वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने इतिहास रचला. टीम इंडियाला 8 विकेट्सनी पराभूत करत त्यांनी आयसीसीची पहिली वहिली ट्रॉफी जिंकली. भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर 139 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे आव्हान न्यूझीलंडने 2 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. कर्णधार केन विल्यमसनने कर्णधाराला साजेसा खेळ केला. दुसऱ्या बाजूला अनुभवी रॉस टेलरने त्याला उत्तम साथी दिली. दोघांनी नाबाद राहत संघाला चॅम्पियन बनवण्यात मोलाचा वाटा उचलला. (New-Zealand Beat India In-WTC-Final Know-The-5-Reason-For-India-Defeat-In-World-Test-Championship-2021)

केन विल्यमसन याने दुसऱ्या डावात नाबाद 52 धावा केल्या. तर टेलरने 47 धावांची खेळी केली.144 वर्षांच्या इतिहासात कसोटीतील सर्वोच्च स्पर्धा जिंकत न्यूझीलंडने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी करणारा भारतीय संघ नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला. जाणून घेऊयात टीम इंडियाने केलेल्या पाच चुका ज्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

प्लेइंग इलेव्हनमध्ये गडबड!

टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हन निवडण्यात केलेली चूक ही संघाच्या यशातील मोठा अडथळा ठरली. दोन्ही डावात टीम इंडियात एक गोलंदाज कमी असल्याचे जाणवले. भुवनेश्वर कुमारसारख्या स्विंग गोलंदाजाला संघात स्थान दिले असते तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. एका बाजूला न्यूझीलंडचा संघ जेमिन्सन, साउदी, वॅगनार, बोल्ट यासारख्या तगड्या गोलंदाजी लाईनअपसह मैदानात उतरला. टीम इंडियाच्या तुलनेत ते भारी ठरले. फायनलमध्ये न्यूझीलंडने एकाही फिरकीपटूला स्थान दिले नव्हते. दुसरीकडे टीम इंडिया दोन स्पिनरसह मैदानात उतरली. या निवडीमुळे दोन्ही संघात अंतर निर्माण झाले.

टीम इंडियाच्या आघाडीचा फ्लॉप शो

साउदम्टनच्या मैदानात ऐतिहासिक सामना खेळताना टीम इंडियाचे आघआडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांच्यासह रोहित शर्मा आणि पुजाराकडून नावाला साजेसा खेळ झालाच नाही. विराट कोहलीने पहिल्या डावात 44 धावा केल्या. तो दोन्ही वेळा जेमिन्सनच्या जाळ्यात अडकला. पुजारा दोन्ही डावात फेल ठरला. एवढेच नाही तर फिल्डिंगवेळी पुजाराने रॉस टेलरचा झेलही सोडला.

पंतला संधीच सोन करता आल नाही

पहिल्या डावात सपशेल अपयशी ठरलेला पंतकडून दुसऱ्या डावात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. साउदीने त्याचा झेलही सोडला. त्यानंतर पंतने आशा पल्लवित केल्या. पण तो फार काळ टिकू शकला नाही.

प्रॅक्टिस मॅचशिवाय कसोटी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल लढतीपूर्वी टीम इंडिया एकही प्रॅक्टिस मॅच खेळली नाही. आपापल्यात प्रॅक्टिस करुन संघ मैदानात उतरला. त्याचा त्यांना काहीच फायदा झाला नाही. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघाला इंग्लंड विरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका फायद्याची ठरली.

जसप्रित बुमराहचे अपयश

आयसीसीच्या स्पर्धेत चौथ्यांदा जसप्रित बुमराह मोक्याच्या क्षणी अपयशी ठरला. पहिल्या डावात 26 षटकात त्याला एकही विकेट घेता आली नाही. दुसऱ्या डावातही किवी फलंदाजांना अडचणीत आणण्यात त्याला यश आले नाही. बुमराहचा फुसका बार टीम इंडियाला गोत्यात आणणारा ठरला.

न्यूझीलंडच्या शेपटाची खेळी पडली भारी

पहिल्या डावात न्यूझीलंडच्या संघातील तळाच्या फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांना चांगलेच दमवले. चौघांनी मिळून 87 धावा केल्या. शेपटाने केलेली वळवळ टीम इंडियाला चांगलीच महागात पडली. या धावांनी न्यूझीलंडच्या विजयाचा पाया रचला तर टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली. पहिल्या डावात शमी आणि ईशांतच्या माऱ्यासमोर न्यूझीलंडचा संघ ढेपाळला होता. त्यांनी 6 बाद 162 धावा केल्या होत्या. अखेरच्या चौघांनी संघाची धावसंख्या 249 धावांपर्यंत नेत संघाला 32 धावांची आघाडी मिळवून दिली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here