तळेगाव स्टेशन – राष्ट्रीय महामार्गाचा (National Highway) दर्जा मिळाल्यानंतर मंजुऱ्यांच्या फेऱ्यात अडकलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाबाबत केवळ घोषणांची (Announcing) कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू आहेत. या संदर्भात वर्षानुवर्षे चाललेला घोषणांचा भडिमार थांबून प्रत्यक्षात काम केव्हा सुरू होणार याबाबत वाहतूकदार आणि परिसरातील गावांमधील नागरिकांमध्ये साशंकता आहे. या महामार्गाचे काम सुरू करून तातडीने वाहतूक कोंडीतून सुटका कधी होईल, अशी भावना या परिसरातील नागरिकांची आहे.
महामार्गाचा प्रवास….
-
२०१५ मध्ये तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग देखभालीसाठी सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प विभागाकडे हस्तांतरित झाला. त्यानंतर डांबरीकरणाशिवाय कुठलेही ठोस काम झाले नाही
-
२०१७ मध्ये महामार्ग क्रमांक ५५ चे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी मध्ये रूपांतर होऊन १,८०० कोटींच्या मंजुरीचे पहिले परिपत्रक
-
पुण्याच्या चांदणी चौकातील जाहीर कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन
-
मावळचे तत्कालीन आमदार संजय भेगडे यांच्याकडूनही बैठका घेऊन पाठपुरावा
-
चार वर्षे उलटूनही नुसत्या कागदी मंजुऱ्या आणि प्रस्तांवाशिवाय राष्ट्रीय महामार्गाचा साधा मैलाचा पिवळा दगड लागलेला दिसत नाही
-
विभागाच्या टोलवाटोलवी चार वर्षे परिसरातील रहिवासी आणि वाहनचालकांना खाचखळगे, वाहतूक कोंडी आणि अपघात मूकपणे झेलावे लागले
-
आमदार बदलल्यानंतर नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके यांच्याकडून पाठपुरावा सुरू
-
२०२०-२१ आर्थिक वर्षातील तरतुदी अंतर्गत गतवर्षी २४ किलोमीटरच्या टप्प्यातील १२ मीटर रुंद काँक्रिटीकरण कामासाठी ३०० कोटींची तरतूद
-
बारा मीटर रुंदीच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत हा प्रस्तावही गुंडाळला
-
दुभाजकासह १८ मीटर रुंदीच्या ६०० कोटींच्या नव्या प्रस्तावाची जानेवारीत गडकरी यांच्याकडून घोषणा
-
आमदार सुनील शेळके यांच्या महाराष्ट्र विधिमंडळातील पुरवणी निधी अंतर्गत तळेगाव ते सुधापूल दरम्यान ६ कोटींच्या निधीतून १८ मीटर रुंदीकरणाच्या कामाचे उद्घाटन
-
गेल्या दोन महिन्यांत पावसामुळे जेमतेम दोन किलोमीटर लांबीत फक्त खोदकाम होऊ शकले
-
एकंदरीतच राष्ट्रीय महामार्ग घोषित केल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून केवळ मंजुरीच्या घोषणा
-
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदारी झटकून मोकळे

अडीचशेपेक्षा अधिक बळी
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाच्या २०२१-२२ च्या महाराष्ट्र राज्यासाठीच्या वार्षिक नियोजनात तळेगाव-चाकण-शिक्रापूर ५४८-डी या ५४ किलोमीटर टोलयुक्त रस्त्याच्या कामासाठी १,०१५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे चौथ्यांदा घोषणा झालेल्या या पॅकेजचे काम प्रत्यक्षात केव्हा सुरू होणार याबद्दल नागरिकांच्या मनामध्ये कुतूहलपेक्षा साशंकता जास्त आहे. बारमाही चोवीस तास रहदारीने ओसंडून वाहणाऱ्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर गेल्या पाच वर्षांत झालेल्या अपघातांत अडीचशेपेक्षा अधिक बळी गेले आहे.
आंदोलनाच्या पवित्र्यात
राष्ट्रीय महामार्गाच्या कामांबाबत आमदारांना मर्यादा पडतात. कागदी मंजुऱ्यांच्या फेऱ्यात अडकलेल्या या मार्गाच्या कामासाठी शिरूर आणि मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार विशेष आग्रही दिसत नाहीत. त्यामुळे येत्या लोकसभेला मावळ लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील एका आमदारांना बरोबर घेऊन तळेगाव चाकण महामार्ग कृती समिती या रस्त्याबाबत मोठे जनआंदोलन उभारण्याच्या तयारीत आहे.
Esakal