सानिया मिर्झाने भारतीय टेनिसमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. आता ती ऑलिम्पिक स्पर्धेत नवा इतिहास रचणार आहे. 34 वर्षीय सानिया 23 जुलै पासून होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकच्या मैदानात उतरताच एक खास विक्रम आपल्या नावे करेल. यंदाच्या स्पर्धेसह ऑलिम्पिंकमध्ये ती चौथ्यांदा कोर्टवर उतरेल. भारताकडून चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी ती पहिली महिला खेळाडू ठरेल. आपल्या कारकिर्दीवर सानिया म्हणाली की, आतापर्यंतचा प्रवास हा उत्तम राहिला आहे. स्वत:वरील विश्वास आणि क्षमतेवर यश अवलंबून असते. किती दिवसांपासून खेळते किंवा कधीपर्यंत खेळायचे असा विचार कधीच केला नाही. तिशीत असले तरी प्रत्येक दिवशी खेळायचे ही भावना मनात ठेवून कोर्टवर उतरत असते, असे तिने Olympics.com ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.

2018 मध्ये मुलाला जन्म दिल्यापासून ती कोर्टपासून दूर होती. आई झाल्यावर ती पुन्हा कोर्टवर दिसणार का? कमबॅक केल्यावर सानियाचा खेळ कसा होणार? असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात होते. पण होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सानिया अजून थांबणार नाही याची झलक पाहायला मिळाली.

Also Read: WTC : 10 चेंडूत गमावला सामना; सचिनने घेतलं कोहली-पुजाराचं नाव
सानिया म्हणाली की, कोर्टवर खूप मेहनत घ्यावी लागत आहे. मैदानाच्या बाहेर देखील ट्रेनिंगवर भर देत आहे. कोर्टवर चपळ आणि ताकदीनिशी उतरण्यासाठी प्रत्येक मुव्हमेंटवर काम करत आहे, असेही तिने सांगितले. 2016 मधील रिओ ऑलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरी प्रकारात सानिया- रोहन बोपन्नाच्या साथीने कोर्टवर उतरली होती. या जोडीला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेला उजाळा देताना सानिया म्हणाली की, रिओ ऑलिम्पिकमधील पराभव हा आयुष्यातील सर्वाधिक निराशजनक क्षण होता. पदकाच्या जवळ जाऊन ते जिंकता आले नाही. आता पुन्हा नव्या जोमाने स्पर्धेत उतरण्यासाठी उत्सुक आहे. ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करणे हे कोणत्याही खेळाडूसाठी अभिमानास्पद असते. मलाही त्याचा अभिमान आहे, असे ती म्हणाली.

Esakal