Euro 2020 Ronaldo Equals Daei World Record : वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्स विरुद्धच्या लढतीत रोनाल्डोच्या दोन गोलमुळे पोर्तुगाल संघाचा पराभव टळला. एवढेच नाहीतर हा सामना 2-2 बरोबरीत राखत पोर्तुगालने ग्रुपमध्ये तिसऱ्या स्थानावर राहून देखील स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे. सामन्यातील 30 व्या मिनिटाला पोर्तुगालला पेनल्टीची संधी मिळाली. अपेक्षेप्रमाणे रोनाल्डोने त्याच्याकडून अपेक्षित काम फत्तेह करत संघाचे खाते उघडले. त्याला फ्रान्सकडून पेनल्टीवरील गोलने तगडे प्रत्युतर मिळाले. करिम बेन्झेमाने प्रतिहल्ला चढवत फ्रान्सला बरोबरी करुन दिली. दोन मिनिटांच्या अंतराने बेन्झेमाने दुसरा गोल डागला आणि पोर्तुगालच्या चाहत्यांची धकधक वाढली. (Cristiano Ronaldo equals Daei record for most international goals in mens football)

सामना गमावला तर पोर्तुगाल ‘जर-तर’ च्या समीकरणात अडकून स्पर्धेतून बाद होण्याचा धोका या सामन्यादरम्यान निर्माण झाला होता. किमान सामना बरोबरीत आणून स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याची धडपड 60 व्या मिनिटाला पूर्ण झाली. पोर्तुगालला आणखी एक पेनल्टी मिळाली. आणि रोनाल्डोने सामन्यातील दुसरा आणि बरोबरीचा गोल डागला. बेनझिमा आणि रोनाल्डो यांच्यात जणू तू गोल करतोय तर हा घे दुसरा अशी रंगत रंगली होती. सामन्याच्या अखेरपर्यंत स्कोअर 2-2 बरोबरीत राहिला आणि फ्रान्सने टॉपर तर पोर्तुगालने तिसऱ्या स्थानी असूनही नॉक आउटमध्ये प्रवेश निश्चित केला.

Also Read: WTC : मानाच्या गदेसह ICC टेस्ट चॅम्पियन्सची गादी न्यूझीलंडचीच!

विश्वविक्रमाची बरोबरी

फ्रान्स विरुद्धच्या सामन्यातील 2 गोलच्या जोरावर रोनाल्डोने केवळ संघाचे स्पर्धेतील आव्हान कायम राखले नाही. तर आपल्या नावे खास विक्रमाची नोंदही केली. त्याने या सामन्यात दोन गोल डागत आंतरराष्ट्रीय स्तरावर 109 गोल डागण्याचा पल्ला गाठला. त्याने इराणचे दिग्गज फूटबॉलपटू अली दाई यांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली. आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात सर्वाधइक गोल करण्याचा विक्रम हा इराणच्या अली दाई यांच्या नावे आहे. त्यांनी 149 सामन्यात 109 गोल केले आहेत. रोनाल्डोला त्यांची बरोबरी करण्यासाठी 178 सामने खेळावे लागले. बेल्जियम विरुद्धच्या बाद फेरीतील सामन्यात तो हा विश्वविक्रम मागे टाकणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Also Read: Euro : पोर्तुगाल vs बेल्जियम; जाणून घ्या नॉक आउटचे वेळापत्रक

आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये मलेशियाचे मोख्तार डहरी तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी 142 सामन्यात 89 गोल डागले आहेत. त्यापाठोपाठ हंगेरीचे फेरेंक पुस्कास यांनी 85 सामन्यात 84 गोल केले आहेत. गॉडफ्रे चितलू (झांबिया) 111 सामन्यात 79 गोल, हुसेन सईद (इराग) 137 सामन्यात 78 गोल, पेले (ब्राझील) 92 सामन्यात 77 गोल, अली माब्खौट (युएई) * 92 सामन्यात 76 गोल, सँडोर कोसिस (हंगेरी) 68 सामन्यात 75 गोल आणि कुनिशिगे कामोमोटो (जपान) 76 सामन्यात 75 गोल यांचा अव्वल दहामध्ये नंबर लागतो.

वर्ल्ड कप-युरोतला हिरो

फ्रान्स विरुद्धच्या सामन्यातील दोन गोलच्या जोरावर युरो आणि वर्ल्ड कपमध्ये मिळून सर्वाधिक गोल करण्याचा पराक्रम रोनाल्डोने आपल्या नावे केला. दोन्ही स्पर्धेत मिळून सर्वाधिक गोल डागणारा रोनाल्डो एकमेव युरोपीयन खेळाडू ठरलाय. फ्रान्स विरुद्धच्या सामन्यातील पहिल्या गोलनंतर त्याने जर्मनीचा दिग्गज फुटबॉलपटू मिरोस्लाव क्लोसे यांना मागे टाकले. वर्ल्ड कप आणि युरो या मोठ्या स्पर्धेत त्यांच्या नावे 19 गोल आहेत. या दोन्ही स्पर्धेत मिळून रोनाल्डोच्या खात्यात आता 21 गोल जमा झाले आहेत. हा एक विक्रमच आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here