बेलापूर: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आज (२४ जून) सिडकोला घेराव घालत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबईला छावणीचं स्वरुप आलं आहे. नवी मुंबई, पनवेल मुंबई, पुणे, ठाणे, पालघर येथून सुमारे 5 हजारांचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव दलाच्या 7 तुकड्याही दाखल झाल्या आहेत. दंगल नियंत्रण पोलीस पथकदेखील उपस्थित आहे. रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील जवळपास 1 लाखांहून अधिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आजच्या घेराव आंदोलनात सहभागी होणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विमानतळासाठी शिवछत्रपतींचे नाव सुचवले आहे. असे असताना त्यांचे एकमेव आमदार राजू पाटील हे मात्र दि बांच्या समर्थनार्थ होत असलेल्या आंदोलनात सहभागी झाल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्याचे चित्र आहे. त्यावर त्यांनी आपली भूमिका फेसबुक पोस्टमार्फत स्पष्ट केली आहे. (Raj Thackeray led MNS MLA Raju Patil Joins Agitation over Navi Mumbai Airport Naming Issue Supporting Di Ba Patil Name)
Also Read: जिथे पोलीस अडवतील, तिथेच बसून आंदोलन सुरू करणार!!
“राजसाहेब ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत वस्तुनिष्ठ तांत्रिक बाजू मांडली आहे. त्यानंतर अनेकजण विपर्यास करुन त्याचा वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला. राहता राहिला प्रश्न २४ जूनच्या आंदोलनाचा. तर मी नम्रपणे आणि ठामपणे सांगू इच्छितो की हा मोर्चा आगरी, कोळी, कुणबी, कऱ्हाडी आणि शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या भूमीपुत्रांनी काढलेला मोर्चा आहे. राज्यभर जेव्हा मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मूकमोर्चे निघत होते, तेव्हा जनभावना आणि सामाजिक जबाबदारी म्हणून आंदोलनात सहभागी झालो होतो. आताच्या घडीला तर माझा पूर्ण समाज या आंदोलनात उतरला आहे. त्यांच्या भावनेचा आणि विचारांचा कुटुंबातील एक सदस्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला आदर आहे. कारण त्यांच्या प्रेमामुळेच आपण इथवर पोहोचलो आहोत. त्यामुळे राजकारणात असलो तरी लोकभावना आणि समाजकारण हेच माझं पहिलं प्राधान्य आहे. म्हणूनच ज्यांनी माझ्या संपूर्ण समाजाला आणि भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरण्यासाठी भाग पाडलंय, त्यांचा निषेध करण्यासाठी आणि भूमीपुत्रांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी या मोर्चात सहभागी होणार आहोत”, अशा शब्दात त्यांनी आपली बाजू मांडली आहे.

Also Read: नवी मुंबईतून पुणे-मुंबईकडे जाताय? वाहतुकीतील बदल समजून घ्या
“लोकनेते दि बा पाटील यांचा आज म्हणजेच २४ जून हा स्मृतिदिन आहे. त्या निमित्ताने सिडकोला घेराब घालण्याचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सिडकोला घेराव घालायचा तर आंदोलकांची कोंडी करण्यासाठी प्रशासनाने कोकण भुवनकडे येणारे बरेचसे रस्तेच बंद करून टाकले आहेत. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या मार्गाने लोकं येत आहेत. सगळ्यांना आवाहन करण्यात आलं आहे की शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं जायला हवं. आंदोलकांना गावातूनच बाहेर निघून द्यायचं नाही, असा जरी पोलिसांचा प्रयत्न नसला, तरी मार्ग बंद करून सिडकोपर्यंत आंदोलकांनी पोहोचू नये असा प्रयत्न पोलिसांकडून केला गेला आहे. त्यामुळे जिथे पोलीस अडवतील, तिथेच बसून आंदोलन सुरू करणार”, असा थेट इशारा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला.
Esakal