पुणे : ”महाराष्ट्र राज्य शासनाची खेळी, ओबीसी आरक्षणाचा बळी…ऊठ ओबीसी जागा हो, एकजुटीचा धागा हो… रोहिणी आयोगाशी चर्चा करण्यासाठी त्वरीत समिती गठीत करा…” अशा घोषणा देत विविध मागण्या करीत ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी पुणे आणि भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर तर्फे कात्रज चौक येथे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले ओबीसी संघटना व समाजबांधव सहभागी झाले.
कात्रज बायपास जवळ पंकजा मुंडे यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. आक्रमक आंदोलकांनी रस्ता अडविला असून वाहतूक खोळंबली आहे. कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्यांने सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचा फज्जा उडाला आहे.”सरकार महिन्यांपासून वेळकाढू पणा करतेय, आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक होऊ देणार नाही” अशी स्पष्ट भूमिका पंकजा मुंडे यांनी घेतली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध भागात चक्काजाम आंदोलन घेण्यात येत आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपद्वारे राज्यात जेल भरो आंदोलन सुरू केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्सच्या नियमांची पायमल्ली होत आहे.
ओबीसींचे आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाले आहे. त्याविरोधात भारतीय जनता पार्टी व पदाधिकारी रस्त्यावर उतरले असून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात आले. भाजपाने वाचविलेले ओबीसी आरक्षण नाकर्त्या सरकारने घालविले. आयोग निर्मीतीबाबत शासन निष्क्रिय राहिले, त्यामुळे भारतीय जनता पार्टी याविषयाला वाचा फोडत आहे. निर्वाचित निवडणूक निरस्त करुन ओबीसी आरक्षण संपवायचा हा राजकीय डाव आहे. ओबीसी आरक्षणाकडे आघाडी शासनाचा पूर्णपणे कानाकोळा झाला आहे. त्यामुळे सरकारचा धिक्कार करण्याकरीता आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ न देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला

Also Read: पुणे शहरातील रिंगरोड प्रकल्प सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून पूर्ण होइल

आंदोलनाला भाजपा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर, खासदार गिरीश बापट, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनिल कांबळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहरचे अध्यक्ष योगेश पिंगळे, अतुल चाकणकर यांसह खासदार, आमदार, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
Esakal