नागपूर : राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या ही विदर्भात आहे. कारण, याच परिसरात सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प (tiger reserve in vidarbha) आहेत. वाघ पाहायचा म्हटलं की पर्यटकांचा कल हा विदर्भाकडेच असतो. तुम्हालाही वाघ पाहायचा असेल तर विदर्भातील या अभयारण्याला जरूर भेट द्या. (tiger reserve and wildlife sanctuaries in vidarbha)

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प : हा व्याघ्र प्रकल्प विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे. याठिकाणी विदेशातील अनेक पर्यटक भेट देतात. तसेच अनेकांना वाघोबाचे दर्शन देखील होते. तुम्हाला ताडोबाला भेट द्यायची असेल तर नागपूरवरूनही ताडोबाला जाता येईल. नागपूरवरून ताडोबाला जाण्यासाठी जवळपास तीन तास लागतात.
पेंच व्याघ्र प्रकल्प : पेंच हा व्याघ्र प्रकल्प पेंच नदीमुळे पूर्व पेंच आणि पश्चिम पेंच अशा दोन भागात विभागला गेला आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प २५७.२६ चौ.कि.मी क्षेत्रात विस्तारला आहे. १९७५ साली महाराष्ट्र शासनाने हे राष्ट्रीय उद्यान घोषित केले आणि फेब्रुवारी १९९९ मध्ये याला व्याघ्र प्रकल्पाचा अधिकृत दर्जा मिळाला. नागपूरवरून अवघ्या ७० किलोमीटर अंतरावर हा व्याघ्र प्रकल्प आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प : मेळघाट मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वतरांगामध्ये वसलेले अभयारण्य आहे. मेळघाट हे महाराष्ट्र राज्याचे जैवविविधतेचे भांडार आहे. घनदाट जंगलात माखला, चिखलदरा, चीलादारी, पातुल्डा आणि गुगमाळ ही अतिशय दुर्गम ठिकाणं आहेत. याठिकाणी वाघ, बिबळे, रानगवे, सांबर, भेकर, रानडुकर, वानर, चितल, नीलगायी, चौसिंगा, अस्वल, आदी वन्यजीवांचे दर्शन होतेय. येथे जायचे असल्यास तुम्ही थेट अमरावतीवरूनही जाऊ शकता. तसेच नागपूरवरून मेळघाटचे अंतर हे २४० किलोमीटर आहे.
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य : नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कुही, भिवापूर आणि भंडारा जिल्ह्यातील पवनी अशा चार तालुक्यांमध्ये हे अभयारण्य विस्तारले आहे. याच ठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठा जय नावाचा वाघ होता. त्यामुळे हे अभयारण्य चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आले होते. आताही याठिकाणी गेलेल्या पर्यटकांना हमखास वाघाचे दर्शन होते. तुम्हालाही याठिकाणी जायचे असल्यास नागपूरवरून थेट बसने किंवा खासगी वाहनाने जाता येईल. नागपूरवरून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर हे अभायारण्य आहे.
टिपेश्वर अभयारण्य : यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर आणि घाटंजी तालुक्यात पैनगंगा नदीच्या खोऱ्यात हे अभयारण्य विस्तारले आहे. याचठिकाणी अवनी नावाच्या वाघिणीला देखील मारले होते. या अभयारण्याला भेट द्यायची असेल तर हैदराबाद नागपूर महामार्गावर असलेल्या पांढरकवडा या गावापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे, तर यवतमाळवरून ९२ किलोमीटरवर आहे. याठिकाणीही वाघाचे हमखास दर्शन होईल.
नागझिरा अभयारण्य : नागझिरा अभयारण्य हे भंडारा-गोंदिया जिल्ह्यात असून जैवविविधतेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे अभयारण्य आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असलेल्या भंडारा शहरापासून सुमारे ४० किमी. अंतरावरील साकोली गावापासून अंदाजे २२ किमी. अंतरावर नागझिरा अभयारण्य असून दूसरीकडे सुमारे ३० किमी. अंतरावर नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे.
बोर व्याघ्र प्रकल्प : बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा जिल्हा मुख्यालयापासून 40 किमी आणि नागपूरपासून 65 किमी अंतरावर आहे. जंगली प्राणी जसे वाघ, कोल्हे, कुत्रे, अस्वल दिसतात. मोर मुबलक प्रमाणात आहेत. 32.5 किमीच्या अंतरावर वर्धा जरी सर्वात जवळचा रेल्वेमार्ग आहे, परंतु बुटी बोरी रेल्वे स्टेशन (50.2 किमी) दुसरा पर्याय बोर अभयारण्य गाठण्यासाठी पर्यटकांसाठी सोयीस्कर ठरतो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here