिंदू ही नाही आणि मुसलमानही नाही. मी दोघांच्याही मधे लपलोय आणि दोघांचाही आनंद घेतोय. ‘खरा धर्म धर्माच्या पलीकडेच सापडतो!’ हेच एकप्रकारे कबीरांनी दाखवून दिलं.

अंधश्रद्धा आणि वर्णवर्चस्वावर प्रहार!

धर्ममार्तंडांच्या कथनी आणि करणी मधील फरक कबीराने लोकांसमोर उघडा पाडला. बनारस सारख्या ठिकाणी अशाप्रकारचे विद्रोही-क्रांतिकारी विचार लोकांच्या ब्रज आणि अवधी धाटणीच्या बोलीभाषेत मांडण्याचे धैर्य कबीराने केल्याने त्याला कोणत्या प्रकारच्या रोषाला सामोरे जावे लागले असेल याची कल्पनाच न केलेली बरी! कबीरांनी आपल्या काव्य प्रचारात सनातनी ब्राह्मणांच्या चातुर्वर्ण्य समर्थनाचा कठोर शब्दात धिक्कार केला आहे. कबीरांच्या काळात धर्मविधींचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात होते. जात, पात, पंथ, धर्मातील भेदाभेद यांनी संपूर्ण समाजामध्ये उंच उंच भिंती उभ्या झालेल्या होत्या. संपूर्ण समाज या विधी आणि संप्रदायांच्या भीतीने तर कधी अज्ञानाने अंधारात चाचपडत होता. समाजातील मोजका वर्ग शिक्षण घेत होता. अन्य समाज शिक्षणाअभावी दरिद्री आणि अंध:कारात खितपत पडलेला होता. त्यांच्यापर्यंत ज्ञानाचा प्रकाश नेणार ‘पुरोहित वर्गाने ‘शूद्र’ लेखून समाजातील मोठा समाज दूर लोटून दिला होता. त्यांना समाज प्रक्रियेत माणूस म्हणून कोणतेही स्थान नव्हते. समाजातील फार मोठ्या घटकाला निश्चित दिशाच नव्हती. धर्माच्या मुखंडांनी धर्म म्हणजे कर्मकांड सांगितले होते. त्यासाठी कोणी पशुबळी, नरबळी, पूजा, कोंबडे, बकरे यांचे बळी देत होते. या वर्गाला शहाणं करण्याचं काम कबीराने केलं. समाजात वाढत असलेली अंधश्रद्धा पाहून कबीरांना अत्यंत दुःख होई. अनेक लोक गरीब, मजुरी करणारे, शेतकरी या वर्गातील होते. त्यांना तीर्थयात्रा, बळी देणे, श्राद्ध हा खर्च परवडत नसूनही खर्च करावा लागत होता. अशाच श्राद्ध या विधीविषयी कबीर म्हणतात,

जारिवारि करि आव देहा, मूवा पीछे प्रीति मनेहा

जीवति पित्रहि मारहि डगा, मुंवा पित्र ले घाल गंगा ॥

जीवत पित्र कूं अन्न न ख्वाव, मूंवा पीछे व्यंड भराव ।

जीवत पित्र कूं बोले अपराध, मूंबा पीछे देहि सराध ।।

कहि कबीर मोहि अचरच आवै, कडवा खाहिं पित्रं क्यू वावै ।।

बाप जिवंत असेपर्यंत पुत्र कोणतेही प्रेम बापाला देत नाही. बापाचा मृत्यु झाल्यावर मात्र तो प्रेमाचे ढोंग करीत असतो. जिवंतपणी बापाला काठीने मारणारा, अन्न न देणारा हाच पुत्र मृत्युनंतर मात्र बापाची राख गंगेत नेऊन टाकतो. पिंडदान करतो. जिवंत असताना बापाशी कटू शब्दात बोलणारा पुत्र, बाप मेल्यावर त्याचे श्राद्ध घालतो. कावळ्यांना भोजन दिल्याने ते मृत पिल्याकडे कसे पोहोचेल? याचे मला आश्चर्य वाटते, असा त्यांनी अत्यंत विवेकनिष्ठ प्रश्न उपस्थित केला आहे. पुत्राचे बापाविषयीचे खोटे प्रेम येथे उघडकोस येते. पण पुन्हा धर्माच्या नावाखाली हे सर्व अवडंबर सुरू असते.

कबीराचा ‘राम’ कुठला?

कबीरांच्या काव्यात राम, हरी, केशव, गोविंद, माधव अशी ईश्वरा नावे येतात. त्यामुळे कबीर ईश्वराला मानणारे होते आणि त्यांच्याबद्दल निरनिराळी मते मांडली गेली आहेत. या विविध मतांमुळे त्यांच्याबद्दल आणखी संभ्रम वाढत जातो. मात्र कबीरांनीच आपल्या एका पदात हा खुलासा केल्याने या प्रकारचे विवाद नष्ट होतात. त्या पदात ते म्हणतात,

ना साहिब के लागौ साथ । दुख सुखजो मेटिकै रहहु सनाथ ॥

ना दशरथ घरि औतरि आवा ना लंका का राव सतावा ।।

देव कोरवी न आंतरि आवा। ना जसवै ले गोद खिलावा ॥

ना वो ग्वालन के संग फिरिया। गोवरधन लें ना करघरिया ।।

बावन होई नहीं बलि छलिया। धरनी बैल ले न ऊधरिया ।।

गंडक सालिंग राम न कोला । मच्छ कच्छ है जलहिन डोला ।

बद्री बैठा ध्यान नहि लावा परसराम है खत्री न सतावा ॥

द्वारावती सरीरना छोड़ा जगन्नाथ ले पिंड न गाड़ा ||

कहे कबीर बिचारि करि, ये ऊले ब्यौहार ||

याहीते जो आगम है, सो वरति रहा संसार |

कबीरांनी उपरोक्त पदात स्पष्ट केले की, माझा राम हा दशरथाचा पुत्र नाही की रावणाची हत्या करणारा. तो कृष्ण नाही की पुराणातील कोणताह अवतार नाही असे सविस्तर सांगितले आहे. कोणत्याही अवताररूपी ईश्वराचे आराधना कबीर करीत नव्हते. त्यांनी मूर्तिपूजेचाही निषेध केला आहे कोणतेही कर्मकांड करू नका, असेही लोकांना परोपरीने विनविले आहे.

कबीर ते गांधी व्हाया तुकोबा!

संत कबीर त्यांच्यानंतरही पुढे अनेकांना प्रेरणा देत राहिले. संत तुकारामांनी तर कबीरांचं ऋण मान्य करून त्यांना आपलं पूर्वसुरीच मानलंय. कबीर-तुकोबा ऋणानुबंधाचे अनेक दाखले देता येतील. पंढरपुरात दत्तघाटाशेजारी कबीर मठात कबीर आणि त्यांचा मुलगा कमाल यांच्या समाध्याही आहेत. कबीरांनंतर कमाल पंढरपुरातच राहिले अशी महाराष्ट्रातल्या कबीरपंथीयांची श्रद्धाही आहे. न्या. महादेव गोविंद रानडे यांनी विसाव्या शतकाच्या सुरवातीला पालखी सोहळ्याच्या ठेवलेल्या नोंदीनुसार आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघते, तशीच वाराणसीहून कबीरांची पालखी पंढरपूरला यायची. ‘ज्ञानाचा एका, नामाचा तुका, कबिराचा शेखा’ असं म्हणत वारकरी परंपरेत आजही कबीर एकदम फिट होतात. त्या अर्थाने कबीर-तुकोबा-गांधी हे एका ‘स्कूल ऑफ थॉट’चेच ठरतात. कबीर हा डोळस श्रद्धा आणि धर्मचिकित्सा अशा समन्वयाचा प्रतिनिधी आहे. विंदा करंदीकरांच्या ‘शेक्सपिअर भेटी आला’ या रचनेवरून प्रेरित ही माझी नवी रचना याचाच प्रत्यय करून देते.

गांधीबाबा आला | तुकोबाच्या भेटी |

इंद्रायणी काठी | भेट झाली ||

जाहली दोघांची | उराउरी भेट |

उरातले थेट | उरामध्ये ||

वैष्णव ते जण | जाणे पर पीडा |

अभ्यास तो गाढा | जनलोका ||

वीणेत तुकाच्या | बापूही रंगला |

कीर्तनी दंगला | विद्रोहाच्या ||

पाहिले तुकाने | सूतही कातून |

वीणा सोपवून | बापूकडे ||

आकाशाएवढा | तुकाचा व्यासंग |

बापू त्याच्या संग | बैसलेला ||

कल्पना तुकाची | सामान बांधले |

शोधाया निघाले | कबीराला ||

दोघे निघोनिया | गेले एक दिशा |

कौतुक आकाशा | आवरेना ||

– विनायक होगाडे | vinayakshogade@gmail.com

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here