सातारा : दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने १८ वर्षांपुढील व्यक्तींच्या लसीकरणास परवानगी दिली आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील सुमारे ११ लाख नागरिकांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ११ रुग्णालयांमध्ये लसीकरण होणार असल्याने येत्या काही दिवसांत लसीकरण मोहीम वेग घेणार आहे. (satara-marathi-news-covid19-vaccination-begins-18-age-group)
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात झाली. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात आरोग्य विभाग, दुसऱ्या टप्प्यात संरक्षण दलातील जवान व सरकारी कर्मचाऱ्यांचे लसीकरण, तर तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिक व ४५ वर्षांवरील इतर आजार असलेल्या नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. त्यानंतर एक एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील सर्वच नागरिकांना सरसकट लसीकरणास सुरुवात झाली होती. दरम्यान, एक मे पासून १८ वर्षांपुढील व्यक्तींच्या लसीकरणास सुरुवात झाली होती. मात्र, लशींचा तुटवडा व ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोसला विलंब लागत असल्याने १८ वर्षांपुढील व्यक्तींच्या लसीकरणास स्थगिती देण्यात आली होती.
Also Read: महाराष्ट्रात अभिनव क्रांती; महाबळेश्वरात फुलणार लाल-हिरव्या भाताची शेती!
दरम्यान, याआधी केवळ ४४ वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण सुरू होते. आता लशीचे डोस जादा प्रमाणात उपलब्ध होत असल्याने १८ वर्षांपुढील व्यक्तींच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात १८ वर्षांपुढील २१ लाख लोकसंख्या असून, १८ ते ४४ या वयोगटातील सुमारे ११ लाख नागरिक आहेत. याचबरोबर, आतापर्यंत एकूण साडेआठ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. सद्य:स्थितीत १८ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणास परवानगी दिल्याने लसीकरण मोहिमेचा वेग वाढणार आहे.
आठवडाभरात ऑनलाइन नोंदणीही सुरू होणार
लसीकरणासाठी याआधी ४४ वर्षांपुढील व्यक्तींना केंद्रावर केवळ टोकन घेऊन लस देण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, आता १८ वर्षांपुढील व्यक्तींच्या लसीकरणास परवानगी दिल्याने केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, येत्या आठवडाभरात लस घेण्यासाठी कोविड ॲपवर ऑनलाइन नोंदणीही सुरू होणार असून, टोकनचीही सुविधा ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून, लसीकरण केंद्रावरील गोंधळ टाळता येणार असल्याचे जिल्हा परिषदेने सांगितले आहे.

…या केंद्रांत होणार लसीकरण
क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय सातारा, उपजिल्हा रुग्णालय कऱ्हाड, उपजिल्हा रुग्णालय फलटण, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र खटाव, ग्रामीण रुग्णालय पाटण, ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर, ग्रामीण रुग्णालय दहिवडी, उपजिल्हा रुग्णालय मेढा, ग्रामीण रुग्णालय वाई, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवळ.
काही सुखद बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
‘‘सद्य:स्थितीत १८ वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, लशींची संख्या पाहता केवळ जिल्ह्यातील ११ रुग्णालयांत लसीकरण सुरू करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत लशींची संख्या वाढल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांत लसीकरणास सुरुवात करणार आहे.’’
-विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
Esakal